उद्या कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2024) आहे. या पोर्णिमेस काहीजण कोजागिरी असं देखील म्हणतात. धर्म शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी (Mahalaxmi) पृथ्वीवर भ्रमण करून, को जागर्ति? म्हणजे कोण कोण जागरण करत आहे हे पाहते आणि त्या व्यक्तीचे कल्याण करते. कोजागिरी पौर्णिमा ही रात्रीची साजरी केली जाते. रात्रीच्या निरव शांततेत चंद्राच्या शितल प्रकाशात आणि चांदण्यात मसालेदार दूध प्राशन करून ही रात्र साजरी केली जाते. कोजागिरी आणि रात्र या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे. या पौर्णिमेची वेगळी एक अशी खास कथा आहे. जी परंपरेने चालत आली आहे. आज आपण कोजागिरी पौर्णिमा का साजरी (Kojagiri Purnima Importance) केली जाते आणि त्यामागची नेमकी काय कथा आहे हे जाणून घेणार आहोत….
कोजागिरी पौर्णिमा ही ‘शरदपौर्णिमा’ किंवा ‘कौमुदी पौर्णिमा’ म्हणुनही ओळखली जाते. या दिवशी जे व्रत पाळले जाते त्यास ‘कोजाव्रत’, असे म्हंटल जात. या व्रतात दिवसभर उपवास करून रात्री माता लक्ष्मी आणि ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर देव आणि पितर यांना नारळाचे पाणी आणि पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. नैव्यद्य दाखवून झाल्यानंतर तो नैवैद्य आप्तेष्टांसह स्वत:ही सेवन करावा, असे या व्रताच्या विधीमध्ये म्हंटल आहे. आकाशात दिसणाऱ्या चंद्राची पूजा करून रात्रीच्या वेळी त्याला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा तसेच, या दिवशी द्यूत (झूगार) खेळावे असेही विधीत म्हंटलेलं आहे. या रात्री लक्ष्मी ‘को जागर्ति’ (कोण जागा आहे?) असे विचारत घरोघरी फिरते आणि जो जागा असेल, त्याला धनधान्य देऊन समृध्द करते. म्हणून, लक्ष्मीच्या स्वागतासाठी रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इत्यादी ठिकाणे दीप लावून प्रकाशमान ठेवावीत. हा दिवस आणि ही रात्र प्रामुख्याने श्रीलक्ष्मीच्या आराधनेची असते, ही अशी एक अख्यायीका आहे.
काय कथा आहे यामागची ?
प्राचीन काळात मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. जेवढा सज्जन ब्राह्मण होता तेवढीच त्याची पत्नी दृष्ट होती. ब्राह्मणाच्या गरिबीमुळे ती दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असायची. आपल्या पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला.
जंगलात गेल्यानंतर ब्राम्हणाला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. ब्राह्मणाला नागकन्यांनी रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. ब्राह्मणाला या व्रताच्या प्रभावाने अपार धन-संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी चांगली झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले.