दी लेडी बॉस – अर्चना सोंडे
भारतात चहाला अमृत म्हटले जाते. कोणताही समारंभ असो किंवा कोणतीही मीटिंग चहा हा असलाच पाहिजे. आपले पंतप्रधान जनतेशी संवाद साधतात तो देखील ‘चाय पे चर्चा’ करून. अशा या चहाची ती सुद्धा चाहती. पण तिने आपल्या या आवडीला व्यवसायाचे रूप दिले आणि कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी उभारली. ही चहाची गोष्ट आहे डॉ. रूपाली आंबेगांवकर यांची.
कृष्णा देशमुख व छाया देशमुख या रायगड जिल्ह्यातील दाम्पत्यांच्या पोटी रूपालीचा जन्म झाला. तिच्या बाबांची गावी भात गिरणी होती. सोबतच ते आंब्याच्या बागा आणि भातशेती सांभाळायचे. रूपालीचे बाबा एक तर त्यांना मुंबईत भेटायला यायचे किंवा सुट्टीच्या दिवशी रूपाली त्यांना भेटायची. रूपाली, आई आणि मोठ्या भावासोबत मुंबईला राहायची. मध्यमवर्गीय कुटुंबातल्याप्रमाणे तिचे बालपण गेले. त्या काळी जवळपास प्रत्येक कुटुंबात मोठ्या भावाने वापरलेल्या वस्तू लहान भावंडे वापरत. रूपालीने देखील आपल्या चुलत भावाची वापरलेली पुस्तके, क्रेयॉन आणि गणवेश वापरलेली आहेत.
मुंबईतील जुहू या पॉश विभागात रूपाली कुटुंबासह राहायची. रूपालीचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना हे घर शासनाकडून मिळाले होते. जुहू येथील विद्या निधी स्कूलमध्ये रूपाली दहावीपर्यंत शिकली. १९९५मध्ये दादरच्या कीर्ती कॉलेजमधून तिने १२वी पूर्ण केली. लोकमान्य टिळक मेडिकल स्कूल, सायन, मुंबई येथून रूपालीने एमबीबीएस पूर्ण केले. २००० मध्ये तिचे लग्न ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. क्षितीज आंबेगावकर यांच्याशी झाले. महाविद्यालयात डॉ. क्षितीज रूपालीचे सीनियर होते. लग्नानंतर रूपालीने जीएस मेडिकल कॉलेज, मुंबई येथून ऑर्थोपेडिक्समध्ये एमएस केले.
पुढची दोन वर्षे तिने तिच्या पतीसोबत त्यांच्या खासगी दवाखान्यात वैद्यकीय सेवा केली. दरम्यान रूपालीने मुलीला जन्म दिला. मुलीला वेळ आणि लक्ष देण्यासाठी तिने वैद्यकीय सेवेतून विश्रांती घेतली. दुर्दैवाने रूपालीच्या मुलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. मुलीला मोठ्या काळासाठी इस्पितळात ठेवणे गरजेचे होते. मुलगी तीन वर्षांची झाल्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर मुलीला डिस्लेक्सियाचे निदान झाले. तिला बोलण्यास विलंब झाला. इस्पितळ आणि थेरपी सेंटर अशा फेऱ्या सुरू झाल्या. मुलगी सहा वर्षांची झाली तेव्हा सर्व काही सामान्य झालं. आता रूपालीकडे वेळ होता. मात्र पुन्हा वैद्यकीय सेवेत परतण्याचे तिचे मन नव्हते. त्याऐवजी, ती चीनच्या सहलीवर गेली. तिथे एका स्थानिक गाईडने रूपालीला खास चहाचा बॉक्स दिला. मुंबईत परतल्यावर तिने किचनच्या कपाटात बॉक्स ठेवून दिला. सहा महिन्यांनंतर एकदा तिच्या मोलकरणीने तिला बॉक्सची गरज आहे की, टाकून द्यायचा असे विचारले. रूपालीला विसरलेल्या बॉक्सची आठवण आली.
बॉक्स खूपच आकर्षक होता. तिने त्यातील थोडा चहा बनवला. तिला चव खूप आवडली. दररोज ती चहा प्यायची. असे करून एकदा बॉक्समधील चहाचा साठा संपला. तिने चीनमध्ये प्रवास करणाऱ्या मित्रांना तो चहाचे बॉक्स खरेदी करण्यास सांगितले. रूपालीला या चहामध्ये भविष्यातील व्यवसायाची संधी दिसली. ती चीनमधील चहाच्या मळ्यात चार महिने राहिली. या चार महिन्यांच्या वास्तव्यादरम्यान एक बिझनेस मॉडेल आकारास आले. ती भारतात परतली. २०१० मध्ये चिनी आणि जपानी चहा आयात करून रूपालीने तिची कंपनी सुरू केली. जस्ट डायलच्या माध्यमातून जाहिरात केली आणि मुंबईतील ग्राहकांना चहा विकण्यास सुरुवात केली.
मुख्यतः रेस्टॉरंट्सकडून किंवा जस्ट डायलद्वारे जोडलेल्या ग्राहकांकडून ऑर्डर मिळाल्या. सुरुवातीच्या काही वर्षांत, त्यांनी लहान पॅकेज केले आणि २०१४ मध्ये उलाढाल २५ लाख रुपयांपर्यंत पोहोचली. रूपालीने २०१० मध्ये ३० लाख रुपये गुंतवणुकीसह १०० चौरस फूट कार्यालयातून आयर्न बुद्ध कंपनीची सुरुवात केली. मुलुंड, मुंबई येथे २०,००० चौरस फूट पॅकेजिंग युनिट सुद्धा सुरू केले. आज, टीसीडब्ल्यू चहा जपान, चीन, व्हिएतनाम, दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या विविध भागांतून हाताने खुडलेल्या चहाच्या पानांसह मिश्रित ८० उत्कृष्ट फ्लेवर्समध्ये येतो. यामध्ये ओलॉन्ग चहा, ब्लूमिंग चहा, जास्मिन चहा, सेंचा चहा, मॅचा चहा आणि टायगुयिन चहा अशा प्रकारच्या चहाचा समावेश होतो. आता टीसीडब्ल्यूकडे टी बॅग्स आहेत आणि ५० ग्रॅमच्या पॅकेटपासून चहापत्ती ते विकतात. त्यांची उत्पादने ऑनलाइन आणि रिटेल आउटलेटमध्ये उपलब्ध आहेत ज्यात देशभरातील कंपनीच्या मालकीच्या ३७ स्टोअरचा समावेश आहे, जी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे, कोलकाता आणि बंगळूरु येथे आहेत.
रूपालीकडे अगदी ५०,००० रुपये किलो एवढा महाग चहासुद्धा आहे. व्हिएतनाममध्ये उगवलेला लोटस चहा हा जगातील उत्कृष्ट चवीचा चहा आहे जो ६०,००० रुपये प्रति किलो दराने विकला जातो. मोरोक्कन मिंट चहा (सहा टी बॅग्सची किंमत १९९ रुपये) सर्वाधिक विकला जाणारा चहा आहे. फ्लॉवरी बुके टी चहा, काश्मिरी काहवा आणि डिटॉक्स चहा आदी प्रकार देखील चांगले विकले जातात. पुढे टी कल्चर ऑफ द वर्ल्ड (टीसीडब्ल्यू) या ब्रँड नावाने चहा विकला. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कंपनीची उलाढाल ११ कोटी रुपयांवर पोहोचली. त्यांच्या इतर मोठ्या ग्राहकांमध्ये ताज, हयात आणि ओबेरॉय सारख्या मोठ्या हॉटेल चेनचा समावेश आहे. जुलै २०१७ मध्ये कंपनीचे रूपांतर टीसीडब्ल्यू टी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये झाले.
कोविडचा काळ कठीण होता. टीसीडब्ल्यूने काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, तर काही दुकाने बंद करावी लागली. मात्र रूपालीने कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली नाही. डिफेन्स स्टोअर्सना चहा पुरवठा करण्याच्या करारामुळे कंपनीने तग धरला. कोरोना काळात सुमारे ३० टक्के चहा विक्री ऑनलाइन झाली. कोरोनापूर्वी, चहाची ऑनलाइन विक्री फक्त १० टक्के होती. आज मात्र २५ टक्के चहा विक्री ऑनलाइन होते. टीसीडब्ल्यूची उत्पादने त्यांच्या वेबसाइटवर आणि इतर प्रमुख ईकॉमर्स पोर्टलवर विकली जातात. विशेष म्हणजे, टीसीडब्ल्यू टी बॅग्स आणि पाऊच १०० टक्के बायोडिग्रेडेबल बायोप्लास्टिक, मातीपासून बनवले जातात. याव्यतिरिक्त, त्यांच्या टी बॅग्स गोंद, रेसीन आणि स्टेपल फ्री आहेत.
एक साधा चहा जो आपण दररोज पितो. मात्र या चहाचा व्यवसाय करून डॉ. रूपाली आंबेगावकर आज उद्योजिका झाल्या. त्यांची ओळख फक्त डॉक्टर नाही, तर त्या आता चहावाली डॉक्टर आहेत.