Thursday, July 3, 2025

धक्कादायक घटना! पेट्रोल टँकर उलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी अन् तेवढ्यात मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू

धक्कादायक घटना! पेट्रोल टँकर उलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी अन् तेवढ्यात मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
नायजेरिया : नायजेरियामधून एक भयंकर घटना समोर आली आहे. पेट्रोल टँकरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात ९४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मृत्यांची संख्या वाढण्याची आणखी भीती आहे. ५० जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

उत्तर नायजेरिया येथील जिगावा राज्यातील एका गावातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल टँकरचा अपघात झाला होता. चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर रस्त्यात पलटी झाला. टँकरमधून यावेळी पेट्रोलची गळती सुरू झाली, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली. लोक पेट्रोल गोळा करत होते. यावेळी अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात ९४ जणांचा मृत्यू झाला.

नायजेरियामधील बहुतांश अपघात हे खराब रस्त्यांमुळे होतात. गेल्या महिन्यात, नायजेरियाच्या उत्तर-मध्य नायजर राज्यात इंधन टँकर आणि ट्रकची धडक झाली. टक्कर झाल्यानंतर एक स्फोट झाला, यामध्ये किमान ४८ जणांचा मृत्यू झाला होता.

नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल टँकर अपघाताची १५०० हून अधिक प्रकरणे २०२० मध्ये नोंदवली गेली आहेत. या अपघातांमध्ये ५३५ जणांचा मृत्यू झाला तर १,१४२ जण जखमी झाले आहेत.

 

 
Comments
Add Comment