Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीAtul Parchure : अभिनेते अतुल परचूरे यांचे निधन

Atul Parchure : अभिनेते अतुल परचूरे यांचे निधन

मुंबई : मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचूरे (Atul Parchure) यांचे निधन झाले आहे. त्यांनी ५७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

त्यांना कॅन्सरची लागण झाली होती आणि त्यांची ट्रीटमेंट देखील सुरु होती. पण आज १४ ऑक्टोबरला त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली.

त्यांना कॅन्सरचं निदान झालं तेव्हा त्यांचं वजन झपाट्याने कमी झालं होतं. त्यांची स्थिती कोणालाच पाहवत नव्हती. तरी त्यांनी हिमतीने कॅन्सरवर मात केली आणि ते ठणठणीत बरे झाले. तब्येत सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा कामालाही सुरुवात केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.

कॅन्सरवर मात करुनही गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत पुन्हा बिघडली होती. त्यांना काही कॉम्प्लिकेशनला सामोरं जाव लागत होतं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकतीच त्यांनी ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकाची घोषणाही केली होती. जोमाने काम सुरु केलं होतं. मात्र तब्येतीने त्यांना साथ दिली नाही. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

अतुल परचुरे यांनी पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा मालिकांमध्ये हुबेहुब साकारली होती. अतुल परचुरे यांचं नातीगोती हे नाटक चांगलंच गाजलं होतं. यावेळी त्यांच्याबरोबर दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू असे दिग्गज कलाकार होते.

अनेक मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘वासूची सासु’, ‘प्रियतमा’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केलं. ‘सलाम-ए-इश्क’, ‘पार्टनर’, ‘ऑल द बेस्ट: फन बिगिन्स’, ‘खट्टा मीठा’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. याशिवाय ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं.

कॅन्सरची ट्रिटमेंट घेताना अतुल परचुरेंवर झाले होते चुकीचे उपचार

मराठी सिनेविश्वातील नावाजलेले नाव म्हणजे अतुल परचुरे (atul parchure). बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या या अभिनेत्याने मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. नाटक, सिनेमा, मालिका अशा विविधांगी माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. परंतु, मध्यंतरी सारं काही सुरळीत सुरु असताना त्यांना कर्करोगासारख्या असाध्य आजाराला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हा मधला काळ त्यांच्यासाठी प्रचंड जोखमीचा आणि कठीण होता. डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या सल्ल्यामुळे त्यांचा कर्करोग आणखीनच बळावला होता. एका मुलाखतीमध्ये त्यांनी कर्करोग होण्यापासून ते कर्करोगावर मात करेपर्यंतच्या प्रवासाविषयी भाष्य केले.

अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “माझ्या लग्नाला २५ वर्ष झाली. मी एकदम फिट होतो आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलिया-न्युझिलंडला फिरायला गेलो होतो. पण, तिकडून आल्यानंतर काही दिवसांनंतर मला काही खाण्याची इच्छाच होईना. सतत मळमळल्यासारखं व्हायचं. काहीतरी गडबड झाली होती. त्यावर माझ्या भावाने मला काही औषधं सुद्धा दिली. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी मला अल्ट्रासोनोग्राफी करायला सांगितली. त्यावेळी डॉक्टरांच्या डोळ्यात मला भिती दिसत होती. मला तेव्हाच कळलं काहीतरी गडबड आहे. त्यानंतर माझ्या यकृतामध्ये ५ सेंटीमीटर लांबीची कर्करोगाची गाठ असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यावर फक्त मी ठीक होणार की नाही हा एकच प्रश्न विचारला. डॉक्टरांनी हो. तू ठीक होशील असं उत्तर दिलं”, असं अतुल परचुरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “उपचार सुरु झाले पण त्याचा माझ्यावर विपरीत परिणाम झाला. चुकीचा आजार जडल्याने माझी प्रकृती आणखीनच खालावली. सुरुवातीलाच हा आजार न दिसल्यामुळे माझ्या स्वादुपिंडावर परिणाम झाला. चुकीच्या उपचारांमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. मला नीट चालताही येत नव्हतं. मी बोलत असताना स्तब्ध व्हायचो.या अशा परिस्थिती डॉक्टरांनी मला दीड महिना वाट पाहायला सांगितली. त्यांनी सांगितलं जर सर्जरी केली तर वर्षानुवर्ष कावीळ होईल आणि माझ्या यकृतामध्ये पाणी भरेल किंवा मी फार दिवस जगणार नाही. त्यानंतर मी डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार केले.”

त्यानंतर अतुल परचुरे यांनी पुन्हा एकदा रंगमंचावर दमदार कमबॅक केले. ‘खरं खरं सांग’ या नाटकात ते झळकले. इतकंच नाही तर या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी विदेश दौरा देखील केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -