मुंबई : मुंबईत गेल्या ९ वर्षात १९ गोळीबाराच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर वातावरण तापले असताना या वर्षभरात मुंबईत राजकीय हत्या अथवा गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत. त्यात अभिनेता सलमान खानच्या घरावरील हल्ला, घोडपदेव येथील राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाची हत्या, यांचाही समावेश आहे. मुंबईत गेल्या ९ वर्षांत १९ गोळीबाराच्या घटनांमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
नुकतेच ५ ऑक्टोबरला घोडपदेव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) भायखळा विधानसभा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी ऊर्फ मुन्ना (४५) यांची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. आरोपी सराईत असून यापूर्वीही त्यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, धमकावणे, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
त्याआधी १४ एप्रिल रोजी अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. त्याप्रकरणी कुख्यात लॉरेन्स बिष्णोईसह त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी गोळीबार करणारे विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना गुजरातमधून अटक केली होती. याप्रकरणातील आरोपी अनुज थापन याने नुकतीच पोलीस कोठडीत आत्महत्या केली होती. या प्रकरणात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई विरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते.
याशिवाय ७ एप्रिलला आर्थिक वादामुळे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत विजय शेट्टीयार नावाच्या आरोपीने अॅन्टॉप हिल परिसरात आकाश कदमवर गोळीबार केला. शेट्टीयारला नंतर डोंबिवलीतून अटक करण्यात आली.
तर २ फेब्रुवारीला बोरीवली परिसरात माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.