मायभाषा – डॉ. वीणा सानेकर
एका अनपेक्षित स्वप्नाने जाग आली आणि मी खूप अस्वस्थ झाले. माझ्या सभोवताली पुस्तकेच पुस्तके पसरलेली होती.
सर्व पुस्तके मराठी भाषेतली, विविध साहित्यप्रकारांची आणि सर्व वयोगटातील वाचकांसाठीची होती. अचानक ती बोलू लागली. काही पुस्तके अक्षरश: धुळीने भरून गेली होती. ती उदास होती. रडवेल्या सुरात ती म्हणाली, “ वर्षानुवर्षे कुणी आम्हाला हातही लावला नाही. आम्ही ग्रंथालयातील कपाटांत निवांत पडून आहोत. वाचकांनी हाती घ्यावे आणि आमच्यात दडलेला ज्ञानाचा खजिना त्यांच्या हाती पडल्यावर लकाकणारे त्यांचे डोळे पाहावे म्हणून आम्ही वर्षानुवर्षे आसुसलो आहोत.”
इतक्यात जाणवले की, आणखी पुस्तके काहीतरी सांगू पाहात आहेत. ही सर्व लहान मुलांसाठीची पुस्तके होती. बालकविता, बालकथांची ही पुस्तके अतिशय आकर्षक होती. रंगीत चित्रे, मोठी अक्षरे अशी त्यांची सजावट लक्षवेधी होती. बोलण्यासाठी ती आतुर झाली होती.” आम्ही मराठीतली बालसाहित्याची पुस्तके. लहान मुलांनी आम्हाला हाती घ्यावे आणि आनंदात वाचावे ही आमची इच्छा. मुले वाचतात ही पुस्तके पण इंग्रजीत. आमची ओढच वाटत नाही त्यांना. खरे तर आम्ही जास्त महागही नाही. मॉल्समधली पुस्तकांची दालने आम्हाला किती आवडतात पण मुलांना आम्ही आवडत नाही म्हणून मराठी बालसाहित्य मॉलमध्ये विशेष ठेवत नाहीत. आम्हीही नाही तर तिथल्या रंगीत दालनात मुलांची बडबड अनुभवली असती. त्यांची गोड किलबिल आमच्या पानापानांतून साठवून ठेवली असती. खरे तर पालकांनी योग्य वयात आमच्याशी मुलांची गट्टी करून दिली, तर मुले आनंदाने वाचू लागतील पण तसे घडत नाही.” काही पुस्तकांचा मुद्दाच वेगळा होता. ती सांगत होती की, काही मोठ्या घरांमध्ये पुस्तके ही सजावटीची वस्तू झाली आहेत. त्यांच्या भव्य हॉलमधल्या सुंदर कपाटांमध्ये ती विराजमान असतात. त्यांच्यासकट कपाटांची साफसफाई अगदी वेळच्या वेळी केली जाते, पण ती फक्त प्रदर्शनीय वस्तू म्हणून राहतात.
काही पुस्तके अतिशय जुनाट झाली होती. एका छोट्याशा गावात त्यांचे वास्तव्य होते. ती सांगू लागली गावातल्या ग्रंथालयाचे दु:ख ! ग्रंथालयाला पुरेसे अनुदान नाही म्हणून पुस्तकांच्या जतन- संवर्धनाची सतत चिंता असते. या गावात वाचकवर्ग आहे पण पुरेशी पुस्तके नाहीत. नवी पुस्तके वाचायला तर वाचकांना खूप वाट पाहावी लागते. एका महाविद्यालयातल्या ग्रंथालयातली पुस्तके दीर्घ कालपटच साकार करू लागली. ‘‘महाविद्यालय दरवर्षी आमच्याकरिता तरतूद करते. ग्रंथालयसेवकांचे देखील विविध स्वभाव पाहिले आम्ही. काही वाचनालयाचा अभ्यास इतका चोख करतात की, अभ्यासूंना अपेक्षित विषयाकरिता प्रयत्नपूर्वक संदर्भ शोधून देतात, तर काहींना कपाटेही उघडण्याचे कष्ट घ्यायला आवडत नाही. विद्यार्थ्यांचे देखील विविध प्रकार पाहतो आम्ही. काही विद्यार्थी असे असतात, जे ग्रंथालय बंद होईपर्यंत तासन् तास वाचत राहतात. अलीकडे विद्यार्थ्यांचा गुगलबाबावरच विश्वास जास्त. गुगलबाबा सारे शोधून देत असतील, तर वाचनाचा व्यासंग करणार कोण?” पुस्तकांना हेही सांगायचे होते की, पुस्तकांच्या दुकानांकडे वाचक वळत नाहीत. सण उत्सवांच्या निमित्ताने, खरेदीच्या निमित्ताने वाचकांना हव्या असलेल्या गोष्टींमध्ये पुस्तके अपरिहार्यपणे नसतात हे त्यांचे दु:ख होते. स्वप्नात पुस्तके अखंड बोलत होती. त्यांचा आवाज इतका वाढत होता की, तो असह्य होऊ लागला. त्या आवाजात तक्रार होती, विनंती होती, व्यथा होती ,वैफल्यही होते. पुस्तके निर्जीव नव्हती. त्यांची अक्षरे ही त्यांची जिवंत स्पंदने होती. वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर मला पडलेल्या स्वप्नाला मोठा अर्थ होता. पुस्तकांचा विश्वास होता की, माणसांच्या सहवासात त्यांचे अस्तित्व पूर्ण होते पण त्या-त्या भाषकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली, तर पुस्तकांचे अस्तित्वच अपुरे राहते. माझ्या स्वप्नातली सर्व पुस्तके मराठी भाषेतली होती. त्यांना प्रश्न पडला होता, “ मराठी भाषकांंच्या-वाचकांच्या आयुष्यात आम्हाला स्थान आहे का?”