Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीSiddharth Shirole : आमदार निधीमधून १४ दिव्यांग बांधवांना ई-स्कूटरचे वाटप!

Siddharth Shirole : आमदार निधीमधून १४ दिव्यांग बांधवांना ई-स्कूटरचे वाटप!

‘लवकरच दिव्यांग भवन उभारण्याचा प्रयत्न करू’

पुणे : दिव्यांग बांधवांना केवळ तात्पुरती मदत न करता त्यांना स्वावलंबी बनवीत त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांच्या आमदार विशेष निधीमधून १४ दिव्यांग बांधवांना ई स्कूटरचे (e scooter) वाटप केले. गोखले नगर येथील मुनोत सभागृह या ठिकाणी संपन्न झालेल्या एका विशेष कार्यक्रमात शिरोळे यांच्या हस्ते या ई-स्कूटर काल लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आल्या.

डिझाईन सल्लागार, पीसीएमसी दिव्यांग भवन फाउंडेशन तसेच गोवा राज्य आयुक्तांचे सल्लागार असलेले अभिजीत मुरुगकर, ईझी राईड संस्थेचे सह-संस्थापक नरेंद्र देव, दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, श्याम सातपुते, दत्तात्रय खाडे, गणेश बगाडे, अपर्णा कुऱ्हाडे, दत्तात्रय मिर्गवणे हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान शिरोळे यांच्या हस्ते व स्वरूप तावडे फाउंडेशनच्या सौजन्याने दिव्यांग बांधवांना वॉकर, ब्लाइंड स्टिक, वॉकिंग स्टिक, व्हीलचेअर्स आणि क्रचेस सारख्या साधनांचे आणि खाद्य किट्स देखील वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना शिरोळे म्हणाले, “समाजकारणात सक्रीय असताना अनेक दिव्यांग बांधवांचा प्रवास मी पाहिला आहे. हे सर्वच बांधव कायमच मला एक सकारात्मक ऊर्जा देत आले आहेत. जेव्हा सर्वसामान्य माणूस यांच्याशी परिचित होतो तेव्हा हे त्यांना अनेकप्रकारे प्रेरित करतात. यांना पाहिले की आपल्या वेदना या नक्कीच यांच्यापेक्षा कमी आहेत, हे जाणवत राहते. त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी समाजातील बांधिलकी आणखी वाढायला हवी असे मला वाटते.” समाजाची या बांधवाप्रती असलेली संवेदना जागृती होणे आज गरजेचे असून दिव्यांग बांधवांचे आयुष्य सुकर, सुलभ करण्यासाठी आम्ही कायमच कटिबद्ध असू, असेही शिरोळे यांनी नमूद केले.

दिव्यांगांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना असून त्यांविषयी योग्य प्रकारे माहिती घेऊन त्या दिशेने कष्ट केल्यास या योजनांचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतील. सरकारी मदत आणि समाजाची दिव्यांगांप्रती असलेली संवेदना यांच्या एकत्रित परिणामाने दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असेही शिरोळे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड प्रमाणे पुणे शहरात देखील लवकरात लवकर दिव्यांग भवन उभारणीसाठी प्रयत्नशील असल्याची माहितीही शिरोळे यांनी दिली.

कार्यक्रमा दरम्यान छाया चाफले या दिव्यांग मुलाच्या पालक व स्वत: दिव्यांग असलेले महेश मिस्त्री यांनी आपली आव्हाने आणि अनुभव यांबद्दल उपस्थितांना सांगितले. अभिजीत मुरुगकर यांनी अधिक समावेशक समाज निर्माण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. नरेंद्र देव यांनी ईझी राईडच्या दिव्यांगांविषयीच्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली. या ई स्कूटरचा प्रती तास खर्च हा २० पैसे असून यामुळे दिव्यांग बांधवांचा पेट्रोलचा खर्च वाचेल असेही ते म्हणाले. परेश गांधी यांनी दिव्यांग भवनमधील सक्षमीकरणाच्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -