Thursday, January 16, 2025
Homeताज्या घडामोडीआक्षी-साखर बंदराचे काम ३ वर्षात होणार पूर्ण!

आक्षी-साखर बंदराचे काम ३ वर्षात होणार पूर्ण!

विकासासाठी राज्य शासनाकडून १५९ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर

अलिबाग : अलिबागजवळच्या (Alibaug) आक्षी-साखर मच्छिमारी बंदराचा (Fishing Port) विकास आता दृष्टीक्षेपात आला असून, महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाईम बोर्ड)च्या माध्यमातून येथे होणाऱ्या बंदराच्या विविध कामांसाठी राज्य शासनाने १५९ कोटी ९९ लाख ७५ हजार ६९२ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आगामी तीन वर्षात या बंदराचे काम पूर्ण होणार आहे.

आक्षी-साखर हे मच्छिमारी बंदर अलिबाग व आक्षी या दरम्यानच्या आक्षी खाडीकिनारी आहे. गेल्या अनेक वर्षांत या बंदरातील गाळ काढण्यात आला नसल्याने हे बंदर गाळाने भरुन तेथील खोली कमी झाली आहे. परिणामी मोठ्या मच्छिमारी बोटी या बंदरात येण्यात मोठी समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या मच्छिमार बोटी खोल समुद्रात उभ्या करुन त्यांतील मासे छोट्या बोटीतून बंदरकिनारी आणण्याचा त्रास येथील मच्छिमार बांधवांना आहे. त्यामुळे वेळ व पैसा अशा दोहोंचा अपव्यय होत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या बंदरातील गाळ काढून खाडीपात्र खोल करण्याची मागणी होती. ती मागणी पूर्ण होऊ शकणार आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांनी यासंदर्भांत आक्षी-साखर येथे ग्रोयन्स पद्धतीचा बंधारा, जेट्टी, पोहोच रस्ता बांधणे. नौकानयन मार्गातील गाळ काढणे या कामांचा प्रस्ताव सादर केलेला आहे. आक्षी-साखर बंदराच्या विकासाकरिता ग्रोयन्स पद्धतीचा बंधारा, सुसज्ज जेट्टी, पोहोच रस्ता बांधणे आणि अस्तित्वातील नौकानयन मार्गातील गाळ काढणे या कामांची आवश्यकता असून, त्याकरिता महाराष्ट्र सागरी मंडळाने सन २०२२-२३ मध्ये हे १५१ कोटी ९१ लाखाचे अंदाजपत्रक राज्य शासनाला सादर केले होते. त्याला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देऊन हा निधी उपलब्ध करून दिला आहे.

आक्षी बंदरात मोठ्या मच्छिमारी बोटी येण्याकरिता येथील गाळ काढण्याच्या कामाबरोबरच समुद्राच्या येणाऱ्या मोठ्या लाटांमुळे एक येथे निर्माण होणारा जलवेग (वॉटर करंट) थांबविण्याकरिता ब्रेकवॉटर वॉलची निर्मीती करण्यात येणार आहे. त्यामुळे खोल समुद्रातून बंदरात येणाऱ्या बोटी विनासायास येऊन बंदरात सुरक्षित उभ्य़ा राहू शकणार आहेत. दरम्यान बंदराच्या बाजुला असलेल्या जमिनीला सुरक्षितता देऊन वाहनांच्या पार्किगची व्यवस्था करण्याकरिता सुरक्षा भिंत (प्रोटेशन बंड) बांधण्यात येणार आहे. आक्षी बंदराचा विकास येत्या तीन वर्षात पूर्ण होणार आहे. या कामांच्या पूर्ततेअंती आक्षी बंदर एक सुसज्ज मच्छिमार बंदर उदयास येणार आहे. त्यामुळे मच्छिमारी व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -