Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीShirdi Sai Baba : काल्याच्या किर्तनाने साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता

Shirdi Sai Baba : काल्याच्या किर्तनाने साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता

भिक्षा झोळीत ११५ पोते धान्यासह ४ लाख २७ हजार रुपयांची देणगी

शिर्डी : जग प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या तीन दिवसीय ( दसरा ) पुण्यतिथी उत्सवाची सांगता रविवारी काल्याच्या किर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली. श्री साईबाबांच्या हयातीपासून सुरू असलेल्या भिक्षा झोळीचा कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला असून भाविकांनी भरभरून ११५ पोते धान्य तसेच ४ लाख २७ हजार रुपये भिक्षा झोळीत टाकले आहे.

दरम्यान रविवारी उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ५.५० वाजता श्रींचे मंगल स्नान व त्यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी ७ वाजता साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. सकाळी १० वाजता ह.भ.प.कैलास खरे,रत्नागिरी यांचे काल्याचे कीर्तन झाले. काल्याच्या किर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त बायजाबाई कोते व तात्या पाटील कोते यांचे वंशज परिवारातील सदस्य राजेंद्र सुभाष कोते यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,संरक्षण अधिकारी रोहिदास माळी,मंदिर पुजारी,शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रींची मध्यान्ह आरती झाली. तर दुपारी १ ते ३ उदय दुग्गल,पुणे यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम, दुपारी ३.३० ते ५.३० वा.ललिता पांडे,जोगेश्वरी यांचा ‘साई स्वराधना’ कार्यक्रम झाला. तसेच सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती,सायं.७ ते ९.३० यावेळेत सक्सेना बंधु, दिल्ली यांचा ‘साईभजन संध्या’ हा कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला. रात्री १० वाजता श्रींची शेजारती करण्यात आली. श्री साईबाबा पुण्यतिथी ( दसरा ) उत्सवाच्या मुहुर्तावर श्री साईबाबा संस्थान प्रकाशित श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे ( सोनटक्के ), मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते श्री साई सभागृह येथे संपन्न झाला. हा उत्सव यशस्वरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, सीईओ गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे प्र.उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदिपकुमार भोसले,सर्व प्रशासकीय अधिकारी,संरक्षण अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

४ लाखाहून अधिक भिक्षा झोळीव्दारे प्राप्त 

श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या भिक्षा झोळीत ग्रामस्थ व साईभक्तांनी भरभरुन दान दिले. यामध्ये गहु, तांदुळ ज्वारी व बाजरी असे सुमारे ११५ पोते धान्यरुपाने आणि गुळ, साखर व गहु आटा आदीव्दारे ३ लाख ६५ हजार ५३० रुपये व रोख स्वरुपात रुपये ६१ हजार ५०१ रुपये अशी एकूण ४ लाख २७ हजार ३१ रुपये इतकी देणगी भिक्षा झोळीव्दारे प्राप्त झाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -