जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
परमेश्वराचा व धर्माचा संबंध आहे. हा संबंध काय आहे हे समजले, तर आज धर्माधर्मामध्ये तंटेबखेडे, युद्धलढाया चाललेल्या आहेत ते होणार नाही. धर्माधर्माच्या नावांखाली आजपर्यंत खूप रक्तपात झाला. आता तर दहशतवाद धर्माच्या नावाखाली चाललेला आहे. हे सर्व काही प्रत्यक्षात धर्म म्हणजे काय हे माहीत नसल्यामुळे होते. धर्म कशाला म्हणतात हा पुन्हा प्रश्न आला. धर्माची व्याख्या म्हणजे ज्याने समाजाची सुरेख धारणा होते त्याला धर्म असे म्हणतात. साधी सोपी व्याख्या आहे. ज्याने लोक सुखी होतात त्याला धर्म असे म्हणतात. ज्याने राष्ट्र सुखी होते त्याला धर्म असे म्हणतात.
ज्याने विश्व सुखी होते त्याला धर्म असे म्हणतात. व्यक्तीपासून विश्वापर्यंत सर्वांचा एकमेकांशी संबंध आहे. समाज कसा निर्माण होतो? निरनिराळ्या व्यक्ती एकत्र आल्या की, समाज निर्माण होतो. समाजातून विभक्त झाल्या की ती व्यक्ती. निरनिराळे समाज एकत्र आले की, राष्ट्र निर्माण होते. निरनिराळी राष्ट्रे एकत्र आले की, विश्व निर्माण होते. विश्व जितके महत्त्वाचे तितकेच माणसेही महत्त्वाची आहेत. म्हणून जीवनविद्येने फक्त विश्वाचा विचार केला नाही, जीवनविद्येने फक्त राष्ट्राचा विचार केला नाही, जीवनविद्येने फक्त समाजाचा विचार केला नाही, जीवनविद्येने फक्त व्यक्तीचा विचार केला नाही, तर व्यक्तीपासून विश्वापर्यंत सर्वांचाच विचार केला.
जीवनविद्येत माणसे जेव्हा येतात तेव्हा ती सुखी होतात. गरीब माणूस सुद्धा सुखी होतो. गरीब माणसांकडे पैसे नसतात असे नाही. त्यांच्याकडे पैसे असतात. तो गरीब झालेला असतो कारण का त्याला व्यसने लागलेली असतात, जुगार खेळतो, गुटखा खातो, भांडणतंटे, खून, मारामारी करतो त्यातून कोर्टकचेऱ्या करतो. श्रीमंत माणसेही हे सर्व करतात. त्यामुळे गरीबही दुःखी व श्रीमंतही दुःखी. राजाही दुःखी व प्रजाही दुःखी. विद्वानही दुःखी व अडाणीही दुःखी. स्त्रीही दुःखी व पुरुषही दुःखी. म्हणून मी नेहमी सांगतो हे जग म्हणजे दुःखाचा कारखाना आहे. जगाचा एकेक माणूस म्हणजे दुःखाचा कारखाना आहे. कारण तो दुःखच निर्माण करत असतो. त्याला सुख निर्माण करण्याची कलाच माहीत नाही. सुख निर्माण करण्याची कला आहे हे माहीत नाही म्हणून तो दुःखाची निर्मिती करतो. सुखाची जर आपल्याला निर्मिती करायची असेल, तर आपल्याला परमेश्वर समजला पाहिजे. सगळे धर्म चांगलेच असतात आणि चांगलेच शिकवतात पण लोक वाईट करतात. त्याला धर्म तरी काय करणार व देव तरी काय करणार. सगळ्या धर्मांमध्ये सांगितले आहे की, सर्वांशी चांगले वागा, सर्वांवर प्रेम करा. सगळ्या धर्मांनी चांगले शिकवलेले आहे पण धर्म सांगणारे जे आहेत ते त्यांचा विपरीत अर्थ काढतात, संकुचित अर्थ काढतात व लोकांना संकुचित करतात. लोकांना इतके संकुचित करतात की, आमचा धर्म श्रेष्ठ, तुमचा धर्म कनिष्ठ. आमच्या धर्मात तुम्ही या म्हणजे तुम्हाला देव मिळेल, तुम्ही स्वर्गात जाल आणि तुमच्या धर्मात राहाल, तर नरकात जाल. हे काय देवाने यांना कानांत येऊन सांगितले का? धर्म तरी देव निर्माण करतो का? हे धर्म कुणी निर्माण केले? माणसाने. हे सगळे धर्म माणसाने निर्माण केले. हे धर्म तरी का निर्माण केले? माणसे सुखी व्हावेत म्हणून हे सर्व धर्म निर्माण झाले.
मी मघाशी म्हटल्याप्रमाणे परमेश्वराचा धर्माशी संबंध येतो. धर्म म्हणजे काय ज्याने समाजाची सुरेख धारणा होते त्याला धर्म असे म्हणतात. आता ज्याने म्हणजे कशाने हा प्रश्न आला. जीवनविद्या सांगते ज्याने म्हणजे शहाणपणाने. शहाणपण हा धर्माचा आत्मा आहे. शहाणपण नसेल, तर धर्म म्हणजे प्रेत. माणसाच्या ठिकाणी जर आत्मा असेल, तर तो जिवंत माणूस व आत्मा नसेल, तर तो प्रेत. तसे धर्माच्या ठिकाणी जर शहाणपण असेल, तर तो धर्म खरा आणि शहाणपण नसेल, तर तो धर्म खोटा.