Wednesday, December 4, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यगुन्हेगाराला साथ देणारे सर्वात मोठे गुन्हेगार असतात...

गुन्हेगाराला साथ देणारे सर्वात मोठे गुन्हेगार असतात…

गुन्हा लपवू लागणाऱ्या, साथ देणाऱ्या व्यक्तीचे मानसशास्त्र काय असते. आपण दररोज समाजात अनेक प्रकारचे गुन्हे घडताना बघतोय. दिवसेंदिवस गुन्हे, गुन्ह्याचे वेगवेगळे नवनवीन प्रकार, गुन्हेगारी वृत्ती अगदी बाल गुन्हेगारापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत गुन्हेगारांची संख्या आपल्याला वाढताना दिसते. गुन्हेगार का निर्माण होतो? त्याची मानसिकता काय असते? त्यामागील मानस शास्त्र काय सांगते हे आपण पुढील लेखात पाहणार आहोत. या लेखात आपण हे पाहणार आहोत की, मुळात जन्मजात कोणीच गुन्हेगार म्हणून जन्माला आलेले नसते. स्वतःच्या वाईट बुद्धीने, स्वतःच्या चुकीमुळे, स्वार्थासाठी, फायद्यासाठी, रागातून, बदल्यातून एखादी व्यक्ती गुन्हा करते हे आपण मान्य करू शकतो.

फॅमिली काऊन्सलिंग – मीनाक्षी जगदाळे

आजकाल ऑगनाईज क्राईम म्हणजेच अनेकांनी एकत्र येऊन गुन्हा करणे अथवा एकाने गुन्हा करणे पण त्याला अनेकांनी मदत करणे, त्यात साथ देणे, त्याच्या गुन्ह्यांना पाठीशी घालणे, गुन्ह्यातील पुरावे लपवणे, गुन्हेगाराला लपायला अथवा पळून जायला मदत करणे, त्याच्या चुकांची वकिली करणे, समाजाची, लोकांची दिशाभूल करणे, गुन्हेगाराबाबतची खरी माहिती, सत्य घटना, त्याने केलेल्या गुन्हेविषयक घटना, प्रसंग लपवणे यांसारख्या गोष्टी प्रचंड प्रमाणात वाढलेल्या दिसतात. समाजातील सर्वच प्रकारची गुन्हेगारी वाढण्यामागे अनेक कारणांपैकी अजून कोणतेही महत्त्वाचे कारण असेल तर ते म्हणजे गुन्हेगारांना पाठीशी घालणारे लोकं, गुन्ह्यात सहभागी होऊ लागणारे लोकं, सामुदायिक गुन्हे करण्यासाठी तयार झालेली प्रवृत्ती. अगदी आपल्या घरात, कुटुंबात, आजूबाजूला, समाजात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांना दुर्लक्षित करण्याची वृत्ती. एखाद्याचा खून करणे, दरोडा टाकणे, डाका टाकणे म्हणजेच गुन्हा नसून अनेक छोटे छोटे चुकीचे कृत्य करण्यापासून गुन्हेगारी सुरू होते.

एखाद्या लहान मुलाने घरात दहा रुपये चोरले तरी आपण त्याला मारतो, रागावतो कारण तिथे दहा रुपये महत्त्वाचे नसतात तर त्याने तसे करायचे धाडस करणे आणि त्याला अटकावं न् करणे म्हणजे भविष्यात तो दहा लाख, दहा कोटींपर्यंत पैशाचा अपहार करणारा अट्टल गुन्हेगार तयार करणे होय.
ज्या समाजात आपण राहतोय तिथे रोज आपण गुन्हेगार तयार होताना पाहतो, गुन्हे घडताना पाहतो पण काय आणि किती प्रयत्न करतो आपण ते थांबवण्याचा? एक जागरूक नागरिक म्हणून, कुटुंबातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून, समाजाचा भाग म्हणून आपल्याच आजूबाजूला बिनधास्त वावरणाऱ्या गुन्हेगारांना आपण कधी थांबवतोय का हा प्रश्न स्वतःला विचारणे आवश्यक आहे. राजरोस सातत्याने अनेक कुटुंबात महिलांच्या विरोधात गुन्हे घडतात, हिंसाचार घडतात, मानसिक खच्चीकरण घडते, विवाहिताना आत्महत्या करायला प्रवृत्त केले जाते. दररोज आपल्याच परिसरात चोऱ्या होतात, घरफोडी होती, चेन स्नॅचिंग होते. सातत्याने लहान मुलींवर अत्याचार, बलात्कार होतात आपल्याच समाजात आजूबाजूला लोकं महिलांची छेड काढतात, आपल्याच घरातले पुरुष सुद्धा असू शकतात जे बाहेरील महिलांकडे वाईट नजरेने पाहत असतील, त्यांना चुकीचा स्पर्श करत असतील. दररोज आपल्या प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईलचा वापर कितीजण सायबर क्राईमसाठी करतात. आपल्या बाजूलाच बसलेला आपला मित्र, आपल्याच घरातील आपला जवळचा कोणी कोणत्या तरी प्रकारचा सायबर क्राईम करत असेल ही आपण त्याकडे जागरूकपणे लक्ष देतो का?
खूप ठिकाणी हेच पाहायला मिळत की, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला जोपर्यंत काही इजा होत नाही, त्रास होत नाही, आपण भरडलं जात नाही तोपर्यंत जे चाललं आहे ते चालू द्या. आपल्या या मनोवृत्तीमुळे समाज व्यवस्था किती विस्कळीत होते हे आपण लक्षात घेत नाही. समाजाची सुरुवात मुळी कुटुंबापासून होते. अनेक कुटुंबं, अनेक कुटुंबातील लोकं मिळून समाज बनतो. आपली प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की, आपल्या घरातली कोणतीही व्यक्ती गुन्हा करण्याच्या मार्गावर नाही ना? त्याची मानसिकता तशी नाही ना? त्याची संगत चुकीची नाही न् हे वेळोवेळी पडताळून पाहणे. अगदी स्वतःला सुद्धा आपण सातत्याने या बाबतीत प्रश्न विचारले पाहिजेत आणि आपल्या घरातल्या सदस्यांना पण आपण याबद्दल विचारणा करणे आपला हक्क आणि कर्तव्य आहे.

आपल्या स्वतःच्या बाबतीत आपण कोणाच्या चुकीच्या बोलण्यात, वागण्यात येत नाहीये ना? चुकीच्या कामासाठी कोणी आपला वापर करत नाहीये ना? कोणी स्वतःच्या चुकांना झाकायला आपला बळी तर देत नाहीये ना याबद्दल सजग राहणे आवश्यक आहे. आपण सर्वजण नातेसंबंध प्रेम भावना, आपुलकी यात इतके गुरफटलेलो असतो की, आपल्या जवळच कोणी काही चुकीचे करेल जे कायद्याच्या दृष्टीने गुन्हा असेल हे आपल्या मनाला पटत नसतं म्हणून आपण भावनांवश होऊन ती गोष्ट, ती घटना टाळून देतो, त्यावर त्या व्यक्तीला जाब विचारत नाही, खोलात जात नाही. आपल्या विश्वासाला तडा जाईल असे आपल्याला काहीही होऊ द्यायचे नसते म्हणून आपण त्या ठिकाणी कठोर भूमिका न घेता एकतर अलिप्तपणा दाखवतो अथवा अति प्रेमात यामध्ये आणून जे चालले आहे त्याकडे कानाडोळा करतो. यावेळी आपण त्या गुन्हेगारी वृत्तीला अधिक प्रोत्साहन आणि आत्मविश्वास देतो आहे हे मात्र विसरून जातो.

उदाहरणार्थ घरातील तरुण मुलगा जर एखाद्या मुलीची छेड काढून आला तर आईने अथवा त्याच्या घरच्यांनी त्याला फटकारणे, इथून पुढे तो असे करणार नाही याची हमी त्याच्याकडून घेणे, वेळीच त्याला दोन कानाखाली देणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने अनेक ठिकाणी मुलाचे पालक उलट भूमिका घेतात आणि मुलीलाच दोष देतात. आजकाल मुलीचं मुलांना प्रतिसाद देतात, कमी कपडे घालतात, ती तशीच असेल, तिनेच याला आकर्षित केलं असेल वगैरे वगैरे. या ठिकाणी जरी मुलगी १००% चुकीची आहे असे गृहीत धरले तरी त्याचा अर्थ आपल्या मुलाने मर्यादा ओलांडावी असा त्याला परवाना मिळालेला नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्याच घरचे जर आपल्या चुकीवर असे समर्थन करत असतील तर नक्कीच या मुलाची हिम्मत वाढेल आणि पुढील वेळी तो फक्त मुलीची छेड काढून थांबणार नाही, तर अधिक काहीतरी गंभीर घटना त्याच्या हातून घडेल. आपलं नातं, आपल्या माणसाबद्दल आपल्याला असलेलं प्रेम, विश्वास जोपर्यंत खरा आहे तोपर्यंत त्याच्या पाठीशी निश्चित उभे राहावे पण आपल्याला थोडी सुद्धा चाहूल त्याच्या वाईट वळण्याची, वाईट मार्गाची लागली तर कडक भाषेत, कठोर भूमिकेत विरोधात उभे राहणे पण त्याच्या तसेच आपल्याही भल्याचे असते.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -