मानकर, ठोंबरेंच्या विरोधाला केराची टोपली
पुणे (प्रतिनिधी) :पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या मागे सदैव भक्कम उभा असल्याचे ट्विट खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजितदादांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. कारण काही दिवसांपूर्वीच शहराध्यक्ष दीपक मानकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकरांच्या नावाला विरोध दर्शवला होता,त्यानंतर आता अजित पवार यांनी हे ट्विट केले. अजितदादांनी ट्विट करत मानकर, ठोंबरे यांच्या विरोधाला एक प्रकारे टोपलीच दाखवल्याचश् बोलले जात आहे. अजितदादांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर यांनी पुण्यात केलेल्या आंदोलनाबाबत माहिती देत असून या आंदोलनाप्रकरणी अजितदादांनी केलेल्या मदतीसंदर्भात सांगत आहेत. राज्यातील प्रत्येक समाजघटकाला अजितदादा न्याय देणारे नेते असल्याचे म्हणत रुपाली चाकणकरांनी अजित पवार यांचे कौतुक केले आहे.
राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये तीन भाजप, दोन शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जणांना संधी मिळाली. या यादीत रुपाली चाकणकर यांचं नाव नव्हतं.
विधानपरिषदेवर चाकणकरांना संधी मिळेल अशी चर्चा होती. परंतु, पक्षातूनच त्यांच्या नावाला विरोध झाला. एकाच व्यक्तीला सगळी पदं देणार का? असा थेट सवाल रुपाली ठोंबरे यांनी विचारला होता. त्यामुळे राज्यपालांना पाठवण्यात आलेल्या यादीत रुपाली चाकणकर यांचं नाव नव्हतं.
तरी देखील महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.