नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे
अर्धवट राहून गेलेल्या प्रेमाच्या व्यथा हा एक वेगळाच प्रांत आहे. खरे तर यशस्वी झालेल्या प्रेमकथांपेक्षा अशा असफल प्रेमाच्या कहाण्या कितीतरी पटीने जास्त निघतील. कधी प्रेमिकांच्या सामाजिक, आर्थिक स्तरातील अंतर, कधी जवळच्यांचा विरोध, तर कधी दोघातील एकाचे अचानक बदलणे! शेवट एकच–एकाच्या मनाच्या आयुष्यभर वाजत राहणारी एक मंद विराणी. एका अगतिक क्षणी दोघेही आयुष्य एकत्र घालवण्याचे आपले स्वप्न काही पूर्ण होणार नाही हे सत्य स्वीकारून आपापल्या मार्गाने पुढे जातात. पण पहिले प्रेम विसरणे अशक्यच असते. अगदी ज्याने स्वार्थासाठी कठोरपणे नाते तोडले त्याच्याही मनात कुठेतरी देहभान विसरून जगलेल्या त्या रोमांचक, धुंद क्षणाच्या आठवणी राहतातच. त्यात प्रियकर शायर असेल, तर विचारायलाच नको.
दिल्लीत १८०० साली जन्माला आलेल्या मोमीन खान यांना शायरीची आवड लहानपणापासून होती. प्रारंभीचे शिक्षण अरबीत पूर्ण केलेल्या मोमीन यांचे आजोबा कश्मीरमधून शहा आलमच्या राजवटीत दिल्लीत येऊन राजवैद्य म्हणून स्थायिक झाले. त्यानंतर वडीलही शाही वैद्यच होते. मोमीन हे मोगल साम्राज्याच्या शेवटच्या काळातले शायर मिर्जा गालिब आणि जौक यांचे समकलीन! बहादूर शाह जफर यांच्या लालकिल्ल्यावरील मैफलीतले ते निमंत्रित कवी असत.
मोमीन यांचा ज्योतिषाचाही अभ्यास होता. त्यांनी स्वत:च्या मृत्यूची तारीखही ५ महिने आधीच सांगितली होती. या कलंदर शायरने त्यावरही त्यांची खिलाडूवृत्ती दाखवणारा एक शेर लिहिला! त्यांच्या धार्मिक श्रद्धेप्रमाणे जगाच्या अंतकाळी प्रेषित पुन्हा येऊन सर्वांना ज्याच्या त्याच्या कबरीतून उठवणार आहेत. त्यावेळी सर्व मृत आणि जीवित व्यक्तींच्या भेटी होणार आहेत. मोमीनसाहेब गंमतीने एकदा म्हणतात, ‘मी स्वर्गात गेलो खरा पण प्रियेची भेट काही झाली नाही. कदाचित अजून एक कयामत यायची बाकी असेल!’ –
‘मुझे जन्नत में वह सनम न मिला
हश्र और एक बार होना था’
असफल प्रेमाच्या हळव्या मन:स्थितीत लिहिलेली त्यांची एक गझल प्रसिद्ध आहे. ती इतकी लोकप्रिय झाली होती की बेगम अख्बतर, गुलाम अली, जगजीत सिंग अशा सर्वच गायकांनी ती गायली.आता परिस्थितीमुळे प्रेमिकातले नाते संपले आहे. प्रेमिका कायमची दुरावली त्यालाही मोठा काळ लोटला आहे. मात्र प्रियकराच्या मनात तिची आठवण ताजीच आहे. त्याला वाटते तिलाही माझी आठवण येत असेल का? आपण तिच्याशीच बोलत आहोत अशी कल्पना करून तो
म्हणतो की,
‘वो जो हममें तुममें करार था तुम्हें याद हो की न याद हो,
वही या’नी वादा निबाहका तुम्हें याद हो की न याद हो.’
त्याची काही तक्रार नाही पण तो विचारतो, तुझ्यामाझ्यात जे नाते, जे प्रेम होते ते तुला आठवते का कधी? माहीत नाही! तेव्हाच्या भोळ्याभावड्या निरागस मनाने आपण एकमेकाला दिलेली वचने निभावण्याची शपथ तुला कधी आठवते का? तू मला केवढा आनंद दिलास, माझ्या प्रेमातुर मनावर जो अनुराग दाखवलास ते मला आठवत राहते. तुलाही ते आठवते का?
‘वो जो लुत्फ मुझपे थे बेशतर, वो करम की था मेरे हालपर
मुझे सब है याद जरा जरा, तुम्हें याद हो की न याद हो.’
मग एका पाठोपाठ एक प्रेमातील क्षणांच्या आठवणी त्याला अस्वस्थ करतात. तिच्या मनात काय असेल ठाऊक नाही, माहीत होण्याची शक्यताही नाही. तरीही त्या हळव्या आठवणी तिलाही येतात की, नाही याची त्याला उत्सुकता आहे. तो म्हणतो, ‘त्या आपल्या रोजच्या नवनव्या तक्रारी, ती लुटूपुटुची भांडणे, ते एकेका गोष्टीवर तुझे रुसून बसणे, तुला आठवते का गं कधी?
‘वो नए गिले वो शिकायतें वो मजेमजेकी हिकायतें,
वो हर एक बात पे रूठना तुम्हें याद हो की न याद हो.’
सगळ्यांबरोबर असतानाही आपल्याला बोलायचे असायचे ते एकमेकांशीच! नुसत्या इशाऱ्यांनी आपण कसे बोलायचो, मैफिलीतही हितगुज करायची तुझी माझी ती वेडी हौस तुला कधी आठवते का, माहीत नाही.
‘कभी बैठे सबमें जो रू-ब-रू तो इशारतोंही से गुप्तगू
वो बयान शौक का बरमला तुम्हें याद हो की न याद हो.’
जरी कधी योगायोगाने आपण समोरासमोर आलोच, तर आपल्या जवळच्यांना दोष देत एकमेकाला सतत दिलेली प्रेमाची खात्री कधी तुला आठवते की नाही. असो. मला मात्र ते आठवत राहते.
‘हुए इत्तिफाकसे गर बहम तो वफा जताने को दम-ब-दम,
गिला-ए-मलामत-ए-अकरिबा तुम्हें याद हो की न याद हो.’
तुला माझ्या बोलण्यामुळे मी कधी दुखावले, तर तू मला काही सुनवायच्या आधीच ते विसरून जायचीस. आता आठवते का ते सगळे? हरकत नाही. पण प्रिये, मला मात्र तुझे ते भोळेपण आठवत राहते.
‘कोई बात ऐसी अगर हुई की तुम्हारे जीको बुरी लगी
तो बयाँसे पहलेही भूलना तुम्हें याद हो की न याद हो.’
तेव्हा आपल्यात एक अनावर ओढ होती. दोघांच्या हृदयांना जोडणारी एक पाऊलवाट होती. आपण कधीतरी जिवलग होतो हे आठवते का गं तुला?
‘कभी हममें तुममें भी चाह थी कभी हमसे तुमसे भी राह थी,
कभी हम भी तुम भी थे आश्ना, तुम्हें याद हो की न याद हो.’
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही! तू मला एक वचन दिले होतेस. ते पाळायची तर आता गोष्टच नाही, पण प्रिये, तुला तूच निरागसपणे दिलेले ते वचन कधी आठवते का?
‘सुनो जिक्र है कई सालका की किया इक आपने वादा था,
सो निबाहनेका तो जिक्र क्या तुम्हें याद हो की न याद हो.’
आता सगळे संपले आहे. प्रियकर खरे तर स्वत:शीच बोलतो आहे. त्याची काही तक्रार नाही. पण त्याला आठवते नवसायासाने कधी भेटीची संधी मिळालीच, तर तिचे रागावणे, रुसणे, कितीही समजूत घातली तरी समजावून न घेणे, प्रत्येक गोष्टीला ‘नाही नाही’ म्हणणे, त्याला आठवत राहते.
‘वो बिगड़ना वस्लकी रातका वो न मानना किसी बात का,
वो नहीं नहीं की हर आन अदा तुम्हें याद हो की न याद हो.’
‘तू ज्याला जिवलग म्हणायचीस, ज्याच्या निष्ठेविषयी तूच साक्ष द्यायचीस तो तुझ्यावर फिदा झालेला आस्तिक, प्रामाणिक प्रेमी मीच आहे. पण हे तुला आठवते की, नाही कुणाला ठाऊक !
‘जिसे आप गिनते थे आश्ना जिसे आप कहते थे बा-वफा,
मैं वही हूँ ‘मोमिन’-ए-मुब्तला तुम्हें याद हो कि न याद हो.’
ज्या भेटी आता पुन्हा कधीच होणार नाहीत, जे बोलता येणार नाही, जे प्रश्न विचारता येणार नाहीत मनाच्या खोल गाभाऱ्यात स्वागतासारखे ते हितगुज करण्याचे स्वातंत्र्य कविताच आपल्याला देते. कधीकधी त्याचाही ‘लुत्फ’ घ्यायला
हवा न…