विशेष – भालचंद्र ठोंबरे
त्रेतायुगात एकदा देव व दानवांच्या युद्धात ईक्ष्वाकू वंशातील राजा मांधात याचा पुत्र राजा मुचकुंद हा देव-दानव युद्धात देवांना सहाय्य करण्यासाठी गेला. त्याने आपल्या पराक्रमाने राक्षसांचा संहार करून देवांना मदत केली. युद्धात देवांचा जय झाल्यानंतर युद्ध समाप्तीनंतर त्यांनी पृथ्वीवर आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा देवेंद्राने त्यांना पृथ्वी आणि स्वर्गातील कालगणनेत खूप फरक असून आता पृथ्वीतलावर बराच कालावधी उलटून गेला. तसेच तेथे तुमच्या अनेक पिढ्या झाल्या असून तुमच्या काळातील कोणीही उरलेले नाही, असे सांगितले. तेव्हा मुचकुंदाला फार वाईट वाटले. त्याने इंद्रदेवांकडे निद्रेचे वरदान मागितले. तेव्हा इंद्राने त्यांना पृथ्वी तलावर एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन झोपण्यास सांगितले. जो कोणी तुम्हाला निद्रेतून जागं करेल त्याच्यावर नजर पडताच तो भस्म होईल असा वर दिला. त्यानुसार मुचकुंद एका गुहेत निद्रिस्त झाले.
द्वापार युगात त्रिगत राजाचे कुलगुरू ऋषी शशीरायन (कुठे शशीनारायण असाही उल्लेख आहे) शिवभक्त होते. त्यांनी शिवाला प्रसन्न करून एका अजेय पुत्राचे वरदान मागितले. महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले. त्यानुसार त्यांचा पूत्र कोणत्याही अस्त्राने वा शस्त्राने मरणार नाही असा वर दिला. वर प्राप्तीनंतर शशिरायन यांच्या शरीरकांतीत सतेज व सुंदर असा क्षत्रिय बदल झाला. तसेच त्यांची झोपडीही राजप्रसादात बदलली.
एके दिवशी शशिरायन हे नदीकाठी फिरत असताना त्यांनी रंभा नावाच्या अप्सरेला तेथे स्नान करताना पाहिले. तिला पाहताच ते तिच्यावर मोहीत झाले. अप्सरेलाही शशिरायन आवडले. त्याच्या मिलनपासून त्यांना एक पूत्र झाला तोच कालयवन. सध्याच्या अफगाणिस्तान व ईराण सीमेवर त्याकाळी एक मलिच्छ नावाचे राज्य होते. तेथे कालजंग नावाचा राजा राज्य करीत होता. तो निपुत्रिक होता. त्याला एका साधूने शशिरायनाकडून त्याचा पूत्र दत्तक म्हणून मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे कालजंगनी शशिरायनाला विनंती केली असता शशिरायनाने काल जंगकडे पूत्र सोपविला व पुन्हा तपश्चर्येत लिन झाले. कालजंगानंतर कालयवन मलिच्छ देशाचा राजा झाला. त्याला आपल्या अजेयतेचा गर्व होता. तेव्हा महर्षी नारदांनी त्याला श्रीकृष्णाशी लढण्याचा सल्ला दिला. त्याने जरासंघाशी मैत्री करून ते दोघेही मथुरेवर चाल करून गेले.
त्यांनी मथुरेला वेढा देऊन श्रीकृष्णाला युद्धाला आव्हान केले. श्रीकृष्णाने कालयवनाला वैर आपल्या दोघात आहे. त्यामुळे सैन्याला यामध्ये आणून मनुष्यहानी का करावी, उलट आपण दोघे मल्लयुद्ध करू, असा प्रस्ताव ठेवला. कालयवनानेही ते मान्य केले व तो मल्लयुद्धाला तयार झाला. बलरामाला मात्र श्रीकृष्णाचा हा प्रस्ताव मान्य नव्हता. त्याने श्रीकृष्णाला या मल्लयुद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कृष्णाने कालयवनाला असलेल्या वरदानाची गोष्ट सांगितली व त्यांचा वध मुचकुंदाकडूनच होणार असल्याचेही सांगितले. शेवटी कालयवनाने कृष्णाला मल्लयुद्धांसाठी आव्हान केले. तेव्हा कृष्ण अचानक मागे वळून पळू लागले. कालयवन त्यांच्या मागे त्यांना पकडण्यासाठी धावू लागला. कृष्ण, मुचकुंद ज्या पहाडावरील गुहेत झोपले होते. त्या गुहेत शिरले. आपल्या खांद्यावरील उपरणे निद्रिस्त मुचकुंदाच्या अंगावर पांघरले व स्वतः लपून बसले. कालयवन गुहेत शिरला व वस्त्र पांघरून झोपलेला श्रीकृष्णच आहे व आता झोपेचे सोंग घेऊन पडला असावा असे समजून त्याने लाथ मारून त्यांना उठविले. मुचकुंदाने जागे होऊन हळूहळू डोळे उघडून कालयवनावर नजर टाकताच कालयवन जळून भस्म झाला.
अशाप्रकारे कालयवनाला त्याच्या पित्याला मिळालेल्या वरदानाचा फायदा घेऊनच कृष्णाने ठार केले. याच घटनेमुळे कृष्णाला रणछोडदास ही पदवी मिळाल्याचे मानले जाते आहे.