नवी दिल्ली : टीम इंडियाने (Team India) बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवले. तर दुसरीकडे न्यूझीलंडला मात्र श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. आता उद्यापासून भारत-न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. मालिकेतील पहिला सामना १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर होणार आहे.
मालिकेतील दुसरा सामना २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुण्याला तर तिसरा सामना १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला भारताचा सिक्सर किंग बनण्याची मोठी संधी आहे. बांगलादेश विरूद्ध भारतीय कर्णधार रोहित शर्माने अप्रतिम नेतृत्वकौशल्य दाखवले. पण त्याला फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. पहिल्या कसोटीमध्ये रोहितने ६ आणि ५ धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यात २३ आणि ८ धावा केल्या. रोहित चारही डावांमध्ये अपयशी ठरला. पण या मालिकेत त्याला धावा करणे आवश्यक आहे.
त्यासोबतच रोहितकडे भारताचा कसोटी सिक्सर किंग बनण्याचीही चांगली संधी आहे. रोहित शर्माने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ८७ षटकार लगावले आहेत. भारताकडून कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या वीरेंदर सेहवागच्या नावे ९१ षटकार आहेत. त्यामुळे रोहित या सामन्यात किंवा मालिकेत ५ षटकार मारुन सिक्सर किंग बनू शकतो.