Thursday, January 16, 2025
Homeताज्या घडामोडीAssembly Election 2024 : महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान तर २३...

Assembly Election 2024 : महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यात महाराष्ट्रात (Maharashtra) एकाच टप्प्यात २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा, लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यासोबत वरिष्ठ अधिकारी महेश गर्ग, अजित कुमार, संजय कुमार, अनुज चांडक उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

– राज्यात आजपासून आचारसंहिता लागू

महाराष्ट्राच्या निवडणुकीचे असे आहे वेळापत्रक

  • निवडणुकीचे नोटिफिकेशन : २२ ऑक्टोबर २०२४
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : २९ ऑक्टोबर
  • अर्जांची तपासणी : ३० ऑक्टोबर २०२४
  • अर्ज मागे घेण्याची तारीख : ४ नोव्हेंबर
  • मतदान : २० नोव्हेंबर २०२४
  • मतमोजणी : २३ नोव्हेंबर २०२४
  • एकूण मतदार – ९ कोटी ६३ लाख
  • नव मतदार – २०.९३ लाख
  • पुरूष मतदार – ४.९७ कोटी
  • महिला मतदार – ४.६६ कोटी
  • युवा मतदार – १.८५ कोटी
  • तृतीयपंथी मतदार – ५६ हजारांहून जास्त
  • ८५ वर्षावरील मतदार – १२. ४८ लाख
  • शंभरी ओलांडलेले मतदार – ४९ हजारांहून जास्त
  • दिव्यांग मतदार – ६.३२ लाख

– महाराष्ट्रात ९ कोटी ३ लाख मतदार

– महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र

– २९ लाख हे नव मतदार असणार

– १ लाख १८६ पोलिंग स्टेशन असणार

– महाराष्ट्रातील जिल्हे ३६ आहेत

– एकूण मतदार संघ २८८

महाराष्ट्रात २८८ पैकी २३४ जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी २५ तर २९ जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत.

तर झारखंडमध्ये २४ जिल्हे आहेत. यात एकूण ८१ जागांवर विधानसभा निवडणूक होणार आहे. यातील २८ जागा या एसटी प्रवर्ग आणि ९ जागा या एससी प्रवर्गासाठी राखीव असतील. झारखंड विधानसभेचा कार्यकाल ५ जानेवारी रोजी संपणार आहे. या राज्यात २.६ कोटी मतदार आहेत. यात १.२९ कोटी महिला तर १.३१ कोटी पुरुष मतदार आहेत.

यावेळी निवडणूक आयोगाने 530 मॉडेल मतदान केंद्र उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी दिली. या निवडणुकीत 18.67 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तसेच 6 लाख 2 हजार दिव्यांग मतदार व 12 लाख 5 हजार ज्येष्ठ नागरिक मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यातील निवडणुकीसाठी सखोल तयारी सुरू असून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय ८५ पेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागणार आहे.

निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथं पोहचेल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. 17 सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झालं याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल.

वायनाडसाठी १३ ला तर नांदेडसाठी २० नोव्हेंबरला मतदान

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या घोषणेबरोबरच निवडणूक आयोगाने केरळमधील वायनाड, महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा मंगळवारी केली. नांदेड लोकसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होईल. त्याचबरोबर वायनाड लोकसभेसाठी १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड येथून विजय मिळवल्यानंतर त्यांनी वायनाड येथील लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. तसेच नांदेडमधील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचा मृत्यू झाल्यामुळे ही जागाही रिक्त झाली होती.

नांदेडकेरळ आणि  उत्तराखंड यासाठी पोटनिवडणुकीची तारीख निश्चित

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. नांदेड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. यासोबतच, केरळमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच, उत्तराखंडमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येईल.

भारत निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs) आणि पोलीस अधीक्षक (SPs) यांना विशिष्ट निर्देश दिले आहेत, ज्यायोगे निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व पक्षांसाठी समान पातळी निर्माण केली जावी. यात पूर्ण निष्पक्षता राखून कार्य करण्याबाबत आणि सर्वांसाठी समान पातळी सुनिश्चित करणे, मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांच्या डेस्कच्या उभारणीसाठी क्षेत्राचे स्पष्ट चिन्हांकन करणे, सर्व मतदान केंद्रांमध्ये 100% वेबकास्टिंग सुनिश्चित करणे, सर्व मतदान केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा सुनिश्चित करणे – विशेषतः शहरी भागात लांब रांगा असतील तिथे वयस्करांसाठी बसण्याची सोय, मतदारांची सोय पाहता मतदान केंद्रे निवासस्थानापासून 2 किलोमीटरच्या आत  असल्याची खातरजमा, ‘पब्लिक डिफेसमेंट अॅक्ट’ अंतर्गत लोकांचा अनावश्यक छळ टाळणे, केंद्रीय निरीक्षकांची माहिती सार्वजनिक करणे व  सोशल मीडियावर लक्ष ठेवून, खोट्या बातम्यांवर त्वरीत प्रतिसाद देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.

निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला अधिक पारदर्शक, वेगवान आणि तंत्रज्ञान आधारित बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या बदलांमुळे मतदार आणि उमेदवारांना अधिक सोयी आणि सुलभता मिळणार आहे. मतदार नोंदणी प्रक्रिया डिजिटल झाली असून, मतदारांना घरबसल्या ऑनलाइन फॉर्म भरून नोंदणी करता येते. मतदान केंद्राची माहितीही ऑनलाइन पाहता येते. ई-ईपीआयसी हे नवीन डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करून सुरक्षित ठेवण्याची सुविधा मिळाली असून, सी-विजिल अॅपच्या माध्यमातून मतदारांना कोणत्याही गैरकृत्यांची माहिती थेट आयोगाला देता येते, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येते.

उमेदवारांसाठीही आयोगाने सुविधा पोर्टल उपलब्ध केले आहे, ज्याद्वारे उमेदवार नामांकन आणि शपथपत्र ऑनलाइन दाखल करू शकतील. याशिवाय, उमेदवारांच्या KYC ची संपूर्ण माहिती, जसे की गुन्हेगारी नोंदी, आयोगाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रचारासाठी सभा, रॅलींसाठी ऑनलाइन परवानगी घेण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. या नवीन तंत्रस्नेही पद्धतीमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक बनली आहे. याबाबत, ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्यामुळे मतदार आणि उमेदवारांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -