Monday, April 21, 2025
Homeसाप्ताहिककोलाजशतकाच्या उंबरठ्यावर रा. स्व. संघ (भाग २)

शतकाच्या उंबरठ्यावर रा. स्व. संघ (भाग २)

सर्वेपि सुखिन: संतु, वसुधैव कुटुंबकम, एकं सत विप्रा: बहुधा वदंती, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ, या प्रकारची जी शिकवण आणि संस्कार या देशाने प्राचीन काळापासून दिले आहे, तीच या संघाच्या कामाची दिशा आहे. शून्यातून सुरू झालेला संघाचा हा प्रवास आज विश्वव्यापी झालेला आहे.

विशेष – श्रीपाद कोठे, नागपूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा विस्तार आणि संघाला मिळणारा समाजाचा पाठिंबा यासोबतच, संघाला विरोध, संघाविषयी आक्षेप आणि गैरसमज हेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. संघाला होणारा विरोध हा मुख्यत: राजकीय कारणांनी आणि असूयेपोटी होतो. संघाची एवढी मोठी शक्ती आपल्या राजकीय फायद्यासाठी उपयोगात आणता येत नाही आणि त्याच्यासारखी संघटित शक्ती आपल्याला उभी करता येत नाही, ही विरोधामागील मुख्य कारणे. अन्य प्रकारचा विरोध आणि आक्षेप हे संघ नीट न समजल्यामुळे असतात.

संघ हिंदू शब्दाचा करीत असलेला उपयोग अनेकांना खटकतो. वास्तविक हिंदूंचे स्थान तो हिंदुस्थान हे कितीतरी काळ प्रचलित होते. भारत या प्राचीन नावाबरोबरच हिंदुस्थान हे नाव वापरण्यावर कोणालाही आक्षेप नव्हता. या देशाचे हिंदुत्वच त्यातून व्यक्त होत होते; परंतु इंग्रजांच्या कुटिल राजकारणाने, विशेषत: पाकिस्तान निर्मितीनंतर राजकीय कारणांनी हिंदू शब्द अनेकांना अडसर वाटू लागला. संघाने असंख्य वेळा स्पष्ट केले आहे की, हिंदू संघटन हे कोणाच्याही विरोधात नाही आणि हिंदू राष्ट्र संकल्पना अन्य समाज गटांना दुय्यम ठरवणारी नाही. संघाच्या प्रत्यक्ष कृतीतूनदेखील हे वारंवार स्पष्ट झालेले आहे. अपघात, वादळे, भूकंप, कोरोना यांसारख्या आपत्तींच्या वेळी समाजाची सेवा करताना संघाने हिंदू व अहिंदू असा भेद केलेला नाही. अगदी अहिंदूंचे अंतिम संस्कारदेखील त्यांच्या पद्धतीने केलेले आहेत. मुस्लीम किंवा ख्रिश्चन संप्रदायाच्या प्रमुख लोकांशी संवादाचे प्रयत्न केलेले आहेत. संघप्रेरणेने स्थापन झालेल्या सुमारे तीन डझन अखिल भारतीय संस्थांमध्ये हिंदूंसोबत अहिंदू लोकही सहभागी असतात. संघाच्या शाखा आणि शिबिरे यातही तुरळक मुस्लीम, ख्रिश्चन सहभागी होतात. तरीही अद्याप त्याबाबत अनेकांचे गैरसमज आहेत; परंतु अलीकडे हे प्रमाण कमी झाले आहे.

संघाच्या या भूमिकेलाही पुष्कळांचा विरोध असतो. संघाची भूमिका मवाळ असून संघाने कट्टर हिंदुत्व स्वीकारले पाहिजे असे त्यांचे मत असते. अशा लोकांच्या मते कट्टर हिंदुत्व म्हणजे अहिंदूंना प्रत्येक बाबतीत विरोध. हिंदू संघटन करणाऱ्या संघाला त्यामुळेच अनेक हिंदूच विरोध करतात. संस्कृती, परंपरा, धर्म इत्यादी बाबी महत्त्वाच्या मानत असल्याने, आधुनिक म्हणवणारा एक वर्गही संघाला विरोध करतो. त्या वर्गाच्या मते संघ मागास विचारांचा आणि प्रतिगामी आहे. संघाची एवढी मोठी शक्ती असतानाही संघ देशासाठी आणि समाजासाठी फार काही करीत नाही, असाही एक आक्षेप अनेकांचा असतो. देशातले अनेक वाद, अनेक समस्या संघाने पुढाकार घेऊन सोडवाव्या; अशी त्यांची अपेक्षा असते. संघाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने होणारी संघ स्वयंसेवकांची शिस्तबद्ध विशाल संमेलने, संघाची सतत चालणारी विविध शिबिरे इत्यादी पाहून त्यांच्या अपेक्षा विकसित झालेल्या असतात. संघाचे स्वयंसेवक आणि हितचिंतक हेदेखील संघावर अनेकदा नाराज असतात. लोक संघाबद्दल वाटेल ते खोटेनाटे, कपोलकल्पित काहीबाही बोलतात. त्यावर संघ प्रतिक्रिया देत नाही. संघाने अशा बोलणाऱ्यांचा परखड समाचार घेतला पाहिजे असे त्यांना वाटते. संघ सगळ्याच समाजगटांना, सगळ्याच महापुरुषांना मानतो; हीसुद्धा अनेकांची अडचण असते. सगळ्या समाजाचा विचार म्हणजे आपल्याशी सहमत असणाऱ्यांचा विचार असा त्यांचा समज असतो. समाजात विविध पद्धतीने विचार आणि प्रयत्न करणारे राहणारच हे त्यांच्या लक्षात येत नाही. संघावर नाराज असणारे आणि टीका करणारे इतक्या प्रकारचे लोक आहेत.

एक आणखीन वर्ग अलीकडे उदयाला आला आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेवर असल्याने आणि देशाच्या ऐतिहासिक विकासक्रमात संघ आणि भाजपा यांचे सख्यत्व विकसित झाले असल्याने, भाजपा सरकार जे-जे काही चांगले वा वाईट करीत असेल, त्या प्रत्येक गोष्टीसाठी संघच जबाबदार असतो असे हा वर्ग मानतो. सरकारच्या निर्णयांवर हा वर्ग संघाला प्रश्न अथवा स्पष्टीकरण विचारतो. एक आणखीन आक्षेप संघावर असतो. तो काही प्रमाणात अन्य सगळ्या आक्षेप आणि टीका यांच्यापेक्षा गंभीर आहे. संघाच्या चारित्र्य आणि शुचितेच्या आग्रहामुळे, संघाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्या व्यक्तींचे व्यक्तिगत अथवा सामाजिक अथवा संस्थात्मक वर्तन चुकीचे आढळले, तर त्यासाठी संघच जबाबदार ठरवला जातो.

हे सगळेच आक्षेप, गैरसमज आणि टीका यांचे मूळ संघाचे कार्य आणि त्या कार्याचे स्वरूप याबद्दलच्या अज्ञानात आहे. एखादे विशिष्ट ध्येय अथवा हेतू समोर ठेवून एखादे संघटन तयार करायचे. त्या संघटनेच्या शक्तीच्या बळावर हव्या त्या पद्धतीने, साम, दाम, दंड, भेद वापरून, आपल्याला हवे ते करून घ्यायचे अथवा करायला भाग पाडायचे ही संघाची दृष्टी नाही. सगळा समाज आपण चालवू अशी संघाची भूमिका नाही. एवढेच काय अनंत काळापर्यंत संघ चालत राहावा असेदेखील संघाचे म्हणणे नाही. संघ लोकांमध्ये शिस्त, देशप्रेम इत्यादी गुण निर्माण करतो; परंतु तेही संघाचे कार्य नाही. मग संघाला नेमके करायचे काय आहे? कशासाठी गेली शंभर वर्षे संघाचा हा खटाटोप सुरू आहे? या प्रश्नाचे उत्तर सरळ सोपे असले तरी समजायला कठीण आहे. संघ देशभक्ती निर्माण करतो, शिस्त निर्माण करतो, समाजाची सेवा करतो, समाज कसा असावा याचे एक आदर्श चित्र सगळ्यांपुढे ठेवतो, हे खरे आहे; परंतु हे सगळे करण्यामागे संघाचा विचार वेगळा आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी संघासारख्या वेगळ्या संघटनेची गरज नसावी. या साऱ्या बाबी समाजाचा स्वभाव व्हाव्यात. या चांगल्या गुणांची निर्मिती समाजात स्वाभाविक रितीने होत राहावी, असा संघाचा प्रयत्न आहे. सगळी सूत्रे हाती घेऊन विशिष्ट आदर्श स्थिती निर्माण करायची आणि ती स्थिती टिकवून ठेवण्यासाठी अनंत काळापर्यंत संघ चालवायचा हे संघाला अभिप्रेत नाही. यासाठी व्यक्तीची मानसिकता, विचार, सवयी या सगळ्याला विशिष्ट आकार देत देत समाजाचा सामान्य स्वभाव आणि शक्ती उत्पन्न करायची असा संघाचा प्रयत्न आहे. ही सोपी गोष्ट नाही. एकेका व्यक्तीत असे परिवर्तन वैचारिक, भावनिक आणि व्यावहारिक स्तरावर आणणे ही अतिशय कठीण आणि धीमी प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रकारचे प्रलोभन आणि भय याद्वारे होत नाही. व्यक्तीच्या हृदयाला हात घालावा लागतो. त्यासाठी समाजावर उत्कट प्रेम करणारी माणसे तयार करावी लागतात. या कामात येणारे स्वाभाविक अडथळे, अडचणी, मर्यादा, माणसांचे स्वभाव विभाव, परिस्थिती या सगळ्यांचा साधकबाधक आढावा घेत, विश्लेषणात्मक कार्य करावे लागते. ज्या समाजासाठी हे करायचे त्या समाजाला संघ आपला वाटावा हेही आवश्यक असते. समाजाला संघ आपला वाटावा याचा प्रयत्न करतानाच, अवाजवी अपेक्षा आणि कल्पना यांच्यातून मार्ग काढावा लागतो. अशा असंख्य बाबी लक्षात घेऊन संघाचे मूल्यांकन करावे लागते. राजकीय पक्ष, समाजसेवा करणारी एखादी संस्था, समाज प्रबोधन करणारा एखादा मंच इत्यादी कल्पना मनात बाळगून संघाचा विचार करता येत नाही.

हिंदू समाजाचा हा आतला विकास करण्याची एक विशिष्ट दिशा हेदेखील संघाचे एक वैशिष्ट्य आहे. अन्य समाजांवर, अन्य देशांवर प्रभुत्व सिद्ध करणे ही ती दिशा नाही. सर्वेपि सुखिन: संतु, वसुधैव कुटुंबकम, एकं सत विप्रा: बहुधा वदंती, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ; या प्रकारची जी शिकवण आणि संस्कार या देशाने प्राचीन काळापासून दिले, तीच संघाच्या कामाची दिशा आहे. हे मान्य नसलेले जे-जे समूह किंवा ज्या-ज्या व्यक्ती आहेत त्यांनाही या वैचारिक भूमिकेवर आणायला हवे. त्याशिवाय जगात सुख-शांती नांदणार नाही असा संघाचा विश्वास आहे. त्यासाठी प्रथम हे प्राचीन संस्कारधन ज्या समाजाचा वारसा आहे तो समाज; त्या विचारांना आणि संस्कारांना धरून उभा राहावा असा प्रयत्न करणाऱ्या एका विशाल प्रवाहाचे नाव आहे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -