निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.१५) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत, ‘विकासाचे प्रकाशपर्व आपण २० नोव्हेंबरला एकत्र साजरे करू!’ असे म्हटले आहे.
‘लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण २० नोव्हेंबरला एकत्र साजरे करू! भाजपच्या नेतृत्वात आपण २०१४, २०१९ ला भरभरून यश दिले. संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि २३ नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या! या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय’ असे फडणवीस यांनी पुढे म्हटले आहे.
‘एकत्र लढूया आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया ’- अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत, ‘आता निर्णायक क्षण आला आहे’ असे म्हटले आहे. ‘मागच्या दोन वर्षांचे आमचे कामं महाराष्ट्राच्या जनतेसमोर ऐतिहासिक अर्थसंकल्प, विकासाची नवी उंची, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी या आणि अश्या अनेक लोकोपयोगी योजनांच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक सहकाऱ्याने या योजना प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आता निर्णायक क्षण आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, मौलाना आझाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध आहे. आपण पुढे येऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र लढूया आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया’, असे अजित पवार यांनी नमूद केले आहे.