Saturday, May 3, 2025

किलबिलसाप्ताहिक

ससा आणि वाघ...

ससा आणि वाघ...

कथा - रमेश तांबे 

एकदा काय झाले. जंगलात नवलच घडले. वाघाची अन् साळींदराची झटापट झाली. छोटासा साळींदर आणि भला मोठा वाघ. पण साळींदर काही केल्या ऐकत नव्हता. मग वाघाला आला राग. तो त्याला पंजा मारू लागला. आपल्या जबड्यात धरण्याचा प्रयत्न करू लागला. पण साळींदरदेखील कमी नव्हता. तो आपल्या अंगावरचे काटे फुलवायचा. त्यामुळे वाघाच्या पंजात, तोंडात, गालावर पटापटा काटे रुतत होते. ते काटे काढण्यात वेळ जाऊ लागला. थोड्याच वेळात वाघाचे तोंड स्वतःच्याच रक्ताने लालभडक झाले.पण वाघ काही माघार घेईना. त्याने पुन्हा साळींदरावर जोराची झेप घेतली. पण हाय रे दैवा! साळींदराचा एक काटा वाघाच्या नाकावर असा काही घुसला की बस! वाघ अगदी जोरात कळवळला. तो पंजाने, जिभेने नाकावरचा काटा काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो इतका रुतला होता की बस. या गडबडीत साळींदर कुठे गायब झाले ते वाघाला कळलेच नाही. वाघ नाकावर काटा घेऊन तसाच बसून राहिला कितीतरी वेळ. तितक्यात समोरून एक हरीणताई जाताना वाघाला दिसली. तिला पाहताच वाघ म्हणाला, हरीणताई, हरीणताई जरा मदत करा मला, नाकावरचा काटा माझ्या खेचून काढा! हरीणताई हसत हसत म्हणाली, “नको रे बाबा, काट्याच्या निमित्ताने जवळ बोलावशील आणि मलाच धरशील” अन् हरीणताई तशीच निघून गेली. थोड्या वेळाने तिथे एक हत्ती आला. त्याला बघून वाघ म्हणाला, “हत्ती भाऊ हत्ती भाऊ जरा मदत करा ना. नाकावरचा काटा माझा तुम्ही खेचून काढा ना!” हत्ती हसत हसत म्हणाला, “नको रे बाबा. काटा काढायच्या बहाण्याने जवळ बोलावशील आणि मलाच लोळवशील.” बिचारा वाघ तसाच बसून राहिला. कोण येतोय त्याची वाट बघत. थोड्या वेळाने तिथे म्हशींचा कळप आला. पण त्यांना बघून वाघ लपून बसला. काटा नाकावर तसाच ठेवून! असे करता करता झाली दुपार. दुखण्याला राहिला नाही सुमार. काटा काढण्यासाठी जसा वाघ पंजा लावायचा तसा काटा अधिकच रुतायचा. मग थोड्या वेळाने तिथे एक ससा आला. पण वाघाला बघताच तो जरा घाबरला. तिथून पळण्याचा प्रयत्न करू लागला. तोच वाघ म्हणाला, सशा सशा ऐक जरा. नाकावर माझ्या काटा रुतलाय. नाकावरचा काटा काढून दे मला, मी तुझे रक्षण करेन. तसा ससा थांबला, विचार करू लागला. कालच शाळेत गुरुजींनी शिकवलेला धडा आठवू लागला. सशाने वाचले होते प्राणीमात्रांवर दया करावी. त्यांना संकटातून वाचवावे. वर्गातले सारे आठवताच ससा वाघाच्या दिशेने हळूहळू पुढे सरकू लागला.

तोच मागून हरीणताईचा आवाज आला. “सशा सशा करतोस काय? वाघाच्या जवळ जातोस कशाला?” ससा मागे वळून पाहतो तर काय! हरीणताई त्याला विनवणी करत होती. पण ससा तसाच पुढे जावू लागला. तोच हत्तीचा आवाज आला. “सशा सशा करतोस काय? वाघाच्या जवळ जातोस कशाला? काट्याच्या निमित्ताने जवळ बोलावेल आणि तुलाच गट्टम करेल.” पण सशाने कोणाचेही ऐकले नाही. तो वाघाच्या जवळ गेला. त्यावेळी हरीणताई, हत्ती आणि अनेक प्राणी सशाचे धाडस बघत होते. सशाला वेडा म्हणत होते. पण सशाने जवळ जाऊन हाताने वाघाच्या नाकावरचा काटा हळुवारपणे काढला. तेव्हा कुठे वाघाला बरे वाटले. मग काय काटा निघताच वाघाने एक मोठी डरकाळी फोडली. सारे जंगल दणाणूून गेले. हत्ती, हरीणताई आणि इतर प्राणी खूप घाबरले. ससादेखील घाबरला. पण वाघ म्हणाला, “घाबरू नकोस तू मला मदत केली आहेस. ही गोष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही” आणि मग पुढे ससा आणि वाघ अगदी मित्रांसारखे राहू लागले.

संपली आमची गोष्ट... होती ना खूपच मस्त!

Comments
Add Comment