राजू शेट्टी, छत्रपती संभाजी राजे, बच्चू कडू यांनी ताकद लावली पणाला
पुणे : परिवर्तन महाशक्तीचे विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील १५० जागांवर एकमत झाले असल्याचे दावा शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी, प्रहार अपंग संघटनेचे बच्चू कडू व स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांनी केला. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी सरळ लढत होईल, असे चित्र उभे राहत असताना, राजू शेट्टी,छत्रपती संभाजी राजे,बच्चू कडू यांनी ताकद पणाला लावली आहे.
स्वराज्य पक्षाच्या कार्यालयात गुरूवारी दुपारी परिवर्तन महाशक्ती या नावाने शेट्टी, कडू, संभाजी राजे तसेच शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप व अन्य संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या नेत्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. परिवर्तन महाशक्तीमध्ये समविचारी अशा तब्बल ३० ते ४० संघटना सहभागी झाल्या आहेत. आमचे सर्वांचे विधानसभेच्या १५० जागांवर एकमत झाले आहे. काही जागा दोनदोन पक्ष किंवा संघटनांना हव्या आहेत. तुमच्यामध्ये चर्चा करून तुम्हीच त्यावर निर्णय घ्या असे त्यांनी सांगितले आहे. लवकरच आम्ही आमची यादी जाहीर करू असे या नेत्यांनी सांगितले.
राज्यात मोजकीच काही घराणी गेली अनेक वर्षे राज्यकर्ते आहेत. त्यांनी कष्टकरी वर्गाला कायमच उपेक्षित, वंचित ठेवले. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही गरीब कष्टकरी वर्गाच्या घरातील अंधार काही मिटलेला नाही. या सगळ्याला उत्तर देण्यासाठी, गरीबांनी न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. प्रस्थापितांना बाजूला करणे व जनतेच्या हातात राज्य देणे हा आमचा उद्देश आहे. त्याला जनतेची चांगली साथ मिळते आहे. आमचे उमेदवार आम्ही जाहीर करूच, त्यांच्याकडून आमच्याकडे कोणी येणार असेल तर त्यांची पात्रता, उमेदवारीचे आमचे निकष पाहून आम्ही त्यांचेही स्वागत करू, ही लढाई जनतेच्या साथीनेच आम्ही जिंकणार आहोत असे , कडू व छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले.