नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट रद्द करण्यात आल्यामुळे केंद्रशासीत प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये आता नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या आघाडीला सत्ता मिळाली होती. निवडणुकीनंतर ओमर अब्दुल्ला यांनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. यामुळे २०१९ मध्ये लावण्यात आलेली राष्ट्रपती राजवट हटवण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नवे सरकार स्थापन होण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.