मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मुंबईत भाकरी फिरवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सुमार कामगिरी करणा-या विद्यमान आमदारांचा पत्ता कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.
भाजपाकडून मुंबईत पाच आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून भाजपाच्या जुन्या नेत्यांचे विधानसभेत पुनर्वसन केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
वर्सोवा विधानसभेत विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांच्याऐवजी संजय पाण्डेय यांना उमेदवारी मिळू शकते. तर घाटकोपरमध्ये राम कदम यांचा पत्ता कट झाल्यास महायुतीचा चेहरा कोण असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
सायन मतदारसंघात कॅप्टन तमिल सेल्वन यांच्याऐवजी राजश्री शिरवडकर यांना संधी मिळू शकते. तर घाटकोपर पूर्व मतदारसंघात पराग शहा यांच्याऐवजी प्रकाश मेहता यांना पुन्हा संधी मिळू शकते.
बोरिवली मतदारसंघात सुनील राणे यांच्याऐवजी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.