छत्रपती संभाजीनगर : ‘मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे. मी जीवनाचा आनंद घेतला आहे, लव्ह यू बोथ,’ असे खोलीतील आरशावर लिहून ठेवत पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
साहिल शीलवंत नांदेडकर (वय १७) असे या मृत मुलाचे नाव आहे. त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
साहिल बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. १२ ऑक्टोबरला नांदेडकर कुटुंबीयांनी दसरा साजरा केला. साहिलही उत्साहाने त्यात सहभागी झाला होता. रात्री उशिरापर्यंत आई-वडिलांसोबत त्याने गप्पा मारल्या. त्यानंतर सर्वजण झोपी गेल्यावर त्याने गळफास घेतला.
नेहमीप्रमाणे उपायुक्त नांदेडकर हे सकाळी सहा वाजता वॉकिंगला जाण्यासाठी उठले. तेव्हा मुलगा साहिल झोपेतून उठला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे नांदेडकर यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा वाजवून आवाज दिला. मात्र, आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी बाजूला जाऊन खिडकीतून डोकावून पाहिल्यावर साहिल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला आणि त्यांना धक्काच बसला.