पेण (वार्ताहर): पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदार क्षेत्रात ३ लाख ६ हजार ६० मतदार असून यामध्ये ३८० मतदान केंद्र राहणार असल्याने शासकीय स्तरावर विधानसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असल्याचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार यांचे समवेत पेण तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर आदिंसह अधिकारी वर्ग उपस्थित होते.पेण, रोहा, सुधागड असा पेण विधानसभा मतदारसंघ असून यामध्ये २२ ऑक्टोबर रोजी सुरूवात होऊन २९ ऑक्टोंबर रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे तर ३० ऑक्टोंबर रोजी छाननी असून अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर आहे. ही सर्व प्रक्रिया प्रांत कार्यालय पेण येथे होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी प्रांत कार्यालया जवळील केईएस स्कुल येथे होणार आहे. याकरीता नवीन मतदार नोंदणी ही शनिवार १९ ऑक्टोंबर पर्यंत करता येणार आहे. त्यामुळे नवीन नाव नोंदणी करायची असेल तर त्यांनी तातडीने करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले. यासह मतदारांमध्ये १७६ सैनिक दल (सर्विस वोटर) मतदार आहेत. ऑनलाइन सुद्धा तक्रार करता येणार आहे. नगरपालिका आणि बीडीओ यांच्या मार्फत सदर तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आल्यावर त्या तक्रारीवर कार्यवाही करण्यात येईल. सदर विधानसभे साठी ७ भरारी पथक आणि ६ संरक्षण पथक नेमण्यात आले असून निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
आदिवासी डोंगराळ भाग या मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वर्षभर जनजागृतीच्या माध्यमातून काम सुरू आहे. पण तरीही पुन्हा आदिवासी भागात जाऊन मतदारांना आव्हान करण्यात येणार आहे. तसेच जनजागृती करीता १० नोव्हेंबर रोजी मॅरेथॉन ठेवण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी पवार यांनी सांगितले.