मुंबई : नाटक असो वा मालिका सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांचे काल निधन झाले. मंगळवारी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. आपल्या लाडक्या मित्राला शेवटचा निरोप देताना सर्वच भावुक झाले.
अतुल परचुरे पाच दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांची तब्येत बिघडली होती. वर्षभरापूर्वीच कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करत ते बरे झाले होते. नव्या जोमाने कामालाही लागले होते. मात्र इतर आजाराने पुन्हा डोके वर काढले. शरिराने साथ दिली नाही आणि सोमवारी त्यांच्या निधनाची दु:खद बातमी आली.
मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव दादर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार सगळेच भावुक झाले.
अतुल परचुरे हे मराठी सिनेमा, रंगभूमी, मालिका सर्वच व्यासपिठावर लोकप्रिय असल्याने त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक नावाजलेले कलावंत स्मशानभूमीत रडताना पहावयास मिळाले. अनेकांना शोकसंदेश देण्यासाठीही शब्द फुटत नव्हते.