मतदार यादीत नाव कसे नोंद करायचे?
मतदानाचा टक्का वाढवावा : मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे आवाहन
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
मतदार यादीत नाव नोंदणीची १९ ऑक्टोबरपर्यंत संधी
मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी एका टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी येथे केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमासंदर्भात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.
मतदार यादीत नाव कसे नोंद करायचे?
अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना दि. १९ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही,अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा,असे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले.
एकूण ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदार
राज्यात पुरुष मतदारांची संख्या ४ कोटी ९७ लाख ४० हजार ३०२ इतकी असून महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख २३ हजार ७७ इतकी तर तृतीय पंथी मतदारांची संख्या ६ हजार ३१ इतकी आहे. आतापर्यंत एकूण ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला असे प्रमाण आहे. सन २०१९ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ९२५ इतके होते. यामध्ये वाढ होण्याच्यादृष्टीने महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात आल्याने २०२४ मध्ये या प्रमाणात ९३६ अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.
सध्याच्या मतदार यादीत १८-१९ वर्षे वयोगटामधील नव मतदारांची संख्या २० लाख ९३ हजार २०६ एवढी आहे. याशिवाय १ लाख १६ हजार ३५५ इतक्या सेनादलातील मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अद्ययावत मतदार यादीमध्ये ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १२ लाख ४३ हजार १९२ इतकी आहे. यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मतदार यादीतील ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांपैकी ४७ हजार ७१६इतके मतदार १०० वर्षावरील आहेत.