ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
अठराव्या अध्यायाचा समारोप होतो आहे. तेव्हा ज्ञानदेव गीतेचा महिमा सांगत आहेत. त्या रसाळ ओव्या अशा आहेत.
‘किंवा अज्ञानरूपी जो अंधकार, त्याला प्रतिज्ञेने जिंकणारे हे सातशे श्लोक नसून हे सातशे सूर्यच श्रीकृष्णांनी गीतेच्या रूपाने प्रकाशित केले आहेत.’ ओवी क्र. १६६७
‘किंवा संसारमार्गाने चालणाऱ्यांना जे श्रम झाले आहेत, त्यांचा परिहार होऊन विसावा घेण्याकरिता सातशे श्लोक हे द्राक्षांचे वेलच असून ते गीतारूप मांडवावर पसरले आहेत.’
ही मूळ ओवी अशी की,
‘श्लोकाक्षर द्राक्षलता। मांडव जाली आहे गीता।
संसारपथश्रांता। विसंबावया॥ ओवी क्र. १६६८
‘श्रांत’ शब्दाचा अर्थ आहे ‘थकलेले’.
अपार असे वेदवाङ्मय! त्याचे मंथन करून श्रीव्यासमुनींनी ते सूत्ररूपाने आणले ‘गीता’ या ग्रंथातून. संपूर्ण जीवनाचे सार सांगणाऱ्या या गीतेत सातशे श्लोक आहेत. हे श्लोक किती मौलिक आहेत, हे सांगताना माउलींनी अप्रतिम दृष्टान्त दिले आहेत. त्यांतील काही दाखले आता पाहूया-
ज्ञानदेव म्हणतात की, ‘हे श्लोक नव्हेत, तर श्रीकृष्णांनी प्रकाशित केलेले सातशे सूर्यच होय.
किती यथार्थ उपमा आहे ही! सूर्य हा तेजाचा गोळा! साऱ्या जगाचा अंधार नष्ट करून प्रकाशित करणारा तो सूर्य! या सूर्याप्रमाणे गीतेच्या एकेका श्लोकात शक्ती आहे. मानवी मनातील अज्ञान, अंधकार दूर करतो यातील प्रत्येक श्लोक. हे अज्ञान स्वतःविषयीचे तसेच सृष्टी विषयीचे आहे. ‘मी’ म्हणजे शरीर होय, कर्म करणारा मी आहे हासुद्धा भ्रम आहे. गीतेचा प्रत्येक श्लोक हा भ्रम दूर करतो. त्यामुळे माणसाचे मन उजळते. म्हणून गीता सांगणारे भगवान म्हणजे सूर्य उजळवणारे श्रीकृष्ण होय.
पुढची कल्पना केली आहे की, गीता हा मांडव आणि श्लोक ही द्राक्षांची वेल आहे. ही कल्पनाही किती साजेशी आहे! एरवी चालताना दमायला झाले की, माणूस विसावा घेतो एखाद्या बागेचा, सावलीचा. या संसारात चालताना विवंचनांनी माणूस मेटाकुटीला येतो. मग त्याला विसावा मिळतो गीतारूप मांडवातील श्लोकरूपी वेलीचा. वेल दिसायला नाजूक वाटते, पण बळकट असते. त्याप्रमाणे हे श्लोक आकाराने लहान आहेत, पण त्यांच्या ठायी अफाट शक्ती आहे मनपरिवर्तनाची! त्यात अर्क साठवलेला आहे तत्त्वज्ञानाचा! अजून एक सूचकता या दाखल्यात आहे. वेल हिरवीगार, रसरशीत असते. पुन्हा ही द्राक्षांची म्हणजे फळाची, गोडवा असलेली आहे. त्याप्रमाणे गीतेच्या श्लोकांमध्ये मन उत्साहित, क्रियाशील करण्याची शक्ती आहे. माणसाला मार्गी लावून त्यांचे आयुष्य मधुर, रसाळ करण्याची शक्ती आहे.
इतक्या रसाळ भाषेत माऊलींनी गायिली आहे गीतेची महती!
ते पाहून सारे जन ‘गीता’ वाचती
ती वाचून सर्वांची स्थिर होते मती!