संवाद – गुरुनाथ तेंडुलकर
लोकमान्य टिळकांच्या चरित्रातील हा एक प्रसंग…
वाट्टेल ते खोटे-नाटे आरोप ठेवून आणि खऱ्या-खोट्याची शहानिशा न करता देशद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना सहा वर्षांची सजा सुनावली गेली. इथे हिंदुस्थानात ठेवणे ब्रिटिशांना धोक्याचे वाटले म्हणून टिळकांची रवानगी ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात करण्यात आली. मंडालेचे हवामान अत्यंत दमट, त्यात भरीस भर म्हणून खायला कदान्न. सोबतीला डास आणि पिसवा.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील टिळकांनी तुरुंगातील त्या सहा वर्षांतला प्रत्येक दिवस आणि दिवसाचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावला. त्या सहा वर्षांच्या कालखंडात टिळकांच्या हातून ‘गीतारहस्य’ ग्रंथाची निर्मिती झाली. भगवान श्रीकृष्णाने अर्जूनाला सांगितलेल्या गीतेतील खरे मर्म तत्कालीन समाजाला समजावून त्यांना कर्ममार्गाकडे प्रवृत्त करणारा हा ग्रंथ… ‘गीतारहस्य अर्थात कर्मविपाकशास्त्र’. सहा वर्षांच्या तुरुंगवासात हा ग्रंथ सिद्ध झाला.
वाईटातून चांगले निपजते ते हे असे. मंडालेच्या तुरुंगातील सहा वर्षांची शिक्षा भोगून टिळक सुटले आणि ‘पुनश्च हरि ॐ’ म्हणून राष्ट्रकार्याला नव्या जोमाने सुरुवात केली. एकदा टिळक त्यांच्या मित्राच्या घरी बाबासाहेब खापर्डे यांच्या घरी अमरावतीला मुक्कामाला गेले होते. पुण्यात असताना त्यांना सतत भेटायला येणाऱ्या माणसांच्या वर्दळीमुळे त्यांना क्षणभराचीही उसंत मिळत नसे. पण इथे अमरावतीला मात्र कुणी फारसे भेटायला येत नसल्यामुळे निवांत दोन घटका बसणे शक्य होई.
एके संध्याकाळी टिळक असेच अंगणात झोपाळ्यावर बसून काही तरी वाचत होते. तेवढ्यात एक मध्यमवयीन काळा-सावळा तरुण अंगणात खाली येऊन उभा राहिला. टिळक वाचनात गुंग असल्यामुळे बराच काळ त्यांचे त्याच्याकडे लक्ष देखील गेले नाही. तो तरुण तिथेच खाली अंगणात उकिडवा बसून राहिला.
दिवस कलला, अंधारून आले. अपुऱ्या प्रकाशामुळे टिळकांना नीटसे वाचन करणे जमेना म्हणून कंदील पेटवण्याकरिता ते उठले, त्यावेळी त्यांचे लक्ष अंगणात खाली बसलेल्या त्या तरुणाकडे गेले.टिळकांनी आपल्याला पाहिले हे ध्यानात येताच तो तरुण काठी टेकून लगबगीने उठून उभा राहिला आणि म्हणाला, ‘जोहार मायबाप… रामराम…’
‘उभा राहताना त्याने जमिनीला हात लावून कपाळाकडे नेला आणि टिळकांना नमस्कार केला…’
‘अरे असा बाहेर अंगणात का थांबलास? वर ये.’ टिळक चश्म्याच्या काचा पुसत त्याला म्हणाले.
‘न्हाई न्हाई. खालीच बरा हाये.’ ‘असे काय करतोस? ये, वर ये…’ तो संकोचला. टिळकांनी त्याच्या संकोचाचे कारण ओळखले. ‘तसे काही नाही. आम्ही जातपात मानत नाही. आपण सगळे एकच आहोत. ये. वर ये… ‘टिळकांनी त्याला पुन्हा वर बोलावले. ‘एका माणसाला भेटायचंय…’ ‘पण त्यासाठी आपल्याला स्वतःला महारवाड्यात जाण्याची आवश्यकताच काय? निरोप धाडायचा, तो माणूस स्वतः आपल्या भेटीला येईल.’ उत्तरादाखल काहीही न बोलता टिळक फक्त मंद से हसले. इकडे महारवाड्यात टिळक महाराज स्वतः येताहेत ही बातमी पसरली. जणू पुंडलिकाच्या भेटीला साक्षात पांडुरंगच निघाला होता. तो अपंग तरुण, त्याचे चुलते, इतर नातेवाईक, शेजारी-पाजारी अख्खा महारवाडा टिळकांच्या दर्शनाला लोटला. टिळक स्वतः इथवर येतील अशी कधी कुणी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती.
टिळक त्या तरुणाला म्हणाले. ‘हं दाखव तुझं घर.’ त्या तरुणाच्या पाठोपाठ ते झोपडीत शिरले. तो त्या तरुणाचा म्हातारा आजा खोकत खोकत भिंतीच्या आधाराने कसाबसा उठून बसला. त्याने टिळकांच्या चरणावर डोके ठेवले आणि लहान मुलासारखा ढसढसा रडला. टिळकांनी त्याला उठवले, त्याच्या शेजारी बसले आणि म्हणाले, ‘आपण वयोवृद्ध आहात. स्वराज्याच्या कामी आपल्यासारख्या मोठ्या माणसांचे आशीर्वाद हवेत.’ एवढं बोलून टिळकांनी चक्क त्या म्हाताऱ्याच्या पायाला हात लावून नमस्कार केला. केवळ तो म्हाताराच नव्हे तर उपस्थितांपैकी प्रत्येकजण गलबलला. त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यांतून तर अश्रूंची संततधार लागली होती. तोंडातून शब्द फुटत नव्हता. रडत रडतच त्याने भिंतीच्या दिशेने बोट दाखवले. भिंतीवर विठोबाच्या तस्विरीशेजारी टिळकांचा एक फोटो लावला होता. केसरीच्या जुन्या अंकातला, कापून पुढ्यावर चिकटवलेला तो फोटो विठोबाच्या फोटो शेजारी लावला होता. टिळक ‘लोकमान्य’ झाले ते अशा अलौकिक गुणांमुळे. बुद्धिमत्ता तर होतीच. पण त्या बुद्धिमत्तेला कुठेही अहंकाराचा वारा लागलेला नव्हता.
एक संस्कृत श्लोक आहे
भवन्ति नम्रा तरवः फलागमैः ।
नवाम्बुभिः दूर विलम्बिनो घनाः ।।
अनुद्धताः सत्पुपुषाः समृद्धिभिः।
स्वभाव एवैष परोपकारिणाम् ।।
याच संस्कृत श्लोकाचे मराठीत रूपांतर करताना सुभाषितकार म्हणतात की,
होती थोरहि वृक्ष, नम्र जधिं ये त्यांते फळांचा भर।
येतां नीर नवें, सुदूर घनही ओळंबती भूवर ।।
होती गर्वित ना कधीं सुजन हे, संपत्ति येवो किती ।
त्यांचा हाच असे स्वभाव जन जे अन्यार्थची कष्टती ।।
फळांचा बहर आला की, झाडे नम्र होतात. पाण्याने भरलेले ढग उंचावरून खाली उतरतात. त्याचप्रमाणे वैभव प्राप्त झाले की, सज्जन माणसे अधिकच नम्र होतात.
भगवद्गीतेच्या ‘राजविद्या राजगुह्य योग’ या नवव्या अध्यायावर भाष्य करताना ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात की,
कां फळलिया तरुची शाखा ।
सहजे भूमिसी उतरे देखा ।
तैसे जीव मात्रा अशेखा ।
खालावती ते ।।
केवळ पैसा आणि पुस्तकी शिक्षणाने माणूस मोठा होत नसतो. आपले धन आणि बुद्धी ही समाजाच्या हितासाठी वापरली जावी या तळमळीने जनसामान्यांत राहून जनसामान्यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्याला सामान्य जनता ‘लोकमान्यत्व’ बहाल करते. आपण सर्वसामान्य माणसे जरा चार पुस्तके वाचून एखादी पदवी मिळाली की, फुशारक्या मारतो. बऱ्यापैकी नोकरी लागली की, आपले हात स्वर्गाला लागल्याप्रमाणे वागतो. आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या लोकांचा आणि परिस्थितीने गांजलेल्यांचा पावलोपावली पाणउतारा करतो. समाजात आपण आपल्या आजूबाजूला जरा नजर टाकली की, आपल्याला आढळेल की, अशिक्षितांबद्दल घृणा आणि दरिद्री लोकांबद्दल किळस वाटणारे अनेकजण स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेतात. केवळ पैसा आणि पुस्तकी शिक्षणाने माणूस मोठा होत नसतो. कोणतीही व्यक्ती समाजात वावरताना आपल्यापेक्षा लहान माणसांशी कशी वागते यावरून त्या व्यक्तीचे मोठेपण ठरत असते. म्हणूनच म्हणतात, ‘विद्या विनयेन शोभते…’