पोलीस स्टेशन ते उपाहारगृहे येथे उभारले जाणार नवे रॅम्प
मुंबई : सर्वसामांन्य नागरिकांप्रमाणे दिव्यांग व्यक्तींनाही इतरांसारखा अनुभव घेता यावा असा हेतू साधत नावीन्यपूर्ण दृष्टिकोन असलेल्या ‘रॅम्प माय सिटी’ या संस्थेने मुंबईत एक नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत मुंबई शहरातील १५ पोलीस ठाणे आणि कुलाबा, माहीम, वरळी, शिवाजी नगर, वांद्रे या ठिकाणी २५ नामांकित उपहारगृहांमध्ये रॅम्प बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दिव्यांग व्यक्तींना आवडत्या उपहारगृहात जाणे, मित्रांना भेटणे किंवा समाजात मोकळेपणानं वावरणे आता सहज शक्य होणार आहे.
“अडथळे दूर करणे आणि मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यात सर्वांना मुक्त वावर मिळवून देणे” हे ‘रॅम्प माय सिटी’ संस्थेचे ध्येय आहे. या संस्थेच्या कामामुळे ३ लाखांहून अधिक लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. तसेच आणखी लोकांना याचा फायदा होण्यासाठी संस्था मुंबई पोलिसांशीही सहकार्य करत आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना ‘रॅम्प माय सिटी’ चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक प्रतीक खंडेलवाल म्हणाले, “आमचं ध्येय अडथळे दूर करणं आणि मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यात सर्वांना मुक्त वावर मिळवून देणं, हे आहे. आमच्या नव्या उपक्रमामुळे अशा शहराची निर्मिती होईल जिथे प्रत्येकजण मोकळेपणानं आणि आत्मविश्वासानं फिरू शकेल, याचा आम्हाला आनंद आहे. ‘रॅम्प माय सिटी’ च्या कामामुळे आधीच ३ लाखांहून अधिक लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. आम्ही मुंबई पोलिसांशीही सहकार्य करत आहोत, जेणेकरून शहरातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हा उपक्रम राबवता येईल. यामुळे सार्वजनिक सुरक्षा आणि समावेशकता वाढेल. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी जीवन अधिक सुरक्षित आणि आनंददायी बनवण्यात सुगमता किती महत्त्वाची आहे, हे या सहकार्यातून दिसून येतं.”
‘रॅम्प माय सिटी’ ची सुरुवात प्रतीक खंडेलवाल यांच्या वैयक्तिक अनुभवातून झाली. २०१४ मध्ये पाठीच्या कण्यास झालेल्या दुखापतीमुळे त्यांना व्हीलचेअर वापरावी लागली. या अनुभवातूनच त्यांच्यात सुगमता आणि समावेशकतेसाठी काम करण्याची प्रेरणा निर्माण झाली. त्यांच्या या कार्याला युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बँक यांसारख्या नामवंत संस्थांकडून मान्यता मिळाली आहे. याशिवाय, त्यांना युनिव्हर्सल डिझाइन पुरस्कार (२०२१), सवाई पुरस्कार (२०२२) आणि सीएनएन नेटवर्क १८ पुरस्कार (२०२२) यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.