विशेष – वैशाली गायकवाड
“प्रथम वंदन माझ्या माय मराठीला, माझ्या मातृभाषेला” आपल्या मराठी भाषेबद्दल पोवाड्यातील ही ओळ ऐकली की, रोमारोमात संचारलेला आपल्या भाषेबद्दल अभिमान अधिक जागृत होतो. मराठी भाषेची शानच न्यारी. म्हणून ती बोलण्याची, शिकण्याची, शिकवण्याची, आत्मसात करण्याची ओढ ही प्रत्येक मराठी माणसांत उपजतच आहे; परंतु मधली काही वर्षे इंग्रजी माध्यमाचे गारूड इतके बिंबवले गेले की, कुठे तरी आपली मातृभाषा मागे पडत चालल्याची खंत वाटून अनेक संस्थांनी, व्यक्तींनी ती टिकावी म्हणून जे प्रयत्न केले त्या सगळ्या प्रयत्नांची सुफळ संपूर्णता म्हणजेच तो दर्जा प्राप्त झाल्याचा दिवस. प्राचीन काळापासूनच आपली भाषा ही अभिजात आहेच; परंतु ज्या दिवशी शासन मान्यतेने मोहोर उमटवल्यानंतरचा क्षण, तो दिवस म्हणजे लतादीदींच्या आवाजातील शब्द आठवतात ‘अजी सोनीयाचा दिनु वर्षे अमृताचा धनु’. खरंच आपली भाषा ही सोन्यासारखी लख्ख आणि सातत्याने आपल्याला अमृतरूपी साहित्य मिळवून देणारी आहे.
देशात आतापर्यंत सहा भाषांनाच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तमिळ भाषेला सर्वात आधी २००४ साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला. त्यापाठोपाठ संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगू (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला. हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते.
अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५०-३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह, इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिले जाते.अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची स्थापना केली जाते. प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्रे उभारली जातात. भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार.
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असायला हवी. त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी. ते मूळ त्याच भाषेत लिहिलेले असावे, तर अनुवादित नसावे. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे. अशा सर्व निकषांमधून आपल्या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे•; परंतु अभिजात दर्जा मिळाला म्हणून आपण आपल्या भाषेला गृहीत धरून चालणार नाही किंवा फक्त अभिजात दर्जाचे सर्टिफिकेट लावून भागणार नाही, तर तिची जोपासना वेगवेगळ्या परिघामार्फत कशी करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्नपूर्वक राहणे गरजेचे आहे. असेच प्रयत्न गेली १९ वर्षे ठाण्यातील व्यास क्रिएशन्स प्रकाशन संस्थेमार्फत सातत्याने केले जात आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत वाचन संस्कृती रुजावी, सातत्याने वाढत राहावी यासाठी अनेक उपक्रमांची मालिका व्यास क्रिएशन्सने चालवली आहे. लहान मुलांच्या भावविश्वाचा विचार करत २०० पुस्तकांचा बालखजिना घेऊन बालचमूंसाठी ‘वाचू ज्ञान आनंदे’ महोत्सव अखंड राबविला जात आहे. या महोत्सवात शिक्षक, विद्यार्थी यांचे एक वेगळेच बॉण्डिंग बघायला मिळते. त्यानंतर आपण वाचून झालेल्या पुस्तकांचे काय करायचे हा मोठा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो. योग्य पुस्तक योग्य वाचकांच्या हातात पडणे तेवढेच गरजेचे असते. यासाठीच व्यास क्रिएशन्सकडून तब्बल तीनदिवसीय ‘पुस्तक आदान-प्रदान’ महोत्सव भरवला जातो.
तुम्ही वाचलेली पुस्तके इथे घेऊन यायची आणि न वाचलेली तेवढीच! पुस्तके तुम्ही घेऊन जायची. आहे की नाही किती छान कल्पना! जिथे होते लेखकांची वाचकांशी भेट तिथे पोहोचतात भावना थेट. या महोत्सवात पुस्तक प्रकाशन सोहळे रंगतात, साहित्यिकांची मांदियाळी इथे बघायला मिळते. पुस्तकांसोबतच विचारांचे आदान-प्रदानदेखील इथे होते. आदान-प्रदान महोत्सवात लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्या पिढ्या एकत्र येऊन पुस्तकांबद्दलच्या चर्चा करतात. ‘पुस्तकांना हवा मोकळा श्वास, पुस्तकांना हवा तुमचा सहवास’ या संकल्पनेखाली दरवर्षी दिमाखात तब्बल ४० ते ५० हजार पुस्तकांचे आदान-प्रदान यानिमित्ताने होत असते.
तसेच मुलांनी पुस्तके वाचावीत यासाठी अभिवाचन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, कविता वाचन स्पर्धा अशा बहुआयामी स्पर्धांमधून मुलांच्या वाचनासारख्या कलेचा विकास होतो आणि मग त्यामुळे आवडदेखील निर्माण होते. हल्ली गुगलवर उपलब्ध असलेली माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान मिळविण्यासाठी संशोधन करावे लागते. सातत्याने वाचनाचा ध्यास असावा लागतो. यासाठी निबंध स्पर्धा, चित्रातून अनेक गोष्टी कळाव्यात यासाठी चित्रकला स्पर्धा, वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून दरवर्षी ‘वाचन प्रेरणा’ दिनाच्या दिवशी बालवर्गासाठी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या स्पर्धांचे, उपक्रमांचे आयोजन केले जाते. आपल्या भाषेचा प्रसार व प्रचार होण्यासाठी व्यास क्रिएशन्सने आजपर्यंत ७५० हून अधिक दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन करून अनेक लिहित्या हातांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. १९ वर्षे सलग तीन दिवाळी अंकांचे (प्रतिभा, आरोग्यम्, पासबुक आनंदाचे) प्रकाशन करून आपल्या भाषेची खऱ्या अर्थाने प्रकाशमय दिवाळी साजरी केली आहे. अशा अभिनव संकल्पनांनी परिपूर्ण असलेला दिवाळीचा खुसखुशीत साहित्यिक फराळ दरवर्षी वाचकांच्या भेटीला येत आहे. तसेच व्यास क्रिएशन्स म्हणजेच नवनिर्मितीचा वसा घेतलेली युवा प्रकाशन संस्था. ज्येष्ठांसाठी ज्येष्ठविश्व त्रैमासिक, महिलांसाठी राज्ञी वुमन वेल्फेअर असोसिएशनतर्फे महिलांनी महिलांसाठी केलेला ‘कस्तुरी’ महिला विशेषांक, प्रत्येक महिलेने वाचनाची गोडी आपल्या कुटुंबात रुजवावी म्हणून महिलांसाठी चालू केलेली ‘पुस्तक भिशी’ योजना. या योजनेअंतर्गत दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी एकत्रित भेटून महिनाभर आपण वाचलेल्या पुस्तकावरील चर्चा, अभिवाचन, कविता असे छोटेसे महिला संमेलन घडवून प्रत्येकीने वाचलेले पुस्तक दुसरीने का वाचावे हे थोडक्यात कळल्याने आपल्या भाषेची, पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन, एकमेकींना देण्याची ही अभिनव कल्पना राबविली जात आहे. या अंतर्गत फिरता वाचन कट्टादेखील चालू केला आहे. दर महिन्याच्या पुस्तक भिशीसाठी तुम्हाला चिठ्ठ्यांमध्ये येणारी पुस्तके वाचायला मिळणे हे या भिशीचे वेगळे स्वरूप आहे. तसेच समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पुस्तक पोहोचावीत, समाजातील प्रत्येक स्तरातील मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून विश्वास मतिमंद मुलांची शाळा, चैतन्य उद्योग शाळा अशा शाळांमध्ये या मुलांसोबत पुस्तक हंडी, रक्षाबंधन असे वेगवेगळे उपक्रम करून त्या मुलांना पुस्तकांची आवड निर्माण व्हावी म्हणून सातत्याने सलग आठ ते दहा वर्ष हे उपक्रम राबवले जातात. आपल्या भाषेची मुलांना लहानपणापासून ओढ लागावी यासाठी निवडक शाळांमधून बाल साहित्य संमेलन भरवणे, दर चार वर्षांनी निबंध, काव्य लेखनाची मॅरेथॉन स्पर्धा भरवणे आदिवासी पाड्यांमध्ये, गावांमध्ये ग्रंथालय उभारण्यासाठी, वृद्धाश्रमांसाठी, अनाथ आश्रमांसाठी, पुस्तके दान करणे • अशा विविध मार्गांनी व्यास क्रिएशन्स सोबत आपण सर्वच आपली भाषा अजून अधिकाधिक फुलावी, सजावी, कानाकोपऱ्यांत पोहोचावी यासाठी संपूर्ण तयारीनिशी कटिबद्ध होऊया आणि आपली मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी व्यास क्रिएशन्स कायम महाराष्ट्रातून आणि देश-विदेशातील अनेक लेखकांकडून उत्तम साहित्याची निर्मिती करत अभिनव कलाकृतीची सृजनशीलता जोपासत राहील.•