ओंजळ : पल्लवी अष्टेकर
समाजात वैशिष्ट्यपूर्ण काम करणारे लोक असतात, त्यांच्या कार्याने व कर्तृत्वाने समाजाला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते. शिंपल्यातील मोती ज्याप्रमाणे सहजा-सहजी सापडत नाही, त्याप्रमाणे अशा लोकांचे कार्य देखील वेगळे, अलौकिक असते.त्यातलेच एक म्हणजे रवींद्रनाथ टागोर होत. त्यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कलकत्ता या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महर्षी देवेंद्रनाथ टागोर व आईचे नाव शारदादेवी. अलौकिक प्रतिभा रवींद्रनाथांकडे होती. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली. त्यांनी लिहिलेली पहिली लघुकथा त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी प्रसिद्ध झाली. त्यांचे तीन मोठे भाऊ उच्च-विद्याविभूषित होते. त्यांना दोन थोरल्या बहिणी होत्या. रवींद्रनाथांच्या मनावर बालपणापासून ब्राह्म समाजाच्या व उपनिषदांच्या शिकवणीचा खोल परिणाम झाला. त्यांना लहानपणापासून कुटुंबात साहित्यिक वातावरण लाभले. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी घरच्यांनी त्यांना इंग्लंडला पाठविले. पण तिथे त्यांचे मन रमले नाही.
सन १८८३ मध्ये त्यांचा विवाह मृणालिनीदेवींशी झाला. अभ्यासासाठी निसर्गाचा सहवास सर्वोत्तम आहे असे रवींद्रनाथ टागोरांचे मत होते. १९०१ यावर्षी शांतिनिकेतन येथील रम्य वातावरणात त्यांनी पाठशाळा सुरू केली. त्यांनी शांतिनिकेतनमध्ये झाडाखाली शिकवायला सुरुवात केली. टागोरांनी शांतिनिकेतनला भारत व जग यांच्यातील जोडणारा धागा बनविण्याचा प्रयत्न केला.
सन १९०२ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. तसेच त्यांची थोरली मुलगी व धाकट्या मुलाचे निधन झाले. अशा प्रकारच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर एका मागून एक आघात झाले; परंतु धैर्याने रवींद्रनाथ या परिस्थितीला सामोरे गेले.
रवींद्रनाथांनी रचलेली ‘जन गण मन’ व ‘आमार शोनार बांग्ला’ या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनात दोन हजार पेक्षा जास्त गाणी रचली. अंदाजे एक हजार कविता, आठ कादंबऱ्या, आठ कथा संग्रह व विविध विषयांवर लेख त्यांनी लिहिले आहेत. ‘मनेर मानूष’ (मनातला माणूस) व ‘जीवन-देवता’ ही दोन रूपके टागोरांच्या कवितेत दिसतात. त्यांच्या लघुकथांमध्ये सामान्य माणसाचे जीवन वर्णिलेलं आहे.
१९१५ मध्ये इंग्रज शासनाने त्यांच्या साहित्यिक योगदानाकरिता ‘नाईट हुड’ अशी उपाधी दिली; परंतु जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ही उपाधी इंग्रज सरकारला परत केली.ईश्वराच्या सर्व व्यापकत्वाची जाणीव रवींद्रनाथांना होती. निसर्गविषयी त्यांना अपार ओढ होती. मेघांच्या गडगडाटात, लता-वेलींच्या नृत्यात, खडकांतून अंकुरणाऱ्या रोपट्यात, वृक्षांच्या निःस्तब्धतेत, लहान बालकांच्या निरागस हसण्यात त्यांना परमेश्वराचे दर्शन होत असे.रवींद्रनाथ टागोरांचे मत होते की जीवनाला जशी स्वातंत्र्याची गरज असते, त्याप्रमाणे मर्यादाही आवश्यक असतात. विधायक रचनेसाठी याचे संतुलन जरूरीचे आहे. टागोरांच्या काव्यात्मक गाण्यांकडे आध्यात्मिक व पारंपरिक म्हणून पाहिले गेले. संगीत, तत्त्वज्ञान, नृत्य-शिक्षण, चित्रकला अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला संचार केला. रवींद्रनाथ टागोर हे एक कवी, अभिजात कलावंत व सौंदर्य उपासक होते.‘माणसाचा धर्म’ (Religion of man) या ग्रंथात त्यांनी लिहिले आहे की, “माझा धर्म कवीचा धर्म आहे. मला जे भावते, भावनेने प्रतीत होते, ते काव्यात उतरले आहे. त्यात ज्ञान वा विचार असेलच असे नाही. आयुष्यात काही क्षण असे आले की, त्यांनी माझ्या आत्म्याला स्पर्श केला.”
रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’ या कविता संग्रहाला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवणारे रवींद्रनाथ हे पहिले भारतीय होते. त्यांच्या ‘गीतांजली’ या काव्यरचनेतील चौथ्या कवितेचे मराठीत भाषांतर-
विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही, विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा. दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे तू सांत्वन करावेच अशी माझी अपेक्षा नाही, दुःखावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा. जगात माझे नुकसान झाले. केवळ फसवणूक वाट्याला आली, तर माझे मन खंबीर व्हावे एवढीच माझी इच्छा. माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही, तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे
एवढीच माझी इच्छा. सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखावा दुःखाच्या रात्री जेव्हा सारे जग फसवणूक करील, तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा. रवींद्रनाथ टागोरांनी संत तुकारामांच्या साहित्याचा अभ्यास केला होता. त्यांनी संत तुकारामांचे काही अभंग बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत. तसेच त्यांच्या काव्यात अरिस्टॉटल, कॉन्ट, प्लेटो, हेगेल, रसेल इ. तत्ववेत्त्यांना भावलेले सत्य ते विविध कलांच्या माध्यमातून व्यक्त करीत होते.रवींद्रनाथांना विश्वाचे समग्र दर्शन झाले होते. १९२५ मध्ये अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेची स्थापना झाली. तिचे पहिले अध्यक्ष म्हणून रवींद्रनाथांची एकमताने निवड झाली. जीवनानुभवांमुळे त्यांचे तत्त्वज्ञान त्यांच्या साहित्यरूपातूनही प्रकट होत असे. रवींद्रनाथ हे प्रगतीशील शिक्षणतज्ज्ञ होते. सर्जनशीलता, निसर्गाशी संबंध व इतर संस्कृतीबद्दल सहिष्णुता या गोष्टींशी सांगड त्यांनी घातली.
रवींद्रनाथांना ईश्वराच्या सान्निध्याचा लाभ होत असे. टागोरांची ‘निर्झरेर स्वप्नभंग’ ही कविता त्यांच्या जीवनातील परिवर्तनाचा क्षण होता. ते म्हणतात, “ही कविता एखाद्या प्रपाताप्रमाणे माझ्या हृदयातून निर्माण झाली. ज्या खिन्नतेने व विषण्णतेने माझे हृदय बधीर करून टाकले होते, तिचे सर्व थर भेदून व फोडून एका क्षणात विश्वाच्या प्रकाशाने माझे हृदय काठोकाठ भरून टाकले. आनंदातून हे विश्व जन्मास आले. आनंदाने ते राहते. विश्वाची परिणती आनंदात होते. विश्व आनंदाने भरले आहे”. रवींद्रनाथांनी जगात ऐक्य, बंधुभाव, शांतता व सहकार्य निर्माण व्हावे म्हणून ‘विश्वभारती’ हे आपले पहिले आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन केले. आदर्श राजकीय व सामाजिक व्यवस्थेत व्यक्तीला जगावेसे वाटते, त्याचे वर्णन त्यांनी या कवितेत केले आहे, त्यातील काही ओळी-
‘जेथे मनाला भीती शिवत नाही व मनुष्य आपली मान ताठ ठेवून जगू शकतो जेथे ज्ञानाला मुक्तद्वार आहे.
जेथे संकुचितपणाने आपल्याभोवती जागोजाग भिंती उभ्या करून या जगाला खंडित करून त्याचे तुकडे केलेले नाहीत.
जेथे सत्याच्या खोल गाभ्यातून शब्द बाहेर येतात. जेथे पूर्णता प्राप्त करून घेण्यासाठी तिच्याकडे अविश्रांत धडपडी आपले हात उंचावत आहेत.’
रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या साहित्यातून मोतियांची गुंफण करून आपले साहित्य अजरामर केले आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम.