Thursday, December 12, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृती‘पायोजी मैने... राम रतन धन पायो...’

‘पायोजी मैने… राम रतन धन पायो…’

ऋतुराज – ऋतुजा केळकर

ती गोड काव्य आहे हे. सद्गुरूंच्या, आपल्या परमपित्या परमेश्वराच्या प्राप्ती पुढे कुठले ही धन फिके आहे. सद्गुरूंच्या किंवा परमपित्या परमेश्वराच्या दर्शनाने, परिस स्पर्शाने आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जाते, पण मुलत: माणूस म्हणजे एक दुधाची चरवी आहे, ज्यात दही, दूध, तूप, ताक, पनीर असे सारे काही आहे. फक्त दुधापासून ते वेगळे करण्याची आपापली पद्धत ही वेगवेगळी आहे इतकचं.

दु:संगतीने किंवा कुसंस्कारानी नासलेले आयुष्य म्हणजे हे दूध फेकून न देता त्यावर आचार-विचारांचे सुयोग्य संस्कार करून, त्यांचे चवदार पनीरमध्ये म्हणजेच सज्जन व्यक्तीमध्ये परिवर्तन करण्याचे काम हे फक्त सत्पुरुषांचे एकट्याचे नसून आपणही सामान्य जन हे करू शकतो.

कसे आहे ना की, ज्याला सन्मार्गावर यायचे आहे, त्यांच्या मनात तो फक्त विचार जरी मनात आला ना तरी अर्ध मनमंथन हे सुरू होते. त्याकरिता कुठे बंद गुहेत तपश्चर्या करत एकांतात जाऊन बसण्याची मुळीच गरज नाही.जेव्हा मनाच्या बहरलेल्या मोगरी झाडाला क्रौर्याची, व्यापातापाची आणि ऋतुचक्राच्या कडक उन्हाळ्याची उष्ण हवा लागते ना तेव्हा स्वतःच्या नकळत माणसाची पावले दुःखविभोर वाटेवर पडू लागतात. दुःख, अवहेलनेच्या सूर्याच्या झळांनी तुटलेल्या स्वप्नांच्या माला हृदयभंगाच्या खोलवर झालेल्या जखमांनी विव्हळते. पण स्वप्न सरावास तगमगते मन हे संस्कारांमुळे म्हणा अथवा कर्मफळांमुळे म्हणा आयुष्याची चांगली वाट जेव्हा पुन्हा धरते तेव्हा खऱ्या अर्थी कपाळावरील प्राब्धनाची चंद्रकोर ही हळदफुलांच्या केशरगौरी गोंदणाने तेजस्वी होते.

समाजात अशी कितीतरी उदाहरणे आहेत की, जी संपूर्णपणे वाममार्गावरून परत आपल्या स्वकर्तृत्वाने, आपल्या ज्ञानाने तसेच अथक परिश्रमाने अंमल दुनियेचे स्वप्न नायक झाले आहेत.

फक्त पायात रिबाॅकचे शुज आले तरीही तप्त उन्हात साथ दिलेल्या खडावांना कधीही विसरू नये. तसेच यशाचा भरजरी शेला पांघरला तरी कठीण परिस्थितीतील अनुभवांचा जीर्ण शेला आत्म्याच्या कुशीत जपून, दडवून ठेवावा. कारण त्याने संघर्षमय पेचात आपल्याला वासनामय आणि विफल आयुष्यात दिलेले संरक्षण हेच खरे होते हे विसरून चालणार नाही.त्यामुळे नेहमीच आयुष्याच्या विरक्त संध्याकाळी वियोग आणि विरह ही जरी आत्मारूपी विराम स्थाने असली तरी निष्ठांच्या इमल्यांना आयुष्याच्या सांजवेळी आत्म्याच्या कळसाचा तोल ढळता ढळता भातुकलीच्या खेळास विराम देताना तरी आपला पत्त्यांचा डाव निर्मलपणे जिंकला जाईल अशीच कर्मांच्या दगडचिणीची आकृतीबंध करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -