तुळई दक्षिण बाजूस सरकविण्याचे काम येत्या आठवड्यात होणार पूर्ण
मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’मेलो मार्गाला जोडणा-या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची पालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर ७० मीटरपर्यंत सरकविण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या ‘ब्लॉक’ नुसार, काल मध्यरात्री १२.२५ ते पहाटे ५.४५ या दरम्यान आणि आज मध्यरात्री १२.३० ते ३.३० या कालावधीत लोखंडी तुळई यशस्वीपणे सरकविण्यात आली आहे.
ही महाकाय तुळई दक्षिण बाजूस सरकविण्याचे काम येत्या आठवड्यात पूर्ण होईल. तसेच, समांतरपणे पुलाच्या पश्चिमेकडील पोहोच मार्गाचे बांधकाम येत्या आठवड्यातच सुरू करण्यात येईल. पुलाची दुसरी तुळई स्थापित करण्याची कार्यवाही डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करण्याकामी प्रयत्न केला जाणार आहे. रेल्वे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कामाची जोखीम व तांत्रिक बाबी तपासून, त्याचप्रमाणे रेल्वे वाहतूक व वीज पुरवठा या दोन्ही घटकांमध्ये खंड (ब्लॉक) मिळाल्यानंतर तुळई स्थापनेचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व मध्य रेल्वेने निर्देश केल्याप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षण अंतर्गत तुळई सरकविण्याचे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे.
दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे पालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. पुलाच्या बांधकामासाठी तुळईचे सुटे भाग मुंबईत आल्यावर जोडकाम करून पुलाची एक तुळई बांधणी पूर्ण करण्यात आली. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद बंदर रेल्वे मार्गाच्या पूर्व दिशेला तुळई बांधणी व पुलाचा पाया उभारण्याचे काम करण्यात आले. सुमारे ७० मीटर लांब आणि ९.५० मीटर रुंद आकाराच्या या तुळईचे वजन सुमारे ५५० मेट्रिक टन आहे. तुळई बसवण्यासाठी रेल्वे रुळांलगत तुळई पूर्णतः अधांतरी (कॅण्टीलिवर) होती. त्यानुसार तुळई पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकविण्यात आली.