बदलापूर : बदलापूर येथील शालेय चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होण्यात व त्यानंतरच्या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मनसे महिला आघाडीच्या प्रमुख संगिता चेंदवणकर यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे जाहीर कौतुक केल्यानंतर आता त्यांना मनसे मधून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.बदलापूर शहरात एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडली होती. यात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. मात्र मनसेच्या बदलापूर महिला आघाडीच्या प्रमुख संगिता चेंदवणकर यांसह मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी यात पुढाकार घेतल्याने उशिरा का हाईना गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शहरात नागरिकांनी उत्स्फुर्त आंदोलन केले. याचेही नेतृत्व संगिता चेंदवणकर यांनी केले होते.