Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनसंध्याछाया भिवविती हृदया

संध्याछाया भिवविती हृदया

माेरपीस – पूजा काळे

वय नाजूक कोवळे, त्याला वेसण घालते. त्याच्या बांधावर, रूपावर मी भाळते. हे असे रूपावर भाळणे, बिळणे म्हणजे स्वत:नेच स्वतःवर प्रेम करत राहाणे. तसेच वयोपरत्वे जीवनाच्या विविध टप्प्यावर आलेल्या चांगल्या, वाईट गोष्टींचा कमी-अधिक विचार करायचा सोडून देणे. आपण पूर्वाधात सुंदर जीवन जगलो आहोत हे जाणून, उत्तरार्धात तृप्त जगण्याच्या संकल्पासोबत; मनस्वास्थ्याची स्थिती अवघड मृत्यूला सामोरे जाणाऱ्या अद्भूत ताकदीची सत्यता स्विकारली तर, कातरवेळा काळ्या छायेलाही अलगद कवेत घेण्यास उत्सुक होतील. वृद्धत्व म्हणजे अनुभव आणि शहाणपणाची बँक जिथे तुमचा नंबर कधी लागेल याची प्रत्यक्ष परमेश्वरालाही कल्पना नसावी. मानव जन्माच्या वेळेबरोबर मृत्यू वेळेची नोंद ही पूर्वसंचित असावी. म्हणूनच, अपघातात किंवा अरिष्टात जीव वाचलेल्यांना वेळ आली होती, पण काळ आला नव्हता म्हणण्याची प्रथा पडली असावी. वय वाढल्याने नव्हे, तर प्रगती थांबल्याने म्हातारपण येते; या गोष्टीतले तथ्य जाणून घेताना मनाने कायम तरूण राहाणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक देवानंद यांच्या काही ओळी स्पर्शून जातात.

खरे तर अमरत्वाचे वरदान मानवाला नाहीए. पण मृत्यू म्हणजे शाप नव्हे. कर्तृत्वाने सिद्ध झालेल्या अमरत्वावर मोठेपणा मात करतो. ते म्हणायचे, माझ्याकडे थकायलाही वेळ नाही. तुम्ही कामात व्यग्र असाल, तर वय, आजारपण, मृत्यू तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. याच्या मागे जाऊन अभ्यास केला असता, कलाकाराच्या उमद्या विश्वाची सत्यता पटते.
तारूण्य म्हणजे जिद्द, साहस, आकांक्षा, उत्साहाचा धबधबा होय. खरं तरं जीवन रचनेच्या काळाला तारूण्याचा सुवर्णकाळ म्हणता येईल. तारुण्याच्या उंबरठ्यावर भीतीचा लवलेश नसतो. सळसळत्या रक्त प्रवाहात संकट झेलली जातात. भव्य, उत्कट, उदात्त स्वप्न झोकून देण्याच्या वयात हळूहळू मार्गस्थ होताना, येणाऱ्या काळात वय अधिक वाढतं आणि परीपक्व होतो आपण. वय, काळाच्या मधलं गणित म्हंटल, तर सोपं… म्हंटल तर अवघड असतं.

एक इर्षा आतल्या आत जागवत असते. अनुभवाची पोतडी भरली जाते. संथपणे अंतर्मनाला बिलगते. एकेक पान उलटावं तशी रथचक्राची चाकं वायूवेगे फिरतात. त्यातून आपली नैय्या पार होते न होते, तोच मध्यावर वयाच्या एका नवीन टप्प्यावरचा प्रवास सुरू होतो. मेहनतीला पर्याय नसल्याने जगण्याच्या संघर्षात कष्टाशी काडीमोड करण्याचा प्रश्न उरत नाही. दिवसभराची तंगडतोड, कठोर मेहनत केली असता, श्रमसाफल्याचा परिणाम झोपण्याच्या कामी येतो. हा प्रवास कष्टाचा, खचलेल्या गाळात रुतलेल्या मनाचा असल्याने वय सरत. संथपणाने निसटत चाललेला सेकंद काळाची गती सोडत नाही. घड्याळाची टिकटिक त्यातील सेल संपल्याखेरीज थांबत नाही. विशिष्ट काळात आपण एवढे परीपक्व होतो की, काही समयी कोणाचं असणं वा नसणं याचा फरक पडत नाही. या प्रवासात एक वाट जी नेहमीचं खुणावत असते आपल्याला, तेच ते वाकुल्या दाखवणार, मिणमिणत्या डोळ्यांना घाबरवणारं संध्याछायेचं अवघड वळण. अस्वस्थ करणारी शांतता त्यातून निर्माण झालेले अनंतवादी गूढ रहस्य. यातला मोकळेपणा हवासा, तरीही नकोसा झालेला. दारापलीकडे ठोकावत असलेली अद्भुत, अनाकलनीय शक्ती, जी त्रस्त करून बैचेनी वाढवते. कापडी घड्या पडाव्यात तशा पडतात अंगावर सुरकुत्या. गळलेले एकेक अवयव ग्वाही देतात वेळ काळाची. जाण्याच्या वाटेवर उभा असलेला चमचमणारा कळस दिसू लागतो. कारण शिकणं थांबवलेलं असत आपणं. शिकायचे थांबल्यापासून उत्तमातले उत्तम जगाला दिल्याशिवाय मरण्यात अर्थ नाही हे कळल्यावर कोलमडतो आपण. सुखाने जगायचं, मरण टाळायचं, तर होईस्तोरावर चांगल्या कामाचे मळे फुलवायचे; हे कळण्या इतपत मृत्यू दत्त म्हणून उभा राहातो दारात. आयुष्य सरत, बुद्धी क्षिणते, गलितगात्र अवयव मान टाकतात. पिकलं पान गळून पडणार या जाणिवेनं गती वाढते हृदयाची.

एक हृदय, दोन कवाडे. अस्वस्थ जाणिवेत वय सापडे. हृदयाची घालमेल वाढतं तुफान माजतं अवतीभवती. वावटळीला जोर चढतो. कातरवेळी मैलभर निम्म दाट काळोख पसरतो. रात्र एकाकी पाडते. सांगावा येतो पालखीचा. पांढऱ्या कफनीतले दूत दार वाजवतात रात्रीला. सावल्या नाचतात, अंगावर पडतात. मग तुमच्या कर्मानुसार गणती होते यमसदनासाठी. उचलले जातात मुडदे. दाराशी मृत्यूला पाहातचं जगण्याच्या इच्छाशक्तीला जोर येतो. आपण उठतो, पडतो, धडपडतो अन् साक्षीदार ठरतो अनामिक प्रवासाचा. शांततेचा सूर आणि बेसूर रडणं कानी येत. निशब्द वलय निर्माण होत गाठ सुटते शब्दांशी, नात्याची. एव्हाना थकलेल्या देहातलं चैतन्य दूर निघून गेलेलं असत, वैश्विक पोकळी व्यापण्यासाठी. वैश्विक पोकळी व्यापण्यासाठी…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -