मुंबई : दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दरवर्षी एसटी महामंडळाकडून १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात येते. मात्र यावर्षी ही १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून दरवर्षी १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो. यंदा देखील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांना दिलासा देत एसटी महामंडळाने भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यभरात एसटीने प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक कुटुंबे गावी, पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे बेत आखतात. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करते. दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करत असते. महामंडळाच्या धोरणानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ केली जात असते, त्या प्रमाणे या वर्षी देखील निर्णय घेण्यात आला होता. आता तो निर्णय रद्द करण्यात आला आहे.