नवी दिल्ली : भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवी दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू आहे. यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत पोहोचले आहेत.
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक संध्याकाळी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात होत आहे.
या बैठकीला पीएम मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर सीईसी सदस्य उपस्थित आहेत.
बैठकीला जाताना बावनकुळे म्हणाले की, आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे, त्यात भाजपाच्या सध्याच्या जागेवर चर्चा होणार आहे. मला वाटतं, आमच्या पक्षाच्या बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत. आधी विद्यमान जागांवर निर्णय घ्यायचा आणि नंतर उर्वरित जागांवर निर्णय घ्यायचा आहे.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपण काही गोष्टी शिकलो आहोत. मोदीजींनी भारताचा विकास करण्याचे वचन दिले आहे, असे म्हणत आम्ही निवडणूक लढवली. आम्ही विकसित भारतासाठी मते मागत राहिलो आणि काँग्रेस पक्ष खोटे बोलत राहिला. काँग्रेसने जनतेत संभ्रम निर्माण केला. ते म्हणाले की, २०१४ साली भाजपाने महाराष्ट्रात २६० जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी १२२ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये १०५ जागा जिंकल्या होत्या. राज्यात भाजपाच सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला व आहे.