९९ वर्षांच्या राष्ट्र जीवनातील वाटचालीत, राष्ट्र जीवनात अनेक प्रसंग आले ज्यावेळी संघाची परीक्षा बघितली गेली. पण संघाने या सर्व परीक्षा पास केल्या. अनेक अडथळे निर्माण झाले. संघाने ते सर्व अडथळे दूर केले. अनेक प्रसंगात संघाची निर्णायक भूमिका देशाच्या दृष्टीने, हिंदू समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. संघाने स्वातंत्र्य लढ्यात काय केले? असा प्रश्न मानभावीपणे विचारला जातो. अर्थात संघ स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून प्रमाणपत्र गोळा केली नाहीत हे जरी खरे असले तरी पण देशाच्या स्वतंत्र होण्याच्या दरम्यान आजच्या पाकिस्तानात आणि त्यावेळी असलेल्या पंजाब, सिंध प्रांतात हिंदू समाजाला सुरक्षित परत पोहोचवण्यासाठी हजारो, लक्षावधी कार्यकर्त्यांनी प्राण गमावले हे सत्य आता तरी स्वीकारण्याची गरज आहे.’ ‘शेवटचा हिंदू परत येईपर्यंत आपली जागा सोडू नका’ हा गुरुजी यांचा आदेश पाळणाऱ्या स्वयंसेवकांचे ते समर्पण होते.
रवींद्र मुळे
१९४८ ला झालेले काश्मीरवरील आक्रमण आणि नंतरच्या ६२, ६५, ७१ या तिन्ही युद्धात संघ कार्यकर्त्यांनी सेवेचे आणि राष्ट्रधारणेचे जे उदाहरण पेश केले त्याचे मूल्यमापन करण्याची गरज आहे. आपला छळ करणारे, आपल्याला वैचारिक शत्रू मानणारे सरकार असताना युद्ध प्रसंगी वयम् पंचाधिक शतम् ! चा प्रत्यय प्रत्येक वेळी संघ नेतृत्वाने दाखवून दिला. समाजातील चुकीच्या रूढी परंपरा नाकारण्यासाठी आणि समरस हिंदू समाज उभा करण्यासाठी संघाने घेतलेला पुढाकार फार महत्त्वाचा आहे. या बाबतीत दोन उदाहरणे महत्त्वाची आहेत. पेजावर पीठाचे स्वामी विश्वेश्वरतीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली उडप्पी येथे झालेल्या धर्माचार्य संमेलनात ‘न हिंदू पतीतो भवेत’ असा ठराव पारीत झाला. त्यावेळी त्यासाठी पुढाकार घेतला होता तत्कालीन सरसंघचालक पूजनीय गुरुजी यांनी हा ठराव संमत झाला आणि पूजनीय गुरुजी यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू वाहायला लागले. त्या नंतर १९७४ साली पुणे येथे प्रसिद्ध वसंत व्याख्यान मालेत समरसता या विषयावर तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी ‘अस्पृश्यता वाईट नसेल तर जगात कुठलीच गोष्ट वाईट नाही ‘ असे स्पष्ट पणे म्हंटले आणि पुढे जाऊन अशा प्रथा थांबवून, समाज जीवनातून फेकून दिल्या पाहिजेत असे निक्षून सांगितले.
आरक्षण या विषयावर नेहमी संघाबद्दल भ्रम पसरवले जातात की, संघ आरक्षण विरोधी आहे; परंतु सर्व सर संघचालक नेहमी हेच प्रतिपादन करत आले आहेत की, सामजिकदृष्ट्या मागे राहिलेल्या सर्व हिंदू बांधवांना एका रेषेत आणेपर्यंत आरक्षण हे चालूच राहिले पाहिजे आणि एक वेळ अशी आली पाहिजे की, आमच्या बंधूनीच त्याला नको म्हंटले पाहिजे. हीच त्याची कालमर्यादा आहे. ही जरी theory असली तरी प्रत्यक्ष राष्ट्र जीवनात याची परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग आले. आपल्या महाराष्ट्रातच मराठवाडा विद्यापीठाला पूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रसंग आला. संघाने आणि संघ विचारातील संघटनांनी गावागावांत जनजागरण यात्रा करत समाजातील दुही रोखण्यासाठी जीवाची बाजी लावली. याच भावनेने राममंदिर निर्माणाचा शीलान्यास एका तथा कथित दलीत बंधूंच्या हस्ते करण्यात जी सहजता दाखवली ती समरसता किती नैसर्गिक भावना असू शकते याचे दर्शन देणारी ठरली. तत्त्वाला व्यवहारात आणण्यासाठी काही कृती असावी लागते. जाती निर्मूलन अंतिम उद्दिष्ट आहेच पण तोपर्यंत जाती-जातीत असणारे कंगोरे दूर करणारे अनेक कृतिशील कार्यक्रम संघाने, स्वयंसेवकांनी आखले चालू ठेवले त्यातील उल्लेखनीय म्हणजे संघाच्या धर्म जागरण विभागाने सुरू केलेले पूजा प्रशिक्षण वर्ग होय! यात विविध जातीतील पौरोहित्य करणारे पुरोहित दरवर्षी शिकतात आणि आपल्या आपल्या ठिकाणी पौरोहित्य करतात. पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला चोखोबा आसुसले होते त्याच चोखोबांच्या अनेक वारसदारांना आज प्रत्यक्ष पांडुरंगाची पूजा करता येते ही सामाजिक क्रांती संघाने न बोलता शांतपणे करून दाखवली.
भटक्या, विमुक्त जाती, जमाती यांच्यावर ब्रिटिश काळापासून अनेक कायद्याच्या आधारावर अन्याय होत होते. तीच गोष्ट होती आमच्या वनवासी बंधूंच्या बाबतीत. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्यात लढावूपणे उभा राहिलेला हा समाज! गरज होती रचनात्मक पद्धतीने या समाजासाठी कार्य करण्याची. धर्मांतराच्या हेतूने काम करणाऱ्या मिशनरी मंडळी यांची रेषा संघाच्या ध्येयवादी कार्यकर्ता बंधू-भगिनीनी आपल्या समर्पित वृत्तीतून उभ्या केलेल्या सेवा कार्यातून कधी छोटी केली हे कळलेच नाही. अर्थात रेष छोटी करण्यापेक्षा परिवर्तन महत्त्वाचे होते आणि मग हे बदल शहरी वस्त्यांपासून ते सुदूर, दुर्गम आदिवासी पाडे आणि पूर्वांचलात पण दिसू लागले. महाराष्ट्रात तुळजापूरजवळ असलेले आणि चिंचवडजवळ असलेले गिरीश प्रभुणे यांचे कार्य विशेष उल्लेखनीय म्हणावे लागतील. या प्रकल्पातून व्यक्ती निर्माण करणारी अनेक मनोज्ञ उदाहरणे समोर आली. वसतिगृहात कामाला येणाऱ्या ठमताई पवार या देशभर पूर्ण कलीक कार्यकर्त्या बनल्या. अकोल्याच्या वसतिगृहातील एक विद्यार्थी डॉक्टर, तर एक पट्टेवाल्याची नोकरी करून पीएच. डी. झाला अशी अनेक उदाहरणे आहेत.
देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी १९७५ साली लढा देण्याचा प्रसंग आल्यावर तो लढा संघाच्या स्वयंसेवकांनी जीवाची बाजी लढवत लढला. संघाचे शीर्शस्थ नेतृत्व स्थानबद्ध असताना अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले आणि अनेकांनी सत्याग्रह केला. त्यावेळी सगळी कारागृहे संघाच्या स्वयंसेवकांनी भरलेली होती. संघाचे स्वयंसेवक त्यानंतर संधी असूनही कुठल्याही सत्तेच्या जवळपास पण फिरकले नाहीत. देशाच्या उत्तरेला अयोध्या येथील प्रभू रामचंद्र यांचे मंदिर आणि दक्षिणेत कन्याकुमारी येथे उभे असलेले विवेकानंद स्मारक हे संघ नेतृत्वाच्या दूरदृष्टीचे द्योतक म्हणावे लागेल. माननीय अशोक सिंहल आणि माननीय एकनाथ रानडे या दोन अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचे या दोन्ही वास्तू प्रतीक आहेत. एकात्म हिंदू समाजासाठी अखंड प्रेरणा देणाऱ्या या वास्तू आहेत. अयोध्येतील रामजन्मभूमी लढा हा हिंदूंच्या एकत्वासाठी निर्णायक ठरला. मुख्य म्हणजे देशातील निवडणुकीच्या राजकारणात संदर्भहीन बनलेला हिंदू समाज आता दुर्लक्षून चालणार नाही, हा बोध येथील सर्वच पक्षांना कमी अधिक प्रमाणात यानिमित्ताने झाला त्याला संघाने केलेली जनजागृती कारणीभूत आहे.
जवळजवळ ४० विविध प्रकारच्या संस्था, संघटना संघ, स्वयंसेवकांनी उभ्या करत सहकार ते कामगार, उद्योग ते सेवा, राजकारण ते विद्यार्थी, कला, क्रीडा ते धार्मिक क्षेत्र या सर्व क्षेत्रांत आपल्या राष्ट्रीय विचाराचा ठसा उमटवला आहे. पूजनीय गुरुजी यांनी एकदा एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘Yes we want to dominate every walk of life’ असे म्हटले होते. ते गेल्यानंतर जवळपास ५० वर्षांनी त्यांचे हे विधान सत्यात उतरत आहे. अर्थात हे घडले आहे ते अनेक अनामिक चेहरा नसलेले कार्यकर्ते, अनेक परिवार यांनी न भूतो न् भविष्यती. अशा केलेल्या त्याग आणि समर्पण यामुळे आहे. नाही चिराग, नाही पणती असे त्यांची स्थिती असली तरी देशासाठी जगणे म्हणजे नेमके काय याचे उदाहरण लक्षावधी कार्यकर्त्यांनी गेल्या ९९ वर्षांत घालून दिले आहे. संघाची शताब्दी जवळ आली आहे. त्यासाठी संघानेपण काही उद्दिष्ट नक्की केली आहेत. अर्थात ती उद्दिष्टे या देशाच्या हिताची आणि समाजाच्या हितासाठीच आहेत. स्वतःचा गौरव गान करत आत्मस्तुतीत मग्न होण्यापेक्षा आपल्या समर्पित कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांच्या बळावर ती उद्दिष्ट पार करताना भारताला विश्वगुरू बनवण्याचे लक्ष संघाला साधायचे आहे.