प्राची गडकरी (डोंबिवली)
बाई बाळंतपणात असह्य कळा सोसत असते; परंतु जेव्हा बाळाच्या रडण्याचा आवाज तिच्या कानावर येतो, तेव्हा ती सगळ्या वेदना क्षणात विसरून जाते. जणू सगळ्या वेदनांचे रुपांतर आनंदातच होते. पण जेव्हा एखादे बाळ जन्मल्यानंतर रडतच नाही तेव्हा मात्र सगळ्यांना ही चिंतेची बाब होते. खूप वेळा डॉक्टर बाळाला अलगद चापटी मारतात किंवा बाळाला हलवतात जेणेकरून बाळ दचकून रडेल! परंतु त्या नंतरही मुल जर रडले नाही? तेव्हा मात्र डॉक्टरांना बाळाच्या जीवाला धोका संभवतो. असेच एकदा गोमांतकातील पालेय गावी, आंबिये घराण्यातील बाळ जन्मल्यानंतर अजिबात रडले नाही! वैदू, सुवीणीचा अनुभव, हकीम, तांत्रिक, मांत्रिक सगळ्यांनी प्रयत्न केले. पण बाळ काही केल्या रडायला तयार नाही. शेवटी वैदू म्हणाले बाळाची दृष्टी उर्ध्व आहे. आई-वडील तर भयभीत झाले. मंत्र-तंत्र सगळे उपाय पुन्हा पुन्हा केले. तेवढ्यात एका सिद्ध पुरुषाने बाहेरून जाता जाता, त्या घरातील ही धावपळ बघितली आणि तो सिद्ध पुरुष घरात शिरला! त्याने बाळ पाहाताच क्षणी सांगितले की, हे सामान्य बाळ नसून ते पुढे सिद्ध पुरुष होणार आहे. तुम्ही बाळाची अजिबात काळजी करू नका. हे ऐकल्यावर सगळी धावपळ क्षणात थांबली. बाळ कायम स्तब्धच असायचं! अशातच बाराव्या दिवशी बाळाचे बारसेही केले आणि बाळाचे नाव अच्युत ठेवले. याच दृष्टी उर्ध्व बाळाला संपूर्ण महाराष्ट्र आज संत सोहिरोबा म्हणून ओळखतो!
याच संत सोहिरोबांनी लिहिलेल्या पाच मुख्य ग्रंथांमुळे आज महाराष्ट्राची साहित्य संपदा समृद्ध आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘अच्युत’ लहानपणापासून केवळ देवाचे नाव घेत बसायचा! इतर मुले लगोरी, लपाछपी, चेंडू, विटी-दांडू खेळायची तेव्हा अच्युत देवाची पूजा, भजन, कीर्तन, प्रवचन यात गुंग असायचे.
वडिलांच्या शेतीकडे कधी ढुंकूनही त्यांनी पाहिले नाही. सगळे म्हणत अच्युतला अजिबात व्यवहारी ज्ञान नाही. दिवसभर ते इथेतिथे फिरत बसायचे. जागा मिळाली की, ध्यान लावून बसायचे. वेड लागायची पाळी त्यांच्यावर आली. लोक दहा तोंडांनी दहा गोष्टी त्यांच्या बद्दल बोलायचे. तेव्हा बाळ अच्युत म्हणायचे मोहमाया फोल आहे.
थोडे मोठे झाल्यावर ते सावंतवाडीला आले. तिथे त्यांनी आई-वडिलांच्या जबरदस्तीने राजश्री खेम सावंतवाडीत कुलकर्णी पणाचे काम पत्करले खरे पण त्यांचे सगळे लक्ष हरी चिंतनात असायचे. एकदा तर सोम सावंतांनी रागावून त्यांना विचारले “ तुला काय देव दिसतो का सगळीकडे? सारखा देवाशी बोलत असतोस! वेडा आहेस का तू?”
अच्युतराव शांत खाली मान घालून उभे होते. तेव्हा सावंत दरडावून म्हणाले माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. नाही तर मार खाशील आज फाटक्याचा! अच्युतरावांची पंचाईत झाली. काय बोलावे त्यांना कळे ना! कारण जर देव दिसत नाही असे म्हटले तर ते खोटे होईल. आणि देव दिसतो असे खरे सांगितले तरी आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. म्हणून ते गप्प उभे राहिले. तरी सोम सावंत प्रचंड चिडून मारणार इतक्यात अच्युतराव म्हणाले “ देव अनुभवाने जाणवतो. बोट दाखवून तो बघा देव अशी दाखवायची गोष्ट नाही. तो सर्वत्र आहे. हे चराचर त्या देवाने भरले आहे.”
अच्युतरावांचे बोलणे ऐकून आता सावंतांनी चाबूक हातात घेतला आणि अच्युतावर उगारणार इतक्यात सात्विक संतापाने मुक्त होऊन अच्युतराव समोरच्या भिंतीकडे बोट दाखवून म्हणाले तो बघा देव! सगळ्यांनी एकदम भिंतीकडे पाहिले, तर भिंतीतून अग्नीच्या ज्वाळा येत होत्या. आता सावंत पुरते घाबरले. क्षणात ज्वाळा शांत झाल्या. अच्युतराव म्हणाले घाबरू नका एक दिवस सगळ्यांना याच ज्वाळेतून परमेश्वरी प्रवास करायचा आहे. लोकांना त्या दिवशी अच्युतरावांची अध्यात्मिक ताकद समजली. एकदा असेच सावंतांनी तातडीने अच्युतांना वाड्यावर बोलवले. आपण नोकर आहोत.
मालकांचा हुकूम कसा मोडायचा म्हणून पूजा अर्धवट सोडून घाईघाईने ते सावंतांच्या दरबारी निघाले. प्रचंड भूक लागली होती. वाटेत त्यांना एक झरा दिसला. तिथे ते पोटभर पाणी प्यायले आणि देवाला नमस्कार करून माफी मागितली. तोच त्यांच्या मागे अजानुबाहू असलेली व्यक्ती उभी त्यांनी पाहिली.“ बाबू ! हमकू कुछ देता है?” असे म्हणत त्या व्यक्तीने झोळी पसरली. अच्युतांनी फणस फोडून गरे त्यात टाकले आणि विचारले कोण तुम्ही? ते म्हणाले मी गोरक्षनाथांचा शिष्य आणि निवृत्तीनाथांचा गुरू आहे. म्हणजेच मी गहिनीनाथ आहे. तुझी देवाप्रती तळमळ बघून तुला दिक्षा द्यायला आलो आहे. गहिनीनाथांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. आणि म्हणाले सोऽहं ध्वनी लक्ष ठेव. तू सोहिरानाथ होशील. गुरू मंत्र मिळताच ते आत्मचिंतनात मग्न झाले. पुढे त्यांना लोक सोहिरोबा म्हणूनच ओळखू लागले.
लोकांपासून दूर भरगच्च झाडीत ते साधनेला बसत. हळूहळू त्यांच्या वाणीतून पद्यरचना होऊ लागली. पण सावंतांची नोकरी सोडताना लेखणी त्यांनी सावंतांच्या पायाशी ठेवल्यामुळे त्या सुरुवातीला काही लिहिले नाही. लेखणी हाती घेतली नाही. पुढेपुढे त्यांची बाल विधवा बहीण त्यांच्या पद्यरचना लिहून ठेवू लागल्या. एकदा तर चुकून त्यांच्या आईने पद्यरचनाची पाने चुलीत टाकली. खूप रचना फुकट गेल्या. त्यानंतर मात्र त्यांच्या बहिणीने त्यांची प्रत्येक रचना जपून ठेवली. त्यातून पाच ग्रंथ तयार झाले. ते ग्रंथ म्हणजे अक्षयबोध, पूर्णाक्षरी, अद्वयानंद, महदनुभवश्वरी आणि सिध्दांतसंहिता. पुढे त्यांनी तिर्थक्षेत्र भेटी द्यायला सुरुवात केली. अक्कलकोट, काशी, गिरनार करत ते पंढरपूरला आले. तिथे त्यांचा बराच शिष्य समुदाय जमा झाला. लोकांच्या आग्रहाखातर पुढे सोहिरोबांनी तिथेच राहणे पसंत केले. लोकांनी नंतर त्यांच्या प्रेमापोटी पंढरपुरी आश्रमही बांधला. पुढे देहू, आळंदी, सुरत, गुजरात, उज्जैन यात्रा करताना त्यांचा प्रचंड शिष्य संग्रह झाला. तेथील लोकांनी सुद्धा त्यांच्यासाठी मठ बांधला. उज्जैनला त्यांनी रामनवमीचा उत्सव सुरू केला.
एकदा असाच उत्सव संपल्यावर सगळे शिष्यगण झोपले होते आणि अचानक गुरूंचा ध्वनी त्यांना ऐकू येऊ लागला. त्या ध्वनीत सोहिरोबा म्हणत होते की “मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ जालिंदरनाथ मला बोलवतायत म्हणून मी निघालो.”
सगळे शिष्य खडबडून जागे झाले. धावत सोहिरोबांच्या खोलीत गेले. कारण हा खरा ध्वनी आहे की खोटा हे त्यांना पडताळून पाहायचे होते. खोलीत गेल्यावर पाहिले, तर त्यांच्या झोपण्याच्या जागेवर धोतर, उपरणे, रूमाल, काठी सारे काही पडले होते. ते मात्र कुठे दिसत नव्हते. त्यानंतर मात्र सोहिरोबा कोणाच्याही दृष्टीस पडले नाहीत. आपल्या अनेक ग्रंथातून त्यांनी देव सर्वत्र असून गोरगरिबांची सेवा म्हणजे देवाची सेवा हा सक्षम विचार समाजाला दिला आहे.