स्टेटलाइन – डॉ. सुकृत खांडेकर
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून इतिहास निर्माण केला. १९६६ मध्ये हरियाणा या स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. राज्याच्या स्थापनेपासून कोणत्याच राजकीय पक्षाने सरकार स्थापनेची हॅटट्रीक केली नव्हती. मतदारांनी भाजपावर विश्वास दाखवला. काँग्रेस, इंडियन लोकदल, सपा, जननायक जनता पार्टी किंवा आम आदमी पक्षापेक्षा मतदारांनी भाजपाला झुकते माप दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रणनिती काँग्रेसपेक्षा सरस ठरली. नरेंद्र मोदींनी जो विकसित भारताचा अजेंडा मांडला आहे, तो मतदारांना भावला. या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात अनेक मुद्दे होते, भाजपाचा पराभव होणार व सत्तेवर काँग्रेस येणार असे वातावरण होते पण मोदींचा करिष्मा वरचढ ठरला. केवळ सात महिन्यांपूर्वी हरियाणाच्या नेतृत्वात भाजपाने बदल केला. मनोहरलाल खट्टर यांना केंद्रात मंत्री म्हणून नेले व मुख्यमंत्रीपदाचा मुकुट नायब सिंह सैनी यांच्या मस्तकावर चढवला. खट्टर यांच्याविरोधात लोकांमध्ये मोठी नाराजी होती. लोकसभा निवडणुकीत भाजपाला फटका बसला पुन्हा विधानसभा निवडणुकीत तसा बसू नये याची दक्षता अमित शहांनी घेतली. सैनी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचाच पुढाकार होता. खट्टर व सैनी हे दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत.
हरियाणाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी व राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा या दोघांचा पराभव झाला असेच म्हणावे लागेल. राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील काँग्रेस नेतृत्वाला जनतेने नाकारले. काँग्रेसचा नकारात्मक प्रचार मतदारांनी धुडकावून लावला. खरं तर भूपिंदर सिंह हुड्डा यांना पक्षाने निवडणुकीत पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. ते अगोदरपासूनच मुख्यमंत्रीपदाच्या मुंडावळ्या बांधून बसले होते. नव्वदपैकी बहात्तर उमेदवार त्यांनी आपल्या मर्जीने निवडले होते. पक्षाची संघटना तर हुड्डांच्या दावणीला बांधलेली होती. हुड्डांचा फाजिल आत्मविश्वास व अहंकार यामुळे काँग्रेसच्या टप्प्यात आलेल्या विजयाचे रूपांतर पराभवात झाले. सिरसामधून निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदार कुमारी सेलजा या विधानसभा लढवायला उत्सुक होत्या. त्यांनी तशी जाहीरपणे इच्छा व्यक्त केली होती. पण हुड्डांनी त्यांना तिकीट मिळणार नाही अशी व्यवस्था केली. सेलजा या दलित नेत्या. आपल्याशी दुसरी कोणी स्पर्धक नको, याची काळजी हुड्डांनी घेतली. सेलजा यांनी नाराजी प्रकट करीत हुड्डांपासून अंतर राखले होते, या दोन नेत्यांतील शीत संघर्षाचा फटका काँग्रेसला बसला.
दुष्यत चौटाला हे खट्टर सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. दिवंगत उपपंतप्रधान देवीलाल याचे ते पणतू. ते जननायक जनता पार्टीचे प्रमुख आहेत. अगोदर भाजपा सरकारमध्ये राहिले आणि आता भाजपाच्या विरोधात लढले. २०१९ मध्ये त्यांच्या पक्षाचे १० आमदार निवडून आले होते. तेव्हा भाजपाला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी चौटाला यांच्या पक्षाची गरज होती, त्या बदल्यात त्यांनी दुष्यंत यांना उपमुख्यमंत्रीपद दिले. सन २०२०-२१ मध्ये चौटाला यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. यंदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधात लढताना त्यांच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. एवढेच नव्हे दुष्यंत चौटाला यांना पाचव्या क्रमांची मते मिळाली. नायब सिंह सैनी हे तुलनेने कोरा चेहरा. मुख्यमंत्री म्हणून त्यांना वेळ कमी मिळाला. पण या काळात खट्टर यांच्याविरोधातील अँटी इन्कबन्सीची धार बोथट झाली, त्याचा लाभ भाजपाला मिळाला. ८ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता हरियाणात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीला काँग्रेस आघाडीवर असा कल येत होता. सर्व वृत्तवाहिन्या काँग्रेसची सत्ता येणार असे ओरडून सांगत होत्या. काँग्रेस ९० पैकी ६० ते ६५ जागांवर आघाडीवर असे चित्र होते, पण त्यानंतर अचानक काय घडले याचा अंदाजही कुणाला आला नाही. काँग्रेसची वेगाने पिछेहाट सुरू झाली व भाजपाची घोडदौड सुरू झाली. मग मात्र भाजपाने मागे वळून बघितले नाही. सुरुवातीच्या तासाभरात काँग्रेसमध्ये जल्लोश सुरू होता, भाजपाला मतदारांनी नाकारले म्हणून कार्यकर्ते एकमेकांना जिलेबी भरवताना दिसत होते, नंतर भाजपाची सरशी होताना दिसताच काँग्रेस कार्यालयात जल्लोषासाठी आणलेले ताशे-ढोल तसेच सोडून कार्यकर्ते गायब झाले. मोदींची जादू ओसरली असे सांगणारे दिसेनासे झाले व हरियाणात मोदींचीच जादू चालली, असे ओरडून सांगणारे हातात कमळ घेऊन नाचू लागले.
हरियाणाच्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष होते. याच हरियाणाने देशाला आयाराम-गयाराम ही नवीन राजकीय संस्कृती दाखवून दिली. १९८६ ते १९९९ या तेरा वर्षांत हरियाणात ९ मुख्यमंत्री झाले. ओम प्रकाश चौटाला ४ वेळा मुख्यमंत्री झाले व सर्वांत कमी दिवसांचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची नोंद झाली. दि. १२ ते १७ जुलै १९९० असे ते ५ दिवस मुख्यमंत्री राहिले.
भाजपाचे मनोहरलाल खट्टर हे ऑक्टोबर २०१४ ते मार्च २०२४ असे साडेनऊ वर्षे तर मार्च २०२४ ते ऑक्टोबर २०२४ असे सात महिने नायब सिंह सैनी या सर्वोच्च पदावर राहिले. हरियाणाचे तीन लाल म्हणून ओळख असलेले देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या लाल परिवाराची घराणेशाही यंदाच्या निवडणुकीत संपुष्टात आली. भाजपा-जननायक जनता पार्टी (दुष्यंत चौटाला) या युती सरकारच्या विरोधात जनतेत मोठा असंतोष होता. दुष्यंत चौटाला सरकारमधून बाहेर पडले व खट्टर यांना मोदींनी केंद्रात हलवले हा जालीम उपाय लोकांच्या पचनी पडला. सैनी ओबीसी आहेत. त्यामुळे बिगर जाट मते भाजपाकडे आकर्षित झाली. २०१४ च्या मोदी लाटेपेक्षाही २०२४ मध्ये भाजपाचे जास्त आमदार निवडून आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेटवर्क आणि सूक्ष्म व्यवस्थापन यांचा भाजपाच्या विजयात मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे , निवडून आलेल्या ९० पैकी ८६ आमदार कोट्यधीश आहेत. ४४ आमदारांची संपत्ती प्रत्येकी १० कोटींपेक्षा जास्त आहे.
मोदी-शहा व भाजपाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस हा दलित विरोधी पक्ष आहे हे मतदारांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी आरक्षण विरोधी आहेत, असा आरोप भाजपाने केला. शिवाय काँग्रेसने कु. सेलजा यांना तिकीट नाकारून दलित महिलेचा अवमान केला, असे भाजपाने प्रचारात ठसवून सांगितले. काँग्रेसने केलेला दलित महिलेचा अवमान तुम्ही सहन करणार का, या भाजपाच्या प्रश्नाने काँग्रेसला जबर फटका बसला. हु्ड्डा-सलेजा शीत संघर्षाने सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास काँग्रेसला गमवावा लागला.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील १० पैकी ५ जागांवर काँग्रेसचा विजय झाला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात हवा गेली. एक्सिट पोलने काँग्रेसच सत्तेवर येणार म्हटल्याने पक्षाचे नेते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले. निकालानंतर काँग्रेसच्या पराभवाचीच चर्चा जास्त झाली. जुलाना मतदारसंघातून ६ हजारांहून जास्त मताधिक्याने निवडून आलेल्या ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगट यांच्या विजयालाही ठळक प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या मतदारसंघात दीड लाख मतदार आहेत, पैकी ५० टक्के जाट आहे, त्याचा लाभ त्यांना झालाच. विनेश जाईल तिथे नुकसान करते अशी कटू प्रतिक्रिया ब्रिजभूषण यांनी दिली, ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक तर गमवालेच आणि काँग्रेसमध्ये येऊन या पक्षालाही पराभूत केले…
नव्या विधानसभेत तेरा महिला निवडून आल्या आहेत, पैकी भाजपाच्या ५ व काँग्रेसच्या ७ महिला आमदार आहेत. सर्वात श्रीमंत महिला २७० कोटींची मालकीण असलेल्या सावित्री जिंदाल या कुरूक्षेत्रमधून अपक्ष म्हणून विजयी झाल्या. भाजपाचे हिस्सारमधून लोकसभेवर निवडून आलेले खासदार नवीन जिंदाल यांच्या त्या मातोश्री आहेत. मुलगा खासदार असल्याने भाजपाने त्यांना तिकीट दिले नाही आणि भाजपाच्या खासदाराच्या आईला विधानसभेची कशी उमेदवारी देणार म्हणून काँग्रेसने तिकीट दिले नाही.
किसान, जवान व पहिलवान हे सर्व भाजपावर नाराज आहेत म्हणून काँग्रेसने आपला विजय गृहीत धरला होता. भूपिंदर सिंग हुड्डा यांनी संपूर्ण जाट मतदारांना आपली व्होटबँक आहे असे गृहीत धरले होते. इंडियातील अन्य मित्रपक्षांना एकही जागा न देता काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवली. आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आजाद पार्टी, जननायक जनता पार्टी, सपा या सर्व भाजपा विरोधकांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. भाजपा विरोधी मतांचे विभाजन झाले, त्याचा फायदा भाजपालाच झाला. राज्यात ३६ मतदारसंघात जाट बहुसंख्य आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला त्यातील २७ मतदारसंघांत आघाडी मिळाली होती, विधानसभा निवडणुकीत ३६ जाट मतदारसंघांपैकी १९ मतदारसंघांत भाजपाचे आमदार विजयी झाले. जाट मतदारांनीही भाजपाला पसंती दिली. सायबर हब म्हणून ओळखले जाणाऱ्या गुरूग्राममध्ये सर्व जागा भाजपाने जिंकल्या. ४८ आमदारांसह सत्ता काबीज करणाऱ्या भाजपाला ३९.९ टक्के मते मिळाली, तर ३९ टक्के मते मिळवून ३७ आमदार घेऊन काँग्रेसला विरोधी बाकांवर बसण्याची पाळी आली. भाजपाने बिगर जाट, दलित व ओबीसी मतांवर लक्ष्य केंद्रित करून हरियाणामधे हॅटट्रीक संपादन केली. पुढील महिन्यात महाराष्ट्र व झारखंडमध्ये तर फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणूक आहे. भाजपाच्या विजयाने हरियाणा एक झांकी है… हा संदेश दिला आहे.