सर्वांनीच त्याग केला, त्यामुळे आता शिंदेंनी त्याग करावा
मुंबई : उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली, त्यांचे सरकार आले. शिंदेंनी मोठं मन केलं, ते आमच्याकडे आले. अजितदादाही त्रासाला कंटाळून आले, त्यांचाही त्याग आहे, आमचाही त्याग आहे, सर्वांचाच त्याग आहे. मात्र कोणाचा किती त्याग याचे परिमाण लावता येत नाही. त्यामुळे आता ती वेळ आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठ्या मनाने त्याग करावा, असा सल्ला महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिला आहे. तसेच आपापली समज घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठं मन करुन युती पुढे नेली पाहिजे. ताणतणाव करुन पराभव होणे कुणाला परवडणारे नाही, मुख्यमंत्री तेच आहेत त्यामुळे त्यांनी आम्हाला जास्त जागा द्यायला हव्या, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीत विद्यमान आमदार आणि गेल्या विधानसभेला थोड्या फरकांनी भाजपा हरलेल्या जागांवर चर्चा होईल. जागावाटपाबाबत अद्याप काही ठरलेलं नाही; ज्याचं पारडं जड, त्याचा विचार होईल, काही नावं अंतिम होतील, मग टप्प्याटप्प्याने जाहीर होतील. असे असले तरी अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या विद्यमान मतदारसंघांवर कुठेही चर्चा नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
जे अन्य मतदारसंघ आहेत, त्यावर तिन्ही पक्षांकडून चाचपणी सुरु आहे. तो कुणाला सुटेबल आहे, याची तपासणी सुरु आहे. आमची सीट आहे, पण शिवसेनेकडे तुल्यबळ उमेदवार आहे, किंवा राष्ट्रवादीकडे सीट आहे आणि आमचा उमेदवार तगडा आहे, तर त्याबाबत चर्चा सुरु आहे. जिथे भाजपा मजबुतीने लढू शकते, तिथे आजच्या बैठकीत चर्चा होईल, असेही बावनकुळेंनी सांगितले. काही ठिकाणी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली. समजा राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार तुल्यबळ आहे, पण भाजपाचा आमदारही तुल्यबळ आहे, तिथे दोघांच्या स्पर्धेत ज्याचे पारडे जड, त्याचा विचार होईल, असेही ते म्हणाले.
१०५ आमदारांचे केंद्रीय भाजपाने सर्वेक्षण केले आहे. जिथे अँटी इन्कम्बन्सी असेल, किंवा जिथे हरण्याची शक्यता आहे, तिथे विचार केला जाईल. एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे काय बोलणे झाले माहिती नाही. मात्र ही गोष्ट खरी की मुख्यमंत्रिपद हे प्रचंड प्रमुख असते. कारण सरकार त्यांच्या नावे असते. त्यामुळे एकनाथ शिंदे सरकार म्हणतो. आमचाही आग्रह असतो, एवढा मोठा पक्ष, संघटना आहे, इतके आमदार आहेत. आम्हालाही पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना सांभाळावे लागते. त्यामुळे दोन गोष्टी आम्हाला जास्त द्याव्यात, सरकारमधील काही गोष्टी जास्त मिळाव्या, काही समित्या महामंडळं मिळायला हव्यात, संख्याबळानुसार शिंदेंनी आमच्याही पाठी राहिले पाहिजे, अशीही आमची मागणी असते. अमित भाई काय म्हणाले माहिती नाही, असे बावनकुळे म्हणाले.