शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची आदित्य ठाकरेंवर घणाघाती टीका
बालहट्टामुळे मेट्रो ३ प्रकल्पाचा खर्च १४००० कोटींनी वाढला
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई महापालिकेत टेंडरविना कंत्राटे देणे, कराराविना कामांचे वाटप आणि निधीचा गैरवापर करुन तुम्हीच महापालिका लुटली, असा कॅगचा अहवालच आहे. तुमच्या बालहट्टामुळे मेट्रो ३ चे काम तीन वर्ष रखडले आणि प्रकल्पाचा खर्च १४००० कोटींनी वाढला, त्यावर आधी उत्तर द्या, अशी घणाघाती टीका शिवसेना आमदार व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी आदित्य ठाकरेंवर केली. महायुती सरकारच्या कामांवर बोट दाखवण्यापेक्षा महापालिकेतील भ्रष्टाचारावर आदित्य ठाकरे यांनी बोलावे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
त्या पुढे म्हणाल्या की, कोविडकाळात तुम्ही सुजीत पाटकर, सूरज चव्हाण या कंत्राटदारांना कंत्राटे वाटली. मुंबई महानगर पालिकेचा कोविडकाळातील कारभार भ्रष्ट होता, असा अहवालच कॅगने दिलाय. कोरोना काळात महापालिकेतून झालेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या खर्चाचे कॅगने ऑडिट केले. यात ३५०० कोटी रुपयांची कामे ही कोरोना संबंधित होती. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. ६४ कंत्राटदार आणि बीएमसीत करार नसतांना देखील कामे आणि बिले दिली गेली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कामाचे बजेट वाढवले. माहिती तंत्रज्ञान विभागात निविदा न मागवताच टेंडर दिले गेले. त्यामुळे कोविडकाळात महापालिकेला कोणी लुटले हे कॅगच्या अहवालातून समोर आले, असे डॉ. कायंदे म्हणाल्या. मागील सव्वा दोन वर्षात मुंबईत कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो ३ असे प्रकल्प पूर्ण झाले, असे त्या म्हणाल्या.
महाविकास आघाडीच्या काळात बदनाम सचिन वाझे याला तुम्हीच पुन्हा पोलिस सेवेत घेतले आणि १०० कोटींचे वसुलीचे टार्गेट दिले होते. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये गेले. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर तुम्ही बोलणे आश्चर्य आहे, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावला. तुमच्या पक्षाचे उमेदवार जिंकले की ईव्हीएम चांगले आणि हरले की ईव्हीएम वाईट असा राऊत सोयीनुसार संशय व्यक्त करतात, अशी टीका त्यांनी केली.
आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे मेट्रो कारशेडला तीन वर्ष उशीर झाला आणि १४००० कोटींनी या प्रकल्पाचा खर्च वाढला. लोकलमधील गर्दीमुळे लोकांचे हातपाय तुटतात. प्रवासी प्लॅटफॉर्मवर प़डतात. महिलांना लोकलमधील चेंगराचेंगरीचा सामना करावा लागतो. मुंबईच्या लोकलमधून केवळ तीन वेळा प्रवास करणाऱ्या आदित्य ठाकरेंना लोकांचे हाल काय कळणार, अशी टीका त्यांनी केली. मेट्रो प्रकल्प तीन वर्ष रखडवण्याचे पाप कुठे फेडणार, असा सवाल डॉ. कायंदे यांनी यावेळी आदित्य ठाकरेंना केला.
धारावीकरांचा पुनर्विकासाचा प्रश्न २० वर्ष रखडला होता. अदानी अंबानी यांच्या नावाने खडे फोडतात मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही त्यांच्याबरोबर उठता बसता, त्यांच्या लग्न समारंभात जाता. तुम्ही आणि तुमच्या काँग्रेसमधील मित्रांना धारावीकरांना झोपडपट्टीतच ठेवायचंय अशी टीका त्यांनी यावेळी केली.