काल राज्यात दोन दसरा मेळावे झाले आणि त्यातील एक होता मुख्यमंत्री शिंदेचा. तो झाला आझाद मैदानावर, तर दुसरा होता शिवसेनेचा पारंपरिक शिवतीर्थावर म्हणजे दादरच्या शिवाजी पार्कवर. पण दोन्ही मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले. शिवसेनेच्या मेळाव्यातून आणि त्यांच्या जोरदार भाषणातून शिवसेनेची वाढती ताकद दिसली. त्यांच्या मेळाव्याला ठाकरेंच्या मेळाव्यापेक्षा गर्दीही जोरदार होती आणि ही तुलना अपरिहार्य आहे. कारण दोन्ही गट शक्तीप्रदर्शनाच्या हेतूनेच आले होते. त्यात शिवसेना शिंदे गटाने बाजी मारून नेली. ठाकरे यांच्या भाषणात शिव्याशाप आणि मुंबईकरांना धमकावणे यापलीकडे काहीही नव्हते. त्यामुळे त्यांचे भाषण अगदीच नीरस झाले. सत्ता गेल्यामुळे महिला जशा हातांनी तळतळाट देतात तसे ठाकरेंचे भाषण होते. उलट शिंदे यांचे भाषण महाराष्ट्रासाठी आपण काय करणार आहोत याचा लेखाजोखा होता. शिंदे आणि ठाकरे एकमेकांवर आगपाखड करणार हे तर उघड होते. त्यांनी ती केली आणि त्यातही शिंदे यांनी बाजी मारली. कारण ठाकरे यांचे तेच ते भाषण ऐकण्यास लोकही कंटाळले आहेत.
ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यानी शिंदे यांची मिमिक्री केली. पण त्याला हास्यास्पद यापेक्षा जास्त काही म्हणता येणार नाही. शिंदे म्हणाले की, मला हलक्यात घेऊ नका, कारण मी पळणारा नाही, तर पळवणारा आहे यात राज्यातील शिंदे सरकारची ताकद दिसून येते. आनंद दिघेंचा उल्लेख त्यानी करणे अपेक्षितच होते. वास्तविक ठाकरे दोन वर्षे मुख्यमंत्री पदी होते. पण एकदाही विधानभवनात गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर तशी टीका होणे साहजिक आहे.
शरद पवार यांनीही त्यांच्या पुस्तकातून ठाकरे यांच्या या वर्तणुकीकडे लक्ष वेधले आहे. ठाकरे यांना आता मुख्यमंत्री करा म्हणून लोकांना आग्रह धरणे चुकीचे आहे. कारण जेव्हा त्याना संधी होती तेव्हा ते गप्प घरात बसून राहिले. आता त्यांनी कितीही कंठशोष केला तरीही त्यांना ती संधी परत येणार नाही हे त्यांनी ओळखून असले पाहिजे हेच शिंदे यांच्या म्हणण्याचे सार होते. पण ठाकरे यांच्या भाषणात एक बाब स्पष्ट दिसत होती की, त्यांनी आता हिंदुत्व गमावले आहे. त्यांनी आपला परिवार गमावला आहे. त्यामुळे त्यांचे पुन्हा गतवैभव परत येईल ही आशा त्यांनी सोडून द्यायला हवी हीच शिंदे यांच्या भाषणातून बाब प्रकर्षाने समोर आली. ठाकरे विरूद्ध शिंदे यांच्या या लढतीत शिंदे यांनीच बाजी मारून नेली हे सत्य आहे. कारण ठाकरे यांच्या मेळाव्यात शिव्याशाप आणि भाजपाला धमक्या यापलीकडे काहीही नव्हते. उलट शिंदे यांच्या भाषणात महाराष्ट्राबाबत आपले धोरण काय असेल याचा आढावा होता. शिंदे यांनी ठाकरे सरकारचे अडीच वर्षांतील काम सांगितले ते म्हणजे केवळ राज्यातील विकासकामे ठप्प करण्याचे होते. ठाकरे जेव्हा मुख्यमंत्रीपदावर होते तेव्हा त्यांनी प्रत्येक विकासकामे जवळपास अडवून ठेवली होती. मुंबई मेट्रोचा प्रकल्प ठाकरे यांनी अडवून ठेवला होता. शिंदे सरकारने अखेरीस तो मोकळा केला. लाखो मुंबईकर जलदगतीने मुंबईत प्रवास करण्याचे स्वप्न पाहत होते त्यांच्या स्वप्नांना ब्रेक लागला. अर्थात तो अल्प काळापुरता होता. पण तेवढ्यानेही मुंबईकरांचे प्रचंड नुकसान झाले. शिंदे यांनी या प्रकल्पांची यादीच वाचून दाखवली तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होत होता. ठाकरे यांच्या भाषणात भाजपाला धमक्या आणि शापवाणी यापलीकडे काहीही नव्हते. शिंदे आणि ठाकरे यांच्या कालच्या सभांषणातून विधानसभेच रणशिंग फुंकले गेले हे जरी खरे असले तरीही शिंदे यांची शिवसेनेसाठी खरोखरच आरपारची लढाई आहे हे सिद्ध झाले. शिंदे हे खरेखुरे लढवय्ये आहेत हे त्यांनी दाखवून दिले. उलट ठाकरे यांच्या टीकेतही काही अर्थ नव्हता तसेच त्यांच्या बोलण्यातही काही ताळमेळ नव्हता. कारण हिंदुत्व त्यागले आणि त्यानंतर त्यांनी लोकांकडे कोणत्या तोंडाने मते मागणार याची त्यांना लाज वाटत असावी असे दिसत होते. त्यांच्याकडे मते द्या असे म्हणायला एकही ठोस कारण नव्हते.
शिवसेना आणि भाजपा हेच खरे नैसर्गिक मित्र आहेत. सत्तेसाठी ठाकरे काँग्रेसशी घरोबा करून बसले आणि ही खंत त्यांना दिसत होती. काँग्रेसला त्यांनी बंद दाराआड चर्चा तरी करा असे गार्हाणे घालून पाहिले. पण काँग्रेस त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. कारण ठाकरे कधी गौप्यस्फोट करतील याचा काही नेम नाही आणि त्यामुळे काँग्रेस त्यांना डोळे दाखवत आहे. मला मुख्यमंत्री करा असे म्हटल्याने कुणी मुख्यमंत्री करत नसतो हे ठाकरे यांच्या चांगलेच लक्षात आले आहे. सामान्य माणसाला शिवसेनाप्रमुख बनवायचे आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांना संधी मिळाली तेव्हा स्वतःच उडी मारून ते पद बळकावून बसले ही बाब लोकांच्या लक्षातून गेलेली नाही. त्यामुळे ठाकरे यांनी आज कितीही गमजा मारल्या तरीही शिंदे यांनी त्यांना कालच्या मेळाव्यात चांगलीच धोबीपछाड दिली आहे हे ते स्वतःही जाणतात. काल ठाकरे यांनी जे आरोप केले त्यात काहीच नाविन्य नव्हते. उलट शिंदे यांच्या भाषणात महाराष्ट्रासाठी आपण काय करणार याची माहिती होतीदोघांच्याही भाषणांना काही लाख लोक जमा झाले होते. पूर्वी नवाकाळ दैनिकात एका छोट्या चौकटीत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटूया म्हणून जाहिरात असे. ती वाचून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असत. आज त्यापेक्षा हजारो पटींनी जाहिरात करूनही शिवसेनेच्या या विचारांचे सोने लुटण्याच्या कार्यक्रमास लोक येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कारण ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्यक्रमास गर्दी जमणे थांबले आहे. उद्धव ठाकरे असोत की आदित्य ठाकरे असोत, त्यांच्या विचारांमध्ये ज्वलंत हिंदुत्वाचा धगधगता अंगार नसतो हे लोकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणांना केवळ गर्दी जमते पण ती नावापुरतीच. शिवसेनेच्या मेळाव्यांनी ही विदारक वस्तुस्थिती समोर आणली आहे. दोघांच्याही भाषणात मुख्यमंत्र्यांचे भाषण जनतेस भावले असल्याने धनुष्यबाणाच्या हल्ल्याने, उबाठा सेना घायाळ झाली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.