Wednesday, January 22, 2025
Homeताज्या घडामोडीBEST Bus : मिनी बस कंत्राटदार आणि बेस्टच्या वादात प्रवाशांचे हाल!

BEST Bus : मिनी बस कंत्राटदार आणि बेस्टच्या वादात प्रवाशांचे हाल!

मुंबई : मोठा गाजावाजा करत बेस्टच्या ताफ्यात समाविष्ठ केलेल्या मिनी बसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे त्या बस आगारातच पडून आहेत. या बिघडलेल्या गाड्या दुरुस्त करण्यास कंत्राटदार नकार देत आहेत. यामुळे बेस्टचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने बेस्टच्या ताफ्यातील या सर्व मिनी बस हटवण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला. परंतु तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. तसेच या निर्णयामुळे सुमारे १२०० चालक आणि बसची देखभाल करणारे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.

मुंबईकर उपनगरीय रेल्वेसह बेस्ट बससेवेलाही प्राधान्य देतात. बेस्ट बसच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा कमी खर्चात सुखकर होणा-या प्रवासात आता गैरसोय होत आहे. मुंबई शहरातील पश्चिम उपनगरे म्हणजेच अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी या ठिकाणी धावणाऱ्या मिनी बस कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बेस्टला वेटलीज सर्विस देणाऱ्या कंपनीने तब्बल २६२ बस मागे घेतल्या आहेत. त्यामुळे मुंबई शहरातील बेस्ट बसची संख्या ३१९५ वरून २९३३ वर पोहोचली आहे. एकाचवेळी ८ टक्के बस संख्येत घट झाल्यामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्यांचा त्रास यामुळे आणखी वाढला आहे.

बेस्टचे महाप्रबंधक अनिल दिग्गीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदार अनेक आर्थिक अडचणींशी सामना करत आहे. त्यामुळे बससेवा सुरु ठेवण्यात अडचणी येत आहेत. या मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू असून, प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी देखील घेतली जाणार आहे, असे दिग्गीकर यांनी सांगितले.

१२००हून अधिक चालक कर्मचारी झाले बेरोजगार

दरम्यान, कंत्राटदार आणि बेस्ट प्रशासनाच्या वादात बेरोजगार झालेल्या या १२०० कर्मचाऱ्यांच्या वतीने बेस्टच्या महाप्रबंधकांकडे एक अर्ज करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांनी श्रमिकांच्या नोकऱ्यांना सुरक्षितता देत कंत्राटदाराने सेवा पूर्ववत न केल्यास या कर्मचाऱ्यांना बेस्टमध्ये समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -