नवी दिल्ली : सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्याचा नवनविन मार्ग शोधत आहेत. आता मोबाईल, एसएमएस (SMS) नाही तर चक्क Gmail वरून फेक मेसेज पाठवून फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे हॅकर्स आर्टीफिशियल इंटिलिजन्स अर्थात एआय (AI) चा वापर करत आहेत. हॅकर्स AI च्या माध्यमातून युजर्सना फेक अकाऊंट रिकव्हरी रिक्वेस्ट पाठवत आहेत. आयटी तज्ज्ञ आणि टेक ब्लॉगर सॅम मित्रोविच यांनी आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये या घोटाळ्याबद्दल माहिती दिली आहे.
जगभरातील Gmail युजर्स सध्या हॅकर्सच्या टार्गेटवर आहेत. ईमेलद्वारे हा घोटाळा एका नोटिफिकेशनद्वारे सुरू होतो. ही नोटिफिकेशन गुगलच्या प्रत्यक्ष अकाऊंट रिकव्हरी नोटिफिकेशनसारखीच आहे. ही अधिसूचना आपल्या फोन किंवा ईमेलवर येते, जी आपल्याला Gmail खाते पुनर्प्राप्ती विनंती मंजूर करण्यास सांगते. ही रिकव्हरी विनंती ब-याचदा दुस-या देशातून येते. जर आपण ही विनंती नाकारली तर सुमारे अर्धा पाऊण तासानंतर स्कॅमर्स पुढचे पाऊल उचलतात आणि ते कॉल करतात. हा कॉल नंबर अधिकृत गुगल नंबर म्हणून दिसतो.
तसेच हे लोक अतिशय व्यावसायिक, विनम्रतेने बोलतात आणि आपल्या Gmail खात्यावरील संशयास्पद हालचालींबद्दल आपल्याला सूचित केले जाते. नाना प्रकारे गोड बोलून ते आश्वासन देतात आणि पुन्हा अकाऊंट रिकव्हरीची रिक्वेस्ट पाठवतात आणि रिक्वेस्टवर क्लिक करून अकाऊंट रिकव्हरीकडे जाताच त्यांना लॉगिन आणि पासवर्ड मिळतो आणि आपण हॅकिंगला बळी पडतो.
त्यामुळे Gmail युजर्सनी स्वतःचे संरक्षण स्वतः सावधानता बाळगून केले पाहीजे.
- यासाठी आपण सुरु न केलेल्या रिकव्हरी विनंत्या मंजूर करू नका. विनाकारण वसुलीची अधिसूचना मिळाल्यास ती मंजूर करू नका.
- आपण गुगल बिझनेस सेवांशी कनेक्ट असल्याशिवाय गुगल क्वचितच युजर्सना थेट कॉल करते. संशयास्पद कॉल आल्यास कॉल डिस्कनेक्ट करा.
- स्पूफ केलेले ईमेल गुगलसारखे दिसू शकतात, परंतु “टू” फील्ड किंवा डोमेन नेम सारखे लहान तपशील हे सूचित करू शकतात की ते बनावट आहेत.
- नियमितपणे आपल्या जीमेल खात्याच्या सुरक्षा सेटिंग्ज तपासा आणि काही अज्ञात लॉगिन आहेत की नाही हे पाहण्यासाठी अलीकडील अपडेट करा. Gmail अकाऊंट सेटिंग्जमध्ये जाऊन ‘सिक्युरिटी’ टॅबवर क्लिक करून तुम्ही हे करू शकता.
- अगदीच नवखे असाल तर अनोळखी ईमेल आणि मोबाईलवर आलेले अनोळखी मेसेजेस ओपन करुन कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. ओटीपी आणि पासवर्ड कोणालाही देऊ किंवा सांगू नका.