Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यरेल्वे प्रशासन तत्पर, प्रवाशांचा प्रवास होणार लवकरच सुखकर

रेल्वे प्रशासन तत्पर, प्रवाशांचा प्रवास होणार लवकरच सुखकर

मुंबई डॉट कॉम – अल्पेश म्हात्रे

प्रवाशांची वाढती गर्दी व रेल्वे प्रशासनावर येणारा ताण पाहता भारतीय रेल्वे विविध रेल्वे प्रकल्प राबवत असते. त्यात मुंबई व क्षेत्रातील वाढता ताण लक्षात घेता मुंबईतील वाहतूक नेटवर्क आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने सध्या एकूण १६ हजार २४० कोटींच्या एकूण अंदाजित खर्चाने एकूण ३०१.५ किलोमीटरच्या विविध रेल्वे प्रकल्पांद्वारे रेल्वे मार्गांचे बांधकाम व विस्तार आणि विद्यमान सेवांमध्ये सुधारणा करून मुंबईतील वाहतूक नेटवर्कचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सज्ज झाली आहे.

मध्य रेल्वेवरील प्रकल्प

१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचा प्रकल्प.
एमयुटीपी २ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प १७. किलोमीटर लांबीचा अंदाजे ८९१ कोटी खर्च करून दोन टप्प्यांत कार्यान्वित होणार आहे. टप्पा-१ हा परळ ते कुर्ला हा १०.१ किलोमीटरचा आहे आणि डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, तर टप्पा -२ हा परळ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान ७.४ किलोमीटरचा आहे. या प्रकल्पाद्वारे अधिक उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या सेवा चालविण्यासाठी ट्रॅक क्षमता वाढणार आहे, तर विद्यमान मार्गांवरगर्दी आणि दोन गाड्यांमधील अंतर कमी होईल. तर इतर सेवांची एकूण वक्तशीरता सुधारेल .
२. पनवेल – कर्जत उपनगरीय कॉरिडॉर प्रकल्प एमयुटीपी ३ अंतर्गत पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर प्रकल्प २९.६ किलोमीटर लांबीचा असून त्याची अंदाजे किंमत २ हजार ७८२ कोटी आहे. हा प्रकल्प एमआरव्हीसीद्वारे राबविला जात आहे. या प्रकल्पांद्वारे बोगदे आणि पुलांचे काम प्रगतीपथावर आहे आणि हा प्रकल्प डिसेंबर-२०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या प्रकल्पाद्वारे पनवेल आणि कर्जत दरम्यान प्रवाशांसाठी नवीन उपनगरीय कनेक्टिव्हिटी उपलबध होणार आहे. आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे तसेच कर्जतला जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. या मार्गावरील उपनगरीय गाड्यांची वारंवारता सुधारण्यासही मदत होणार आहे.
३. कल्याण – आसनगाव चौथा मार्ग या प्रकल्प अंतर्गत कल्याण व आसनगाव दरम्यान चौथा मार्ग उपलब्ध होणार असून एकूण ३२ किलोमीटर लांबीचा असून अंदाजे रू. १, हजार ७५९ कोटी खर्चाचा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प डिसेंबर-२०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवून भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामुळे अधिक उपनगरीय गाड्या सुरू करण्यासाठी कॉरिडॉरची क्षमता वाढवता येईल. ज्यामुळे सध्याच्या गाड्यांमधील गर्दी कमी होऊ शकेल. प्रवाशांचा विलंब कमी होईल आणि गर्दीच्या मार्गावर परिचालन करण्याची कार्यक्षमता सुधारेल. या प्रकल्पामध्ये प्रवासी आणि मालवाहतूक दोन्ही सेवांच्या मागणीत भविष्यातील वाढीस चालना मिळेल.
४. कल्याण – बदलापूर तिसरा आणि चौथा मार्ग प्रकल्प एमयुटीपी ३ अंतर्गत कल्याण ते बदलापूर तिसरी आणि चौथ्या मार्गिकेचा हा प्रकल्प असून एकूण १४. ५ किलोमीटर लांबीचा अंदाजे
१, हजार ५१० कोटींचा हा खर्चाचा आहे. हा प्रकल्प एमआरव्हीसीद्वारे राबविला जात आहे. युटिलिटी शिफ्टिंगचे काम, भरावाचे काम आणि पुलाचे काम डिसेंबर-२०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असलेल्या तारखेसह प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामुळे उपनगरीय सेवांसाठी अतिरिक्त मार्गिका उपलबध होईल, प्रवाशांची गर्दी कमी होईल. प्रवर्तनाची एकूण वक्तशीरता सुधारेल. तसेच उपनगरीय सेवांची विश्वासार्हता आणि वारंवारता ही वाढेल.
५. कल्याण – कसारा तिसरा
मार्गिका प्रकल्प
मध्य रेल्वेचा कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेचा हा प्रकल्प असून ६७ किलोमीटर लांबीचा असून अंदाजे रू. ७९२ कोटी खर्च करून दोन टप्प्यांत कार्यान्वित करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्य्यामध्ये हा आसनगाव ते कसारा दरम्यान फेब्रुवारी-२०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, तर टप्पा -२ हा कल्याण ते आसनगाव हा मार्ग डिसेंबर-२०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या प्रकल्पामुळे रेल्वेच्या प्रवर्तनामध्ये विशेषतः गर्दीच्या वेळेस कार्यक्षमता वाढेल. तसेच या मार्गावरील लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये येणारे व्यत्यय आणि विलंब होण्याची शक्यता कमी होईल. मुंबईच्या उत्तर उपनगरात आणि तेथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटी सुधारेल .
६. ऐरोली – कळवा (एलिव्हेटेड) उपनगरीय कॉरिडॉर लिंक प्रकल्प एमयुटीपी ३ अंतर्गत ऐरोली-कळवा (एलिव्हेटेड) उपनगरीय कॉरिडॉर लिंक प्रकल्प हा ३.३ कि मीचा नवीन मार्ग असून अंदाजे रू. ४७६ कोटी खर्च करून दोन टप्प्यांत कार्यान्वित होणार आहे. त्यानुसार टप्पा-१ अंतर्गत दिघा गाव स्टेशनचे काम जानेवारी-२०२४ मध्ये पूर्ण झाले आहे आणि टप्पा-२ अंतर्गत भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. हा प्रकल्प एमआरव्हीसीद्वारे राबविला जात आहे. या मार्गामुळे उपनगरीय गाड्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल तसेच, विद्यमान मार्गावरील गर्दी कमी होईल. ठाणे आणि नवी मुंबई दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढेल व, इतर मार्गावरील गर्दी कमी होईल. तसेच प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रवाशांसाठी आरामदायक प्रवास होईल .
७. निलजे – कोपर डबल कॉर्ड लाईन हा प्रकल्प निलजे ते कोपर डबल कॉर्ड लाइन हा मध्य रेल्वेचा एक प्रमुख प्रकल्प असून ज्याची लांबी ५ किलोमीटर आहे. ३३८ कोटी खर्चून सध्या काम जोरात सुरू आहे या प्रकल्पामुळे प्रवासी आणि मालवाहू गाड्यांची क्षमता वाढवेल. या कॉरिडॉरवर गाड्यांची वारंवारता सुधारेल. तसेच सध्याच्या सेवांची विश्वासार्हता आणि वक्तशीरपणा वाढवेल. मध्य रेल्वे प्रमाणे प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी विविध प्रकल्प राबवले
जात आहेत

पश्चिम रेल्वेवरील प्रकल्प

१. मुंबई सेंट्रल – बोरिवली सहावी मार्गिका एमयुटीपी २ अंतर्गत ३० किलोमीटर लांबीचा मुंबई सेंट्रल – बोरिवली सहाव्या मार्गाचा प्रकल्प रु.९१९ कोटींचा असून दोन टप्प्यांत कार्यान्वित आहे. खार – गोरेगाव या ८.९ किमीच्या टप्पा १ चे कमिशनिंगचे काम पूर्ण झाले आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील गोरेगाव – बोरिवली दरम्यान ८.२ किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे, ज्यापैकी मालाड स्थानकावर ट्रॅक शिफ्टिंग आणि प्लॅटफॉर्म बदलण्याचे काम करण्यात आले आहे.
यामुळे मुंबई उपनगरी विभागाची मार्गिकेची क्षमता वाढलेली असेल. तसेच व्यस्त उपनगरी आणि मुख्य मार्गावरील गर्दी कमी होईल. उपनगरीय गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा येईल. यातील वांद्रे टर्मिनसकडून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना या विभागावर दोन वेगळ्या मार्गिका मिळतील मुख्य मार्गावरील गाड्या आणि उपनगरीय गाड्यांचे पृथक्करण होईल.
अंधेरी – बोरिवली – विरार विभागातील प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणारा हा
प्रकल्प असेल…
२ हार्बर मार्गाचा गोरेगाव ते बोरिवली पर्यंत विस्तार – गोरेगाव ते बोरिवली हार्बर मार्गाचा विस्तार हा एमयुटीपी ३ ए अंतर्गत ७ किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे, ज्याची अंदाजे किंमत रू. ८२६ कोटी आहे. त्यासाठीच्या भूसंपादनाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि मार्च-२०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे बोरिवली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून गोरेगाव – बोरिवली विभागावर अतिरिक्त मार्गिका उपलबध होईल. तसेच गोरेगाव आणि बोरिवली स्थानकांवरील गर्दीत घट होईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाण्यासाठी गोरेगाव येथे ट्रेन बदलण्याची गरज नाही . पश्चिम उपनगरातील लोकांसाठी हा प्रकल्प खूप फायदेशीर होईल. ५. बोरिवली – विरार पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प
बोरिवली – विरार पाचवी आणि सहावी लाईन हा एमयुटीपी ३ ए अंतर्गत एक प्रकल्प आहे, ज्याची लांबी २६ किलोमीटर असून रू.२ हजार,१८४ कोटी खर्च केले जाणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर-२०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हा प्रकल्प एमआरव्हीसीद्वारे राबविला जात आहे. या प्रकल्पामुळे बोरिवली – विरार विभागावर अतिरिक्त मार्गिका उपलबध होईल .
या मार्गिकेवर अतिरिक्त लोकल गाड्या चालवण्यास मदत होईल. विरार आणि बोरिवलीमधील लोकांसाठी प्रवासाच्या परिस्थितीत सुलभता येईल तसेच मुख्य मार्गावरील गाड्या आणि उपनगरीय गाड्यांचे पृथक्करण होईल .
४ विरार – डहाणू तिसरी आणि चौथी मार्गिका प्रकल्प विरार – डहाणू तिसरी आणि चौथी लाईन हा एमयुटीपी ३ अंतर्गत एक प्रकल्प आहे, ज्याची लांबी ६४ कि मी असून ३,हजार ५८७ कोटी खर्च केले जाणार आहे हा प्रकल्प एमआरव्हीसीद्वारे राबविला जात आहे. हा प्रकल्प डिसेंबर-२०२६ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. या मार्गिकेवरील पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गिकेमुळे विरार-डहाणू विभागावर अतिरिक्त मार्गिका उपलबध होईल. या विभागात अतिरिक्त लोकल गाड्या चालवण्यास मदत होईल. वैतरणा ते डहाणू रोड दरम्यान लोकांसाठी प्रवासात सुलभता येईल. पालघर जिल्ह्यातील विशेषत: विरारच्या पलीकडे प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांसाठी हा प्रकल्प खूपच फायदेशीर ठरणार आहे .
५ नायगाव – जुचंद्र डबल कॉर्ड लाईन प्रकल्प नायगाव-जुईचंद्र डबल कॉर्ड लाईन हा पश्चिम रेल्वेचा एक प्रकल्प असून ज्याची लांबी ६ किमी असून १७६ कोटी खर्च केले जाणार आहे त्यासाठी सध्या काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे कोकण रेल्वे, पनवेल आणि पुढे मुंबई सेंट्रल/वांद्रे टर्मिनस येथून थेट कनेक्टिव्हिटी मिळेल वसई रोडवर लोको रिव्हर्सलची आवश्यकता भासणार नाही. या प्रकल्पामुळे कोकण, गोवा आणि पलीकडे प्रवास करणाऱ्या पश्चिम उपनगरातील लोकांना फायदा होईल. तसेच नवीन गाड्या सुरू करण्यास मदत होईल. वसई रोड स्टेशनवर लोको रिवर्स घेण्याची गरज नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -