नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज, मंगळवारी झारखंड आणि महाराष्ट्रासह १५ राज्यांमधील विधानसभेच्या ४८ जागांवरील पोटनिवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर केला आहे. यासोबतच केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड या लोकसभेच्या जागांसाठी देखील पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या १० जागांसाठी निवडणूक नियोजित आहे. पैकी सीसामऊ, फुलपूर, करहल, मझवां, कटेहरी, सदर, खैर, कुंदरकी आणि मीरापूर येथीली पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. परंतु, अयोध्येतील मिल्कीपूर मतदारसंघातील निवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही. दरम्यान, ज्या १५ राज्यांमधील विधानसभेच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यामध्ये आसाममधील ५, बिहारमधील ५, चंडीगडमधील १, गुजरातमधील १, केरळमधील २, मध्य प्रदेशमधील २, मेघालयातील १, पंजाबमधील ४, राजस्थाच्या ७, सिक्कीममधील २, उत्तर प्रदेशमधील ९, उत्तराखंडमधील १ आणि पश्चिम बंगालमधील ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
यासोबतच केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. त्यात वायनाडमध्ये १३ नोव्हेंबर रोजी आणि नांदेडमध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघातील निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.