डोंबिवली : वेळेवर पोहोचण्यासाठी दरवाजात लटकत प्रवास करणाऱ्या तरूणाचा लोकलमधून पडून बळी गेला. मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली ते कोपर स्थानकांच्या दरम्यान जलदगतीच्या धावत्या लोकलमधून पडून आयुष दोशी (वय.२०) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१५) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घटना घडली.
पश्चिम डोंबिवलीतील ठाकूरवाडीतल्या मधुकुंज सोसायटीत राहणारा आयुष तरूण कामानिमित्त मंगळवारी सकाळी मुंबईकडे निघाला. त्याने डोंबिवलीतून प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर आलेल्या फास्ट लोकलने प्रवास सुरू केला. मात्र दरवाजात प्रचंड गर्दी असल्याने आयुषला आत घुसता आले नाही. त्यामुळे तो दरवाजात लटकून प्रवास करत होता. लोकलने डोंबिवली सोडल्यानंतर दारात लटकलेल्या आयुषचा स्टीलच्या गुळगुळीत पाईपवरची पकड ढिली झाली आणि तो भरधाव वेगाने धावणाऱ्या लोकलमधून खाली कोसळला.
या घटनेची माहिती कळताच डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्याच्या डोक्याला जबर मार लागून तो जखमी झाला होता. आयुषला केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलकडे हलविले. मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
मृतदेहावर केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर आयुषचा मृतदेह त्याची आई निता दोशी यांच्याकडे देण्यात आला. या घटनेमुळे आयुष राहत असलेल्या ठाकूरवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.