सिवान : बिहारमधील १६ गावांमध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत एका महिलेसह ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी सिवानमध्ये ३ आणि सारणमध्ये २ जणांचा मृत्यू झाला. सिवानमध्ये १४ ऑक्टोबरपासून मृत्यूची मालिका सुरू झाली. सारणमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्वांनी १५ ऑक्टोबर रोजी मद्य प्राशन केले होते. यात ३५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सिवानमध्ये ५ आणि सारणमध्ये २ जणांची दृष्टी गेल्याचे सांगण्यात येत आहे.
सिवानमध्ये सदर रुग्णालयात ३४ जण दाखल आहेत तर छपरा येथे एकजण दाखल आहे. सारणमधील काही लोकांना पाटणा येथील पीएमसीएचमध्ये पाठवण्यात आले आहे. १३ रोजी सिवानमधील भगवानपूर हाटमध्ये विकल्या जाणाऱ्या सॅशेत दारू अनेकांनी प्यायली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एएसपी संजय झा यांच्या नेतृत्वाखाली बिहार पोलिसांच्या प्रोहिबिशन युनिटची एसआयटी घटनास्थळी दाखल झाली.