अजित पवार गटाचे आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या निमित्ताने महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण रंगले आहे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि वयोवृद्ध नेते शरद पवार यांच्यापर्यंत सारेच नेते त्यात सामील झाले आहेत हे दुर्दैव आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे आणि त्यापैकी खऱ्या मारेकऱ्याला शिक्षा होईल. पण बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या आडून ठाकरे आणि पवार जे स्वतःचे डाव खेळत आहेत ते दुर्दैवी, तर आहेतच पण राज्याला कितीतरी शतके मागे घेऊन जाणारे आहेत. ठाकरे यांना आपला वैयक्तिक सूड उगवायचा आहे आणि त्यासाठी त्यांना बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे चांगले कारण मिळाले आहे, तर पवार यांना फडणवीस यांच्यावर सूड उगवायची संधी मिळू शकते कारण मराठा आरक्षण वादात फडणवीस यांनी निःसंशय पवार यांच्यावर मात केली आहे हे कारण त्यांच्या असूयेचे असू शकते. फडणवीस यांनी म्हटले आहे की, बाबा हे त्यांचेही चांगले मित्र होते. बाबा हे मूळचे पटण्याचे. त्यांची पत्नी हिंदू आहे आणि तिचे बंधू हवाला पेमेंट करण्यात आघाडीवर होते. बाबा यांचे सर्व सिनेस्टारशी चांगले संबंध होते. असे सांगतात की, बाबा हे सुनील दत्त यांचे जवळचे होते. त्यांचे संबंध सलमान खान आणि शाहरूख खानशी चांगले होते. हा सर्व इतिहास यासाठी महत्त्वाचा आहे कारण सलमानशी चांगले संबंध असल्यामुळे लॉरेन्स डिसूझा गँगचा या प्रकरणात संबंध आला. लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. अर्थात यात दाऊद इब्राहिमचेही नाव आले आहे. याचा अर्थ हे फार मोठे षडयंत्र आहे. त्याचा पर्दाफाश करण्यासाठी काही काळ तरी जाऊ द्यावा लागेल. पण राजकीय हिशोब चुकते करण्याच्या प्रयत्नात ताबडतोब आपले पत्ते टाकण्याची घाई अपरिपक्व उद्धव ठाकरे यांना शोभून दिसते पण फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ राजकरण्याला ते शोभण्यासारखे नाही.
महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुका कधीही होण्याची दाट शक्यता आहे. त्या परिस्थितीत एखादे चुकीचे पाऊल निवडणुकीच्या दृष्टीने चुकीचे ठरू शकते. सत्तेत असलेले फडणवीस किंवा मुख्यमंत्री शिंदे यांना ते चांगले समजते. कारण ते आततायी भूमिका घेत नाहीत. बाबा सिद्दिकी यांची हत्या दुर्दैवी आहेच. पण त्यांना ठार मारणारे कुठून आले होते हेही पाहिले पाहिजे. त्यांचा एक मारेकरी आहे हरियाणाचा आणि दुसरा मारेकरी आहे बहराईचचा शिवाय लॉरेन्सचा अँगल ही आहेच. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा राजीनामा मागणे हे तर अगदी सोपे आहे आणि ठाकरे यांनी तरी साधू हत्याकांड झाले तेव्हा राजीनामा दिला होता का? याचे उत्तर द्यायला पाहिजे. तेव्हा ठाकरे नुसते गप्प बसून राहिले. बाबा सिद्दिकी यांच्या हत्याकांडात खूप मोठे षडयंत्र आहे हे तर सिद्धच करण्यासारखे आहे. पण त्याच्या मुळापर्यंत जाऊन खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा करणे अत्यंत आवश्यक आहे. बाबा सिद्दिकी यांचे सर्वच राजकारण्यांशी चांगले संबंध होते. पोलिसांचे असे मानणे आहे की, बाबा यांच्या हत्येसाठी सर्व प्रकारच्या मदतीची तयारी तुरुंगात करण्यात आली होती आणि त्यासाठी लॉरेन्स याची तुरुंगात चौकशी करण्यात आली होती. आता सलमान खानला असलेला धोकाही वाढला आहे. महाराष्ट्रात जे क्षुद्र राजकारण सुरू आहे ते अत्यंत संतापजनक आहे. ठाकरे आपली पोळी भाजून घेत आहेत. त्यांना सिद्दिकी यांच्याशी काही देणे-घेणे नाही, केवळ फडणवीस बळीचा बकरा भेटत आहेत ना मग त्यांना झोडून काढा असे ठाकरे यांचा खाक्या आहे.
ठाकरे यांना हिंदुत्व सोडल्यापासून शिंदे यांनी चांगलेच धोबीपछाड दिली आहे. तोही राग त्यांच्या मनात आहे. त्यासाठी निमित्त म्हणून कोणत्याही कारणाने फडणवीस यांच्यावर डूक धरायची हा प्रकार ठाकरे यांनी चालवला आहे. यात फडणवीस यांनाच टार्गेट करण्यात आले आहे कारण उघड आहे. त्यांच्यापासूनच ठाकरे यांना खरा धोका आहे. त्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील राजकारण आतापर्यंत कधीही इतके नासले नव्हते. खून पूर्वीही झाले आहेत. पण त्यांना एखाद्याला टार्गेट करून मुद्दाम त्यांचा राजीनामा मागण्याचे कुणीच कृत्य केले नव्हते. ते उद्धव ठाकरे यानी करून आपण किती क्षुद्र राजकारणी आहोत याचाच प्रत्यय आणून दिला आहे. लॉरेन्स गँगच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, बाबा सिद्दिकीचे प्रकरण बंद झाले आहे. तो कधी दाऊद इब्राहिम याच्याबरोबर मकोका कायद्याखाली येत होता. त्याच्या मृत्यूचा संबंध अनुज थापन आणि प्रॉपर्टीचे वाद आहेत. या सर्वांचा एकच निष्कर्ष आहे तो म्हणजे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे केवळ लॉरेन्स गँग नव्हे, तर एक मोठे षडयंत्र आहे. त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष त्यावर आपापली राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यापेक्षा महत्त्वाचे आहे ते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे कोण आहे आणि खरे गुन्हेगार कोण आहेत त्यांना कायद्यासमोर आणून शिक्षा होईल असे पाहणे हे जास्त महत्त्वाचे आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या घराची रेकी करण्यात आली होती, अशी नवीन माहिती आता समोर आली आहे. याचा अर्थ बाबा यांच्या हत्येचे फार आधी ठरले होते. बाबांची हत्या हे आताचे प्रकरण नाही, तर त्यांच्या हत्येसाठी किती जणांना सुपारी देण्यात आली होती. या सर्व गोष्टींचा छडा लावल्याशिवाय हे प्रकरण शांत होणार नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस हे तर केवळ एक निमित्त आहेत. खरे लक्ष्य आहेत ते राज्यातील सरकार कोसळवण्याचे आणि यानिमित्ताने विरोधकांना एक चांगली सधी मिळाली हे सत्य आहे. महाराष्ट्रातील जनतेने आता सावध राहून ठाकरे यांच्यासारख्या संधीसाधू आणि बोलबच्चन अशा विरोधकांना जराही संधी देता कामा नये ही दक्षता घेतली पाहिजे.